Gudi Padwa 2022: गुढीपाडवा: कशी उभारावी गुढी? पंचांग, गणेश पूजनाचे महत्त्व; पाहा, शुभ मुहूर्त, संवत्सर नाम
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 08:08 AM2022-03-25T08:08:26+5:302022-03-25T08:08:26+5:30
Gudi Padwa 2022: गुढी हे आपल्या पराक्रमाचे प्रतीक असून, गुढीपाडव्याचे महत्त्व, मान्यता आणि मराठी नववर्षाचे वैशिष्ट्य जाणून घ्या...
भारतीय आणि सौर राष्ट्रीय पंचांगानुसार वर्षाचा पहिला महिना चैत्र आहे. सूर्य जेव्हा मेष राशीमध्ये प्रवेश करतो, त्यावेळी भारतीय सौर चैत्र महिना सुरू होतो. चैत्र महिन्यात वसंत ऋतूची सुरुवात होते. नवीन शकसंवत्सर हे चैत्र शुद्ध प्रतिपदेला, गुढी पाडव्याच्या दिवशी सुरू होते. गुढी उभारून नववर्षाचे स्वागत केले जाते. यंदाच्या वर्षी मराठी नववर्ष, ०२ एप्रिल २०२२ रोजी चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा आहे. गुढी कशी उभारावी, गुढीपूजनासह पंचांग, गणेश पूजनाचे महत्त्व आणि यंदाचे संवत्सर नाम, याविषयी जाणून घेऊया...
हिंदू नववर्ष प्रत्येक वर्षी नवे संवत्सरनाम घेऊन येते. यंदाचे मराठी नववर्षाचे संवत्सर शुभकृत नाम संवत्सर असणार आहे. गुढी हे आपल्या पराक्रमाचे प्रतीक आहे, याची जाणीव ठेवून ती सन्मानाने उभारली जावी आणि सन्मानाने उतरविली जावी. आपला दिवस सूर्योद्यापासून सुरु होतो म्हणून गुढी सूर्योद्याच्यावेळीच उभारली जावी तसेच ती सूर्यास्ताच्या साधारण १० मिनिटे आधी उतरवावी, असे सांगितले जाते. गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी तर उभारली जावीच; शिवाय त्या दिवशी पंचांगावरील गणपतीचे पूजन करावे आणि पंचांगात दिलेले वर्षफल वाचावे, असे म्हटले जाते. अजूनही अनेक ठिकाणी गुढीपाडव्याच्या दिवशीच सकाळी पंचांग घरी आणून त्याचे पूजन करुन संवत्सर फलाचे वाचन श्रद्धापूर्वक केले जाते.
चैत्र प्रतिपदा प्रारंभ: ०१ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ११ वाजून ५४ मिनिटे.
चैत्र प्रतिपदा समाप्ती: ०२ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ११ वाजून ५८ मिनिटे.
अभिजीत मुहूर्त: दुपारी १२ वाजून ८ मिनिटे ते १२ वाजून ५७ मिनिटे.
भारतीय पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे गुढीपाडवा, पंचाग, गणपती पूजन ०२ एप्रिल २०२२ रोजी करावे, असे सांगितले जात आहे. आपण मराठी लोकांनी हा दिवस केवळ आनंदाचाच नव्हे, तर अभिमानाचा म्हणूनही साजरा केला पाहिजे. आपल्याकडे साडेतीन मुहूर्तांना विशेष महत्त्व आहे. त्यांच्यापैकी गुढीपाडवा हा एक शुभमूहूर्त मानला जातो. आपला दिवस हा सूर्याच्या उदयाबरोबर सुरू होतो. त्यामुळे आपल्या दिवस प्रारंभास एक नैसर्गिक अधिष्ठान मिळालेले आहे.
गुढीपूजन कसे करावे?
पहाटे सूर्योदयापूर्वी उठावे. अंगाला उटणे व सुगंधीत तेल लावून अभ्यंगस्नान करावे. दरवाजाला तोरण बांधावे. एका वेळूच्या काठीला तेल लावून स्नान घालावे. नंतर एका टोकाला केशरी वस्त्र बांधावे. अगदीच काही नाही तरी नवीन रेशमी साडी निऱ्या काढून बांधावी. कलशाला पाच गंधाचे पट्टे ओढावे, स्वस्तिक काढावे व गजरा बांधावा. नंतर कलश उपडा ठेवावा. काठीला अंब्याचा डाहाळी, निंबाचा पाला बांधावा. फुलांची माळ घालावी. उपलब्ध असल्यास बत्ताशाची माळ घालावी. घरातून उजव्या बाजूला दिसेल, अशा पद्धतीने गुढी उभारावी. गुढीची 'ओम ब्रह्मध्वजाय नमः', असे म्हणून ‘ब्रह्मध्वज नमस्तेऽस्तु सर्वाभीष्ट फलप्रद। प्राप्तेऽस्मिन्वत्सरे नित्यं मद्गृहे मंगलं कुरु।’ हा मंत्र म्हणून पूजा करावी. हळद-कुंकू वाहावे. धूप-दीप दाखवावा. नैवेद्य दाखवावा. नमस्कार करावा.
शालिवाहन राजा महाराष्ट्रीय होता
या दिवसापासून ज्याचा शक सुरू होतो, तो राजा शालिवाहन हा पैठण येथे कुंभाराच्या वस्तीत वाढला. त्याने आक्रमक शकांना पराभूत केले आणि त्या आनंदाप्रीत्यर्थ त्याने जी नवी कालगणना रूढ केली त्याला शक असेच नाव दिले. शक हा शब्द संवत्सर या अर्थाने रूढ झाला. हा शालिवाहन राजा महाराष्ट्रीय होता. त्याचा शक आसेतुहिमाचल सर्वत्र चालतो. पंचांगगणितातील महत्त्वाची कोष्टके या शालिवाहन शकावर आधारित आहेत. शालिवाहन शकाच्या प्रारंभीच्या म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी प्रभू रामचंद्राने किष्किंधावासीयांना वालीच्या छळातून मुक्त केले असे एक कथा सांगते. तर दुसऱ्या कथेप्रमाणे प्रभू रामचंद्र रावणावर विजय मिळवून अयोध्येत आले तो दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदेचा होता, अशा काही मान्यता गुढीपाडवा आणि शालिवाहन शक संवत्सराविषयी सांगितल्या जातात.