Gudi Padwa 2025: वर्षभरात काय घडणार, हे पंचांग वाचून कळणार; गुढीपाडव्याला करा पंचांग वाचन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 07:05 IST2025-03-28T07:00:00+5:302025-03-28T07:05:01+5:30

Gudi Padwa 2025: हिंदू नववर्षाच्या दिवशी पंचांग वाचन आणि पूजनकेल्याने काय साध्य होते ते जाणून घ्या.

Gudi Padwa 2025: What will happen in the year, you will know by reading the Panchang; Read the Panchang on Gudi Padwa! | Gudi Padwa 2025: वर्षभरात काय घडणार, हे पंचांग वाचून कळणार; गुढीपाडव्याला करा पंचांग वाचन!

Gudi Padwa 2025: वर्षभरात काय घडणार, हे पंचांग वाचून कळणार; गुढीपाडव्याला करा पंचांग वाचन!

हिंदूंचे नव वर्ष चैत्र शुद्ध प्रतिपदेला सुरू होते. हा दिवस गुढी पाडवा या सणाने सुरू होतो. यंदा ३० मार्च २०२५ रोजी गुढी पाडवा (Gudhi Padwa 2025) आहे. वर्ष सुरू होण्याआधीच बाजारात नवीन वर्षाचे पंचांग उपलब्ध होते. पूर्वी आतासारखी घरोघरी दिनदर्शिका नसे. त्यामुळे तिथी, काळ, नक्षत्र, मुहूर्त सारे काही पंचांगावरूनच कळत असे. त्यामागे शास्त्रकारांचा गाढ अभ्यास होता. पूर्वी मुद्रणकला अस्तित्त्वात नसताना पंचांग हस्तलिखित होते. गावातील जोशी, पुराणिक गुढी पाडव्याच्या दिवशी घरोघरी जाऊन यजमानांना पंचांग वाचून दाखवत असत. मोबदल्यात यजमान त्यांना शिधा, दक्षिणा देत असत. कारण तेच त्यांच्या उदरनिर्वाहाचे माध्यम होते.

शास्त्रीजींच्या पंचांग वाचनामुळे गावकऱ्यांच्या ज्ञानात भर पडत असे. महिना कधी बदलणार आहे, सण, उत्सव कधी येणार आहेत, ग्रहण कधी आहे, केव्हा आहे, अधिकमास आहे का , असेल तर तो केव्हा आणि कोणत्या महिन्यात आहे याची माहिती वर्षारंभी करून घेत असत. त्यानुसार लोकांचे कामाचे वार्षिक नियोजन होत असे. 

आता आपण इंग्रजी नवीन वर्षानुसार दिनदर्शिका आणतो आणि सण वारांची दखल घेण्याआधी वर्षभरात किती सुट्ट्या मिळणार यांची आकडेवारी काढतो. याचे कारण, कामापेक्षा आपल्याला सुट्यांची ओढ जास्त असते. आवडीचे काम नसले, की कामात केवळ रतीब टाकला जातो, गुणवत्ता उरत नाही. 

परंतु पूर्वी तसे नव्हते. प्रत्येक जण आपल्या आवडीचे काम निष्ठेने, प्रामाणिकपणे आणि श्रद्धेने करत असल्यामुळे कामाचा कंटाळा आणि सुटीची ओढ नव्हती. सण-वार, उत्सव ही तर दुप्पट काम करण्याची आणि कमाई करण्याची पर्वणी असे. त्यामुळे कामात गुणवत्ता आणि समाजात सुख समाधानाचे वातावरण असे. 

याच श्रद्धेने लोक वर्षारंभी सर्व सणांचा आढावा घेऊन कामाची आणि घरगुती समारंभाची आखणी करत असत. पंचांग श्रवणामुळे गंगास्नानाचे पुण्य लाभते, आयुष्य वाढते, पापांचा नाश होतो, अशीही लोकांची श्रद्धा असे. म्हणून दरवर्षी वर्षारंभी पंचांग वाचनाचा किंवा श्रवणाचा कार्यक्रम ठरलेला असे. 

आपण दरदिवशी दिनदर्शिका पाहतोच, परंतु वर्षारंभी पंचांगातील सुरुवातीचे वार्षिक फल वाचून आपणही आपली परंपरा जपूया. नव्या पिढीच्या हाती पंचांग सोपवून त्यांच्याकडून वाचन करून घेत आपल्या समृद्ध परंपरेशी नाळ जोडण्याचा प्रयत्न करूया.

Web Title: Gudi Padwa 2025: What will happen in the year, you will know by reading the Panchang; Read the Panchang on Gudi Padwa!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.