Gudi Padwa 2025: संतानप्राप्तीसाठी गुढीपाडव्यापासून केले जाते संतान गोपालकृष्ण व्रत; जाणून घ्या व्रतविधी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 14:20 IST2025-03-27T14:19:59+5:302025-03-27T14:20:52+5:30
Gudi Padwa 2025: वैद्यकीय उपचाराबरोबर अनेक जोडपी उपासनेची जोड म्हणून हे अत्यंत प्रभावी व्रत करतात, अनेकांना त्याचा लाभही झाला आहे; त्या व्रताची माहिती.

Gudi Padwa 2025: संतानप्राप्तीसाठी गुढीपाडव्यापासून केले जाते संतान गोपालकृष्ण व्रत; जाणून घ्या व्रतविधी!
>> मृदुला विजय हब्बु
लग्न होऊन अनेक वर्षे झाली तरी मूल झालेले नसते. पतिपत्निच्या पत्रिकांमध्ये सुद्धा काहीही दोष नसतो तरी मूल होत नाही. अशी अनेक जोडपी असतात. त्यांना खूप दुःख होते. त्यांच्यासाठी हे संतान गोपालकृष्ण व्रत उपयुक्त ठरते. जाणून घेऊया व्रतविधी.
संतान गोपालकृष्ण व्रतविधी :
अंघोळ करून शुद्ध सोवळ्यात सकाळीच ही पूजा करावी. यासाठी देवघरात एका बाजूला आधी रांगोळीने कृष्णाचा पाळणा काढून घ्यावा. ही रांगोळी रोज नवी काढावी. चार ओळी चार बाजुंनी घालून टोक जोडून घ्यावे. मधोमध श्री लिहावे. चारही बाजूंनी हळद कुंकू वाहावे. नंतर मधोमध एका वाटीत बाळकृष्ण ठेवावा. पहिल्या दिवशी व्रत सुरू करताना संकल्प करावा. आचमन करुन देश काल उच्चारून 'श्रीकृष्ण प्रेरणया पुत्रसंतान प्राप्ती प्रित्यर्थं संतानगोपालकृष्ण व्रतं करिष्ये' असे म्हणून ताम्हनात पाणी सोडावे. आपली सर्व पापकर्मे नाश होऊन संतान प्राप्त व्हावे असे देवाकडे मागणे मागावे.
सर्वात प्रथम कृष्णाला आवाहन करावे. यासाठी थोड्या अक्षता हातात घेऊन कृष्णावर वाहाव्यात आणि 'आवाहनं करिष्ये' असे म्हणावे. नंतर षोडशोपचार पूजा करावी जसे आवाहन, आसन, पादप्रक्षालन, अर्घ्य, आचमन स्नान हे सर्व बाळकृष्णाच्या मुर्तीवर करावे. म्हणजेच बाळकृष्णावर तीर्थाच्या पळीने 'पादप्रक्षालन समर्पयामी', 'अर्घ्यं समर्पयामी' म्हणत पाणी घालावे. आचमनासाठी पाणी घालावे, नंतर स्नान म्हणूनही कृष्णावर पाण्याने अभिषेक करावा. वाटीत साचलेले पाणी तुळशीमध्ये घालावे. कृष्णाला पुसून देव्हाऱ्यात ठेवावे. नंतर सोळा मण्यांचे गेजेवस्त्र अधिक दोन उपवस्त्र असे एकूण १८मण्यांचे वस्त्र श्रीकृष्णाला वहावे. त्यानंतर गंध, अक्षता, हळद कुंकू तुळस पुष्प इत्यादी वाहून कृष्णाची पूजा करावी. आपण काय वाहत आहोत त्याचा उच्चार करून 'समर्पयामि' म्हणावे. पारिजात, चाफा, मोगरा इत्यादी सुवासिक पुष्पे वहावी. तुपाचे दोन दिवे लावावे. धूप लावावा. एका चांदीच्या वाटीत दुध साखरेचा नैवेद्य दाखवावा. पूजा झाल्यानंतर हा नैवेद्य व्रत केलेल्या व्यक्तीने ग्रहण करावा, इतर कोणालाही प्रसाद म्हणून देऊ नये. कृष्णाची आरतीही करावी. भगवंताला आरती अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे नित्य आरती करणे श्रेष्ठ. आरतीच्या ताटातल्या अक्षता कृष्णावर वाहाव्या. आरती खाली ठेवताना ताम्हनाखाली अक्षता ठेवून त्याच्यावर आरतीचे ताट ठेवावे.
आरती झाल्यावर स्वतःभोवती प्रदक्षिणा घालून कृष्णाला नमस्कार करावा. त्यानंतर गोपाल कृष्णाचे १०८ कडव्याचे स्तोत्र म्हणावे. त्याबरोबरच 'गर्भरक्षाकर स्तोत्र' १०८ वेळा म्हणावे. हा मंत्र गर्भाचे रक्षण करतो.
व्रत नियम :
मधेच मासिक धर्म आला तर चार दिवस जाऊ द्यावेत. पाचव्या दिवशी पुन्हा व्रत सुरु करावे. मध्ये जर परगावी जाण्याचा प्रसंग आला तर स्तोत्र मंत्र सुरु ठेवावेत. एकादशीच्या दिवशी पुजा करावी, स्तोत्र मंत्र पारायण करावे, त्यादिवशी नैवेद्य दाखवू नये.
व्रत सुरु करण्याची योग्य वेळ :
हे व्रत कुठल्याही शुभदिनी सुरु करता येते. तरीदेखील गुढीपाडव्याला हिंदू नववर्षारंभी या व्रताची सुरुवात करणे इष्ट ठरते. काहीजण ४९ दिवस हे व्रत करतात तर काही जण गर्भधारणा होईपर्यंत करतात. व्रत समाप्तीच्या दिवशी नित्य पूजा करून गोड नैवेद्य देवाला दाखवून दाम्पत्य भोजन करवून समाप्ती करावी. यंदा ३० मार्च रोजी गुढीपाडवा(Gudhi Padwa 2025) आहे, त्या मुहूर्तावर हे व्रत सुरू करायचे असल्यास सदर माहिती उपयुक्त ठरू शकेल.
'देहि मे तनयं कृष्ण त्वामहं शरणं गतः' असे म्हणून पुरुषांनी ११ वेळा 'ॐ नमो भगवते वासुदेवाय' आणि स्त्रियांनी 'श्रीं कृष्णाय नमः' ११ वेळा मंत्र म्हणावा. त्यानंतर संपूर्ण 'संतान-गोपाळकृष्ण-स्तोत्र' म्हणावे आणि स्तोत्र म्हणून झाल्यावर पुढील गर्भरक्षक मंत्र म्हणावा.
गर्भरक्षक मंत्र
कृष्ण कृष्ण हरे कृष्ण दैत्य नाशक केशव |
क्लेशं निवार्य सकलं गर्भ रक्षां कुरु प्रभो ||
भक्तिभावाने हे व्रत केले असता लाभ होतो, असा अनेक भाविकांचा अनुभव आहे.