Gudi Padwa 2023: गुढी उभारताना कलश उपडाच का ठेवतात? जाणून घ्या, मान्यता अन् कडुलिंब, रेशमी वस्त्राचे महत्त्व

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 12:51 PM2023-03-20T12:51:18+5:302023-03-20T12:52:27+5:30

Gudi Padwa 2023: गुढी उभारताना वापरले जाणारे रेशमी वस्त्र, कलश, बत्तासे, हार, कडुलिंब यांना केवळ सांस्कृतिक नाही तर नैसर्गिक आणि आरोग्यदृष्ट्याही विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते.

gudi padwa 2023 know about why kalash is downward on gudhi and significance of other major things | Gudi Padwa 2023: गुढी उभारताना कलश उपडाच का ठेवतात? जाणून घ्या, मान्यता अन् कडुलिंब, रेशमी वस्त्राचे महत्त्व

Gudi Padwa 2023: गुढी उभारताना कलश उपडाच का ठेवतात? जाणून घ्या, मान्यता अन् कडुलिंब, रेशमी वस्त्राचे महत्त्व

googlenewsNext

Gudi Padwa 2023: भारतीय सौर राष्ट्रीय पंचांगानुसार, वर्षाचा पहिला महिना चैत्र असतो. सूर्य जेव्हा मेष राशीमध्ये प्रवेश करतो, त्यावेळी भारतीय सौर पंचांग सुरू होते. भारतीय संस्कृतीत 'चैत्र शुद्ध प्रतिपदा' हा दिवस 'महापर्व' म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने गुढीपाडव्याला अनन्य साधारण महत्त्व आहे. तसेच चैत्र प्रतिपदेपासून चैत्र नवरात्रास सुरुवात होते. महाराष्ट्रात गुढीपाडव्याला विशेष महत्त्व आहे. गुढी उभारण्याची एक शास्त्रोक्त पद्धत सांगितली जाते. त्यानुसार गुढी उभारताना कलश उपडा का ठेवतात, याबाबत काही मान्यता सांगितल्या जातात.

चैत्र शुद्ध प्रतिपदा हा शालिवाहन शकाचा पहिला दिवस असतो. यंदा १९४५ वे शालिवाहन शक आहे. तसेच शोभन नामक संवत्सर सुरू होणार आहे. या दिवशी घर स्वच्छ केले जाते. मुख्य प्रवेशद्वाराबाहेर रांगोळी काढाली जाते. दाराला आंब्याच्या पानांचे व झेंडूच्या फुलांचे तोरण बांधले जाते. आधी घरातील देवांची मनोभावे पूजा केली जाते. आदल्या दिवशी विकत आणलेली वेळूची काठी आणून, ती धुवून तिच्या टोकाला धुतलेले स्वच्छ वस्त्र आणि सुवासिक फुलांची माळ बांधून त्यावर चांदीचा गडू, लोटी किंवा फुलपात्र अडकवले जाते.नंतर सर्व कुटुंबीयांच्या उपस्थितीत गुढी उभारली जाते. धर्मशास्त्रात यालाच ब्रह्मध्वज अशी संज्ञा आहे.

गुढी उभारताना कलश उपडाच का ठेवतात?

गुढीवरील कलश हा मंदिरावरील कलशाचे प्रतिक मानला जातो. गुढीवर कलश उलटा जमिनीच्या दिशेने तोंड करुन ठेवला जातो. जमिनीमार्फत ऊर्जा आपल्या घराकडे, कुटुंबाकडे यावी, हा यामागील उद्देश असतो. तांब्यावर काढलेले जाणारे स्वस्तिक हे शुभतेचे आणि चौफेर प्रगतीचे प्रतिक मानले जाते. तसंच गुढी पुढे ठेवला जाणारा कलश हा शुभतेचे, मांगल्याचे आणि पवित्रतेचे प्रतिक मानले जाते. कलशाचे तोंड जमिनीकडे असल्याने कलशाच्या पोकळीतून प्रक्षेपित होणार्‍या लहरींमुळे तांब्यात असलेली कडुलिंबाची पाने आणि रेशमी वस्त्र हे सात्त्विक लहरींनी भारीत बनते. भूमीच्या आकर्षणशक्‍तीमुळे हा रूपांतरित सगुण ऊर्जाप्रवाह जमिनीच्या दिशेने संक्रमित होण्यास आणि त्याचे जमिनीवर सूक्ष्म-आच्छादन बनण्यास साहाय्य होते. तसेच गुढीतील घटकांना देवत्व प्राप्त झाल्यामुळे कलशाच्या पोकळीत नादलहरी कार्यरत होतात. या नादलहरींमध्ये वायू आणि आकाश ही उच्च तत्त्वे सामावली जातात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जात आहे. स्वस्तिक हे शुभचिन्ह आहे. स्वस्तिकातून सात्त्विक स्पंदने बाहेर पडतात आणि त्यातील चैतन्यामुळे वातावरणातील काळे आवरण दूर होण्यास साहाय्य होते. त्यामुळे कलशावर कुंकवाने स्वस्तिक काढले जाते.

रेशमी वस्त्र आणि कडुलिंबाच्या पानांचे महत्त्व

गुढी उभारताना प्रत्येकजण वेगवेगळ्या रंगाच्या रेशमी वस्त्राचा वापर करतात. प्रत्येकाच्या आयुष्यात विशिष्ट रंगाचे खास महत्त्व असते. या रंगाची आठवण करुन देण्यासाठी रंगीत रेशमी वस्त्राचा वापर केला जातो. हिवाळ्यातून उन्हाळ्यात प्रवेश केल्यानंतर गुढीपाडवा हा सण येतो. बदलत्या वातावरणाचा निश्चितच आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे या काळात विविध आजार उद्भवण्याची शक्यता बळावते आणि या आजारांपासून संरक्षण करण्यासाठी, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी नववर्षाच्या सुरुवातीला कडूलिंबाची कटू चव घेतली जाते.

नववर्षाची सुरुवात गोड करण्यासाठी बत्ताशांची माळ

नववर्षाची सुरुवात गोड करण्यासाठी बत्ताशांची माळ गुढीवर चढवली जाते. आपल्या प्रत्येकाचे आयुष्य हे कटू-गोड आठवणींचे, अनुभवांचे मिश्रण असते. आपल्या आयुष्यातील गोडव्याचे प्रतिक म्हणून बत्ताशांची माळ असते. सुरुवात गोड झाली तर शेवटही गोडच होईल. या उद्देशाने नववर्षाच्या सुरुवातीला गोड खाल्ले जाते. पूजा करताना हार गुढीला हार घातला जातो. हार हे मांगल्याचे प्रतिक मानले जाते. गुढी पूर्णपणे सजवून उभारल्यानंतर घरातील सर्व मंडळी एकत्र येऊन या गुढीला हळद, कुंकू, अक्षता, हार, फुले वाहून पूजा केली जाते. त्यानंतर कडूलिंब-साखरेचा प्रसाद वाटला जातो. गुढीला गोडाचा नैवेद्य दाखवला जातो. सूर्यास्तापूर्वी गुढी खाली उतरवावी.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: gudi padwa 2023 know about why kalash is downward on gudhi and significance of other major things

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.