Gudi Padwa 2025: गुढीपाडव्यापासून चैत्रांगणाची रांगोळी काढा; धन-धान्य-संपत्तीत बरकत मिळवा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 16:00 IST2025-03-28T16:00:04+5:302025-03-28T16:00:39+5:30
Gudi Padwa 2025: यंदा रविवार ३० मार्च २०२५ पासून चैत्र मास सुरू होत आहे, त्या दिवसापासून अक्षय्य तृतीयेपर्यंत चैत्रांगण रेखाटण्याचे फायदे जाणून घ्या.

Gudi Padwa 2025: गुढीपाडव्यापासून चैत्रांगणाची रांगोळी काढा; धन-धान्य-संपत्तीत बरकत मिळवा!
हिंदू नवीन वर्षांची सुरुवात आपण गुढी उभारून करतो, त्याबरोबर दारात नक्षीदार रांगोळीसुद्धा काढतो. मात्र चैत्र मासात एक विशिष्ट रांगोळी काढली जाते, ती म्हणजे चैत्रांगणाची! गेरूने सारवलेल्या जमिनीवर पांढऱ्या शुभ्र रांगोळीने मंगलमयी प्रतीके रेखाटली जातात. पण ती का रेखाटायची, त्यामागे अर्थ काय आणि त्यामुळे वास्तूची भरभराट कशी होते ते या समाज माध्यमावर व्हायरल झालेल्या सुंदर संदेशातून जाणून घेऊ. यंदा ३० मार्च २०२५ रोजी गुढीपाडवा (Gudi Padwa 2025), हिंदू नवीन वर्षाची सुरुवात आणि चैत्र मासाचीही सुरुवात होत आहे. पुढील माहिती जाणून घेत ३० एप्रिल २०२५ ला अक्षय्य तृतीयेपर्यंत (Akshay Tritiya 2025) तुम्हीदेखी चैत्रांगण रेखाटा आणि लाभ मिळवा.
भारतीय संस्कृतीचा कलात्मक आविष्कार
>> सूर्य, चंद्र, दोन गौरी, स्वस्तिक, कमळ, शंख, चक्र, गदा, पाच कोनांची आकृती (पंचेंद्रियं), कर्मेद्रियं इत्यादी संस्कारक्षम अशा भारतीय संस्कृतीच्या ३३ प्रतीकांना या रांगोळीत स्थान असतं. ही रांगोळी म्हणजे आपल्या संस्कृतीचा कलात्मक आविष्कार असतो.
>> चैत्र हा चांद्र वर्षाचा पहिला मास. या महिन्याच्या पौर्णिमेच्या आसपास चित्रा नक्षत्र असतं. त्यावरून या महिन्याला ‘चैत्र’ असं नाव मिळालं आहे. निसर्गाला फुटणारी नवी पालवी, उन्हाळ्याची सुरुवात, चैत्रगौर याबराबर खास चैत्रात काढली जाणारी चैत्रांगण ही रांगोळी हे चैत्राचं वैशिष्ट्य समजलं जातं.
>> ही रांगोळी शुद्ध तृतीयेपासून अक्षय्यतृतीयेपर्यंत रोज सकाळी अंगणात काढली जाते. सूर्य, चंद्र, दोन गौरी, स्वस्तिक, कमळ, शंख, चक्र, गदा, पाच कोनांची आकृती (पंचेंद्रियं), कर्मेद्रियं इत्यादी संस्कारक्षम अशा भारतीय संस्कृतीच्या ३३ प्रतीकांना या रांगोळीत स्थान असतं. ही रांगोळी म्हणजे आपल्या संस्कृतीचा कलात्मक आविष्कार असतो.
>> चैत्रांगण रांगोळीची सुरुवातदेखील आंब्याच्या पानांचं तोरण काढण्यापासून होते. कारण हिंदू संस्कृतीत आंब्याच्या पानाचं तोरण बांधण्याची प्रथा आहे. सूर्यापासून घरातल्यांना ऊर्जा मिळावी, चंद्राची शीतलता मिळावी, चांदण्यातला आल्हाददायी अनुभव मिळावा या उद्देशानं आंब्याच्या तोरणानंतर या रांगोळीत चंद्र, सूर्य, चांदणी हे आकाशस्थ ग्रह काढले जातात.
>> प्राण्यांबद्दल मानवाचा असलेला कृतज्ञतेचा भाव ‘गोपद्माच्या’ प्रतीकातून प्रकट केला जातो.
>> घरात लक्ष्मीचं आगमन व्हावं आणि घरादाराची भरभराट व्हावी, या हेतूने ‘लक्ष्मीची पावलं’, ‘स्वस्तिक’ चैत्रांगणाच्या रांगोळीत रेखाटले जातात. सुलट स्वस्तिक मांगल्याचं शुभचिन्ह समजलं जातं, पण या रांगोळीत उलट स्वस्तिकही काढलं जातं. जीवन हे नेहमीच घड्याळाच्या काट्यासारखंच फिरेल असं नाही तर कधी कधी उलटय़ा दिशेनेही फिरतं. तेव्हा न डगमगता, निराश न होता संकटांवर मात करत पुढे जायचं, हाच अर्थ या प्रतीकातून व्यक्त होतो.
>> सौभाग्यलेणी म्हणून ‘करंडा, फणी, मंगळसूत्र’ रांगोळीत काढलं जातं. कमळ म्हणजे शोभा, वैभव, कीर्ती, मांगल्य यांचं प्रतीक. ‘ज्ञानकमळ’ म्हणजे ज्ञानाची जोपासना करणारं प्रतीक तर ‘नाभीकमळ’ म्हणजे जीवनाची उत्पत्ती, स्त्रीतत्त्व सांगणारं प्रतीक.
>> ‘पाळणा’ म्हणजे जन्मोत्सव, घरात जन्मलेल्या नवजात बाळाला आपण पाळण्यात घालतो तसंच देवांनासुद्धा पाळण्यात घालून जन्मोत्सव सोहळा करतो म्हणून पाळण्याचं रेखाटन केलं जातं.
>> 'तुळस' ही तर सासुरवाशीणीची सखी, मनातली सुखं-दु:खं हक्कानं सांगता येतील अशी जीवाभावाची मैत्रीण, औषधी गुणधर्म असलेली तुळस काढली जाते ती ‘तुळशी वृदांवनाच्या’ प्रतीकातून.
>> 'शंख' म्हणजे नाद, वीरश्री निर्माण करणारा. 'चक्र' म्हणजे सतत परिवर्तनाची जाणीव करून देणारं प्रतीक. तर 'गदा' म्हणजे शौर्याचं प्रतीक, म्हणूनच चैत्रांगणाच्या रांगोळीत ‘शंख-चक्र-गदा’ ही आयुधं काढली जातात.
>> ‘त्रिशूळ’ आणि ‘डमरू’ ही शंकर भगवानांची आयुधं. त्यामुळेच शरीरातला त्रिदोष म्हणजेच वात, पित्त, कफ याचं शमन करत ते त्रिशूल तर शब्दब्रह्माचं उगमस्थान असलेलं डमरूदेखील या रांगोळीत काढण्याची पद्धत आहे.
>> कुठल्याही मंगलप्रसंगी देवापुढे ‘कलश’ ठेवला जातो. कलशातलं पाणी म्हणजे जलतत्त्व तर नारळ हे जीवनाचा सन्मान करणारं असतं. तसंच तांब्या-भांडं हे अतिथीचं स्वागत करण्याचं साधन, म्हणूनच चैत्रांगणाच्या रांगोळीत कलश आणि तांब्या-भांडं काढलं जातं.
>> ‘कासव’ संथगतीनं चालूनदेखील विजयी होतं. कासव ज्याप्रमाणे आपले हात-पाय आवरून घेतं त्याचप्रमाणे आपणही आपले विकार आवरावेत, असा संदेश देणाऱ्या दीर्घायुषी प्राण्याचं, कासवाचं रांगोळीतून रूप रेखाटलं जातं.
>> ‘गरुड’ हे विष्णूचं वाहन. गगनाला गवसणी घालण्याचं सामर्थ्य घरातल्या सर्व सदस्यांना मिळावं, यासाठी गरुडाचं प्रतीक दारात काढलं जातं.
>> ‘सर्प’ हा बळीराजाचा खरा मित्र. त्याचं ऋण मान्य करण्यासाठी सर्पाची प्रतिमा काढली जाते.
>> ‘हत्ती’ म्हणजे वैभव. संपत्ती, गजान्तलक्ष्मी ही हत्तीवरून येते. हा हत्ती मुख्य दरवाजातूनच आत येतो. तेव्हा आपल्या घरात येणारी लक्ष्मीदेखील राजमार्गानंच यावी यासाठी दारातल्या रांगोळीत हत्ती काढला जातो.
>> चैत्रांगणातल्या रांगोळीत ‘पाच बाहुल्या’ काढल्या जातात. त्यांना कुणी पाच पांडव म्हणतं तर कुणी पंचकन्या. त्यांना पृथ्वी, आग, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतांचं प्रतीक समजलं जातं.
>> घरात देवाचं अधिष्ठान हे असलंच पाहिजे. देवाची जागा म्हणजेच हा 'देव्हारा' हेदेखील या रांगोळीतलं महत्त्वाचं आहे. तर भक्ती आणि श्रद्धा यांचं बलस्थान म्हणजे ‘पालखी’ सगळ्यात शेवटचं आणि तेहत्तीसावं प्रतीक म्हणजे ‘वेल’. वंशविस्ताराचं प्रतीक असलेला हा वेल काढल्यानं घराण्याचा वंश पिढ्यान् पिढ्या वाढत राहतो, अशी श्रद्धा आहे.
>> चैत्रांगणाची वैशिष्ट्यपूर्ण रांगोळी रेखाटली जाते ती या अर्थपूर्ण अशा तेहत्तीस प्रतीकांच्या सहाय्यानं. प्रत्येक प्रतीकातलं श्रेष्ठत्व आपल्या घरात आणि घरातल्या प्रत्येक सदस्यानं आत्मसात करावं हाच एक निर्भेळ हेतू असतो.
>> ही चैत्रांगणाची रांगोळी अंगणात रेखाटण्यामागचा अंगण नसलेल्या टोलेजंग इमारतींच्या जंगलात दारात नाही तर नाही निदान बाल्कनीच्या कडप्प्यावर तरी ही चैत्रांगणाची रांगोळी रेखाटण्याचा प्रयत्न केला तर रांगोळीतून कला सादर करण्याबरोबरच सांस्कृतिक वारसा जतन केल्याचा आनंदही मिळेल.
Gudi Padwa 2025: वर्षभरात काय घडणार, हे पंचांग वाचून कळणार; गुढीपाडव्याला करा पंचांग वाचन!