Gudi padwa 2021: हिंदू धर्माने भगवा ध्वज का निवडला? जाणून घ्या भगव्या रंगाची वैशिष्ट्ये!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2021 12:50 PM2021-04-12T12:50:47+5:302021-04-12T12:51:24+5:30
Gudi Padwa 2021: विजयोत्सवाचे प्रतीक असलेला भगवा ध्वज काय दर्शवतो, ते जाणून घेऊया.
हिंदू धर्मात केशरी, लाल, पांढरा, पिवळा या रंगाचा अधिकतर वापर केला जातो. नवीन वर्षाच्या निमित्तानेदेखील अनेक ठिकाणी गुढीच्या बरोबरीने भगवा ध्वज उंचावला जातो. ही परंपरा रामायणाच्या आधीपासून सुरू आहे. विजयोत्सवाचे प्रतीक असलेला भगवा ध्वज काय दर्शवतो, ते जाणून घेऊया.
केशरी अर्थात भगवा रंग त्याग, बलिदान, ज्ञान, पावित्र्य, सेवा यांचे प्रतीक आहे. सनातन धर्मात साधू संत मुुमुक्षू होऊन मोक्ष मार्गावर चालण्याचा संकल्प करतात, तेव्हाही केशरी वस्त्रे परिधान करतात. वारकरी पंथातही केशरी ध्वज उंचावतात.
केशरी वस्त्र संयम, संकल्प आणि आत्मनियंत्रणाचे प्रतीक मानला जातो. ज्याप्रमाणे पवित्र अग्नी प्रज्वलित झाल्यावर त्यातून केशरी ज्वाला निघतात, त्याप्रमाणे साधू संत आपल्या तपश्चर्येच्या तेजाने तप्त होतात, तेव्हा त्यांची काया केशरी रंगासमान भासते.
केशरी रंग दुर्गा माता, हनुमंत, गणपतीदेखील धारण करतात. त्यामुळे या रंगाबरोबरच त्यांची ऊर्जा आणि आशीर्वाद प्राप्त होतात.
रामायण, महाभारत असो नाहीतर शिवरायांचा काळ, त्या सर्वांनी विजयाचा निदर्शक म्हणून भगवा ध्वज फडकवला. सनातन धर्मानेदेखील भगवा ध्वज स्वीकारला. तर स्वातंत्र्योत्तर काळात भारताच्या ध्वजातही केशरी रंग वापरण्यात आला.
अंधारातही चमकून दिसेल, ही केशरी रंगाची खासियत असते. म्हणून द्रुतगती मार्गावर केशरी रंगाचे पट्टे रेखाटले असतात. याचाच दुसरा अर्थ केशरी रंग अंधारावर, अधर्मावर, अंधश्रद्धेवर मात करणारा आहे, म्हणून केशरी ध्वजाचा वापर होतो.
केशरी हा सूर्योदयाचादेखील रंग आहे. सूर्य आणि पृथ्वी यांचे घनिष्ट नाते आहे. सूर्योदय झाल्याशिवाय पृथ्वीचे कामकाज सुरू होत नाही, त्याप्रमाणे धर्माचा उदय झाल्याशिवाय समाज जीवनाचे चलनवलन होणार नाही. म्हणून हिंदू धर्माचा ध्वज केशरी रंगाचा आहे.
केशरी रंग शौर्य, बलिदान आणि वीरतेचे प्रतीक आहे. तसेच तो मांगल्याचेही प्रतीक आहे. म्हणून नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर शोभा यात्रांमध्ये केशरी ध्वज उंचावून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. आपणही आपल्या घरावर, खिडकीवर केशरी ध्वज फडकवून मांगल्याचा उत्सव साजरा करूया.