Gudi Padwa 2024: श्रीराम नवरात्र साजरी करा रामरक्षा स्तोत्र पठणाने; मिळेल सिद्धी, होईल आजारातून मुक्ती!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 11:51 AM2024-04-02T11:51:38+5:302024-04-02T11:52:12+5:30
Ram Navami 2024: गुढी पाडवा ते रामनवमी हा कालावधी चैत्र नवरात्र तसेच रामाची नवरात्र म्हणून ओळखला जातो, या कालावधीत दिलेला उपाय अवश्य करा!
यंदा ९ एप्रिल २०२४ रोजी गुढी पाडवा आहे आणि त्या दिवसापासून चैत्र नवरात्र सुरू होत आहे, तिलाच राम नवरात्र असेही म्हणतात. कारण या कालावधीत प्रभू श्रीराम चंद्रानी दुष्ट रावणाचा वध करून सीता माई आणि लक्ष्मणासह १४ वर्षांचा वनवास संपवून अयोध्येत आगमन केले होते. तो दिवस उत्सवासारखा साजरा करण्यात आला होता. अयोध्यावासियांनी दारोदारी गुढ्या, तोरणं बांधून, रांगोळ्या काढून, सजावट करून श्रीरामांचे स्वागत केले होते. गुढी हे श्रीरामांच्या विजयाचे प्रतीक म्हणून उंचच उंच बांधले गेले. तेव्हापासून हा कालावधी श्रीराम नवरात्र म्हणून साजरा होऊ लागला.
यंदाही आपण श्रीराम नवरात्र साजरी करणार आहोत, पण थोड्या वेगळ्या पद्धतीने. राम नवमी निमित्त आपण उपासना करणार आहोत, पण त्यासाठी आधार घेऊया समाज माध्यमावर व्हायरल झालेल्या संदेशाचा! त्यात रामरक्षा स्तोत्र पठणाचे महत्त्व आणि ती सिद्ध कशी करता येईल याचा विधी दिला आहे तो समजून घ्या!
रामरक्षा कधी व किती वेळा म्हणावी?
रोज एकदा ठराविक ठिकाणी ठरावीक वेळी म्हटल्याने रामरक्षा सिद्ध होते. किंवा गुढीपाडवा ते रामनवमी ह्या काळात दररोज १३ वेळा रामरक्षा म्हटल्याने ती सिद्ध होते.
रामरक्षाचे इतर फायदे:
१) अशुभ शक्तीपासुन बचाव करते .
२) राहु - केतु महादशेचा त्रासातून मुक्ती मिळते.
३) कर्जमुक्ती व कर्जवसुली साठी फायदेशीर ठरते. त्यासाठी 'आपदामपहर्तारम....' हा श्लोक १ लक्ष वेळा म्हणल्याचे ऋणमुक्ती हे फळ मिळते.
४) रामरक्षेमध्ये प्रत्येक अवयवाचे स्वतंत्र पाठ आहेत त्या त्या पाठाचे सतत पठण केल्याने त्याचे स्वतंत्र फलित मिळते.
उदा: कौसल्याये दृशो पातु:....हा श्लोक सतत म्हटल्याने डोळ्यांचे विकार बरे होतात...ई.
रामरक्षेचे नियम :
>>रामरक्षा आपणांस जमेल तेव्हा वर्षभरातील कोणत्याही पोर्णिमेपासुन पठण करण्यास सुरुवात करणे लाभदायक ठरते.
>> रामरक्षा रोज एकदा ठरावीक ठिकाणी ठरावीक वेळीच म्हणावी. वेळ व जागा बदलु नये
>>तसेच त्या त्या आजारपणात अनुकूल श्लोकपठण केल्यास आजारपणातुनही मुक्ती मिळते.
>>ह्या श्लोकपठणाचे १५००० पाठ जप करणे.
>> जपाच्या बरोबरीने आजारी व्यक्तीच्या नावाने अभिमंत्रित केलेले " श्री रामरक्षा सिद्ध यंत्र " सतत जवळ ठेवावे. म्हणजे त्वरीत आजारपणातुन मुक्तता होते.
>>हातपाय धुवून, शुचिर्भूत होऊन रामरक्षा म्हणण्यास हरकत नाही.
>>कुमार वयातील मुलांनी तर रामरक्षा नित्याने अवश्य म्हणावी. त्यामुळे वाणीवर पण योग्य संस्कार होतात व नित्य रामरक्षा पठणाने शक्ति उत्पन्न होते व ती आपले सदा सर्वकाळ रक्षण करते. आबालवृद्धांनी पण नित्य रामरक्षा म्हणावी. त्याच्यापासून निश्चित फायदा आहेच.
रामरक्षेचे अनुपालन करण्याची पण पद्धत आहे.
कोणत्याही महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेपासून सुरुवात करून शुद्ध नवमीपर्यंत हे अनुष्ठान करतात. प्रतिपदेला एकदा, द्वितीयेला दोनदा याप्रमाणे चढत्या क्रमाने वाचून नवमीच्या दिवशी नऊवेळा रामरक्षेचा पाठ म्हणावा. अनुष्ठान म्हटले की त्याच्या यमनियमांचे पालन करणे झालेच. याचा अनुभव आल्याशिवाय राहात नाही.
श्रीरामरक्षा’ ह्या स्तोत्राचे महत्व काय?
श्रीरामरक्षा या शब्दाचा अर्थ रक्षणकर्ता राम असा आहे. प्रभु रामचंद्रांना ‘मर्यादा पुरुषोत्तम‘ असे म्हणतात. प्रभु रामचंद्रांचे चरित्र अवलोकन केल्यास आपल्या असे लक्षात येईल की, प्रभु रामचंद्रांनी राजा, पिता, बंधू, पति या सर्व नात्यांनी मर्यादा सांभाळून एक फार मोठा आदर्श घालून दिला आहे. बुधकौशिक ऋषिंच्या स्वप्नात जाऊन प्रत्यक्ष प्रभु रामचंद्रांनीच रामरक्षा हे स्तोत्र सांगितले आहे. त्यामुळे रामरक्षा स्तोत्रातील प्रत्येक अक्षर हे मंत्रमय व तारक असे आहे.