Gudi Padwa 2022: हिंदू नववर्षारंभ: गुढीपाडव्याला १५०० वर्षांनी जुळून येतोय दुर्मिळ अद्भूत शुभ योग; लाभदायक काळ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2022 12:00 PM2022-04-01T12:00:47+5:302022-04-01T12:02:19+5:30
Gudi Padwa 2022: प्रत्येक हिंदू नववर्षाला स्वतःचा राजा, मंत्री आणि मंत्रिमंडळ असल्याची मान्यता असून, यंदाचे विशेष आणि वैशिष्ट्य जाणून घ्या...
हिंदू नववर्ष चैत्र महिन्यापासून सुरू होते. चैत्र महिन्यात वसंत ऋतूची सुरुवात होते. नवीन शकसंवत्सर हे चैत्र शुद्ध प्रतिपदेला, गुढी पाडव्याच्या दिवशी सुरू होते. गुढी उभारून नववर्षाचे स्वागत केले जाते. आपण मराठी लोकांनी हा दिवस केवळ आनंदाचाच नव्हे, तर अभिमानाचा म्हणूनही साजरा केला पाहिजे. हिंदू नववर्ष प्रत्येक वर्षी नवे संवत्सरनाम घेऊन येते. यंदाचे मराठी नववर्षाचे संवत्सर शुभकृत नाम संवत्सर असणार आहे. गुढी हे आपल्या पराक्रमाचे प्रतीक आहे. आपल्याकडे साडेतीन मुहूर्तांना विशेष महत्त्व आहे. त्यांच्यापैकी गुढीपाडवा हा एक शुभ मुहूर्त मानला जातो. यंदाच्या वर्षी अत्यंत दुर्मिळ अद्भूत शुभ योग जुळून येत आहे, जाणून घ्या... (Gudi Padwa 2022)
यंदाच्या वर्षी गुढीपाडवा शनिवार, ०२ एप्रिल २०२२ रोजी आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पंचांग आणि पंचांगस्थ गणपती पूजन केले जाते. मराठी नववर्षाची सुरुवात काही राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत शुभ, लाभदायक अन् फायदेशीर ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. गुढीपाडव्यापासून चैत्री नवरात्र सुरू होत आहे. या सर्व नवरात्रात दुर्गा देवीचे पूजन, नामस्मरण, उपासना करणे अत्यंत शुभ मानले गेले आहे. (Very Rare Auspicious Yog on Gudi Padwa 2022)
प्रत्येक हिंदू नववर्षाला स्वतःचा राजा, मंत्री आणि मंत्रिमंडळ
प्रत्येक हिंदू नववर्षाला स्वतःचा राजा, मंत्री आणि मंत्रिमंडळ असते. या वेळी हिंदू नववर्ष संवत २०७९ अशाच दुर्मिळ योगायोगाने सुरू होत आहे, जे दीड हजार वर्षांत घडते. या नववर्षात नऊही ग्रह राशी बदल करणार आहे. त्यामुळे ज्योतिष शास्त्रानुसार हे वर्ष महत्त्वाचं आहे. नक्षत्रांची स्थिती देखील अत्यंत दुर्मिळ आहे. यापूर्वी असा दुर्मिळ योग २२ मार्च ४५९ रोजी तयार झाला होता, असे सांगितले जात आहे. (Gudi Padwa 2022 Yog After 1500 Years)
नववर्षाच्या सुरुवातीलाच नवग्रह राशीबदलाचा अद्भूत योग
एप्रिल महिन्यात प्रथम ग्रहांचा सेनापती मंगळ ७ एप्रिल रोजी शनीच्या कुंभ राशीत प्रवेश करेल. यानंतर, व्यवसाय आणि बुद्धिमत्ता देणारा बुध ग्रह ८ एप्रिल रोजी मेष राशीत प्रवेश करेल. १३ एप्रिल रोजी नवग्रहांचा गुरू बृहस्पती गुरू आपलेच स्वामित्व असलेल्या मीन राशीत प्रवेश करेल. त्यानंतर नवग्रहांचा राजा सूर्य मेष राशीत प्रवेश करेल. त्यानंतर धन आणि वैभव देणारा शुक्र २७ एप्रिल रोजी मीन राशीत प्रवेश करेल. काही पंचांगानुसार, १२ एप्रिल रोजी छाया ग्रह राहु मेष राशीत तर केतू ग्रह तूळ राशीत प्रवेश करेल. यानंतर २९ एप्रिल रोजी नवग्रहांचे न्यायाधीश शनिदेव स्वतःच्या राशीत कुंभ राशीत प्रवेश करतील. चंद्र ग्रह दर दोन दिवसांनी रास बदलतो
नवीन वर्षाच्या सुरुवातीला रेवती नक्षत्र आणि तीन राजयोग
नवीन वर्षाच्या सुरुवातीला रेवती नक्षत्र आणि तीन राजयोग तयार होत आहेत. याशिवाय, गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वार्थ सिद्धि योग आणि अमृत सिद्धि योग एकाचवेळी जुळून येत आहेत. तसेच यंदाच्या चैत्री नवरात्राची सुरुवात शुभ मानल्या गेलेल्या अमृत सिद्धी योगात होत आहे. चैत्री नवरात्राच्या नऊ दिवसांपैकी ६ दिवस अतिशय शुभ मानले गेले आहेत.