गुरु हाच परमात्मा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 11:37 AM2020-12-09T11:37:41+5:302020-12-09T11:37:58+5:30

अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक परब्रह्मरुप परमात्मा आहे.

Guru is the divine | गुरु हाच परमात्मा!

गुरु हाच परमात्मा!

googlenewsNext

 " अनंतकोटी ब्रह्मांडनायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद समर्थ सदगुरू महाराज की जय" हा जयघोष करतो आम्ही सदगुरुंबद्दल. पण खरोखर अतिशय शांत चित्ताने याचा गहिरा अर्थ समजतो तर कबीरजींचे शब्द आमचे हृदयांत बिंबु शकतात. ते शब्द आहेत
              गुरु गोविंद दोऊ एक है,  दुजा सब आकार ।
                आपा मैटे हरि भजेै तब पावै दीदार ॥

 खरे तर आम्ही इतके विज्ञान प्रगत होऊनही आमची पृथ्वी असलेल्या ब्रह्मांडाबद्दल अजून आम्हाला पूर्ण समजलेले नाही. कारण आम्ही ज्या पृथ्वीवर राहतो, ती पृथ्वी केवळ सूर्याचे जे सौर मंडळ आहे त्याचा हिस्सा आहे व सौर मंडळ आमच्या ब्रह्मांडाचा छोटा हिस्सा आहे. आमचा पिता असलेल्या सूर्यासारखे असंख्य तारे या ब्रह्नांडात आहेत. वैदिक काळातच ज्ञानियांनी अनंतकोटी ब्रह्नांड असल्याची घोषणा केली आहे. कोट्यावधी ब्रह्नांड ज्याचा अंत नाही. विज्ञानही मानते आमच्या ब्रह्मांडाशिवायही अनेक ब्रह्मांड आहेत. मग आमच्या पृथ्वीपुरते नाही तर या अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक परब्रह्मरुप परमात्मा आहे. परब्रह्म परमात्मस्वरुप झाल्यानेच सदगुरुही ब्रह्मांडनायकच आहेत, परब्रह्मस्वरुप आहेत.  
                  कबीरजी म्हणतात, परमात्मा निर्गुण निराकार आहे. हा परमात्माच देहधारी सदगुरु आहे.  
        असे म्हणता येईल परमात्मा आकार धारण करुनच सदगुरु होतो व सदगुरु निराकाररुप होऊन परमात्मा होतो.  सदगुरुंचे देहधारी असणे हेच भक्तांचे परम सौभाग्य ठरते. कारण निर्गुण परमात्म्याची ओळख आम्हा देहधारींना शक्य नाही. आधी सदगुरु परब्रह्म परमात्मास्वरुप झाले, जाणले  परमात्म्याशी एकरुप होऊन की मीही परमात्मस्वरुप आहे. मग परमात्म्याची ती दिव्यता आम्हाला आपल्या रुपाने सांगितली. म्हणून कबीरजी म्हणतात एका दोह्यात की, मला गुरुमुळे गोविंदाची ओळख झाली, त्या देवाची ओळख झाली. म्हणून गुरु व देव सोबत उभे असले तर मी आधी गुरुचे पाय धरील. 
                 एकनाथ महाराजांचा कबीरजींचे दोह्याचे समान एक अभंग आहे. खूप मिळता जुळता आहे.
             गुरु परमात्मा परेशु । ऐसा ज्याचा दृढ विश्वासु ॥
             देव तयाचा अंकिला । स्वयें संचरा त्याचे घरा ॥
             एका जनार्दनी गुरु देव । येथें नाही बा संशय ॥

गुरु हाच परमात्मा आहे. परेशु आहे अर्थात परम ईश आहे.
असा ज्या भक्ताचा दृढ विश्वास झाला तर तो देव परमात्मा स्वतः त्या भक्ताचे हृदयघरी संचार करु लागतो. गुरु जनार्दन स्वामीचे शिष्य एका म्हणजे एकनाथ म्हणतात गुरु हाच देव आहे, परमात्मा आहे यात काही संदेहच नाही. कबीरजीही हेच म्हणत आहेत,
              गुरु गोविंद दोऊ एक है,  दुजा सब आकार ।
गुरु व गोविंद परमात्मा दोघेही एक आहेत.  हे दोघे सोडून बाकी सर्व आकार आहेत, मूर्त आहेत. अवघा संसार मूर्त आहे. आम्ही शरीररुपानेच आकारात येतो. मूर्तामध्ये येतो. त्यामुळे आम्ही आकारच पाहू शकतो. मूर्त पाहू शकतो. अमूर्त वा निराकार नाही पाहू शकत. सदगुरुंनाही आम्ही आकाररुपानेच स्मरणात ठेवतो. मग निराकारास कसे पाहावे ? क्षमता आहे निराकार स्वरुपाला जाणण्याची, पण तरी नाही पाहू शकत. कसे पाहता येईल ? तेच सांगत आहेत कबीरजी.
            आपा मैटे हरि भजेै तब पावै दीदार ॥
आपा मैटे, आपण मिटलो व हरि स्मरण केले तब पावे दीदार. तेव्हाच दर्शन होईल निराकाराचे. मी सदगुरुला मूर्ती स्वरुपात, आकारात पाहतो, कारण मीच मूर्त आहे, आकारात आहे. कारण  "मी "आहे हेच त्या आकाराचे कारण आहे. मी आहे हा अहं, हा अहंकारच माझ्या आकाराचे कारण आहे. मी निराकार आहे हे मला जन्मल्या पासूनच माहित नाही. कारण जन्मच आकाराने आहे. या आकाराचे नांव आहे,  परिवार आहे, गांव आहे, शहर आहे, राज्य आहे व देश आहे. मग या आकाराची जात आहे, धर्म आहे, सत्ता संपत्ती आहे हे सर्व आपा आहे,माझे आहे, मी चे आहे. ह्या सर्व आपमध्ये कोठेही मला आकाराशिवाय निराकार दिसतच नाही. कारण या सर्व आकारांचेच माझे रात्रंदिवस चिंतन आहे, तेव्हा मला आकाराशिवाय अन्य काही दिसणे नाही. मग माझ्या गुरुलाही मी आकाराबाहेर पाहू शकत नाही. यद्यपि मी जयघोष करतो माझे गुरु निराकार परब्रह्मस्वरुप असल्याचा. पण मला 
 दर्शन नाही त्यांचे परब्रह्म स्वरुपाचे.  सदगुरुकृपेने शक्य आहे. मात्र त्यासाठी  मलाही काही करावे लागेल.    
                 म्हणून कबीरजी म्हणतात, आपा मैटे हरि भजेै तब पावै दीदार. होईल निराकाराचा दीदार, होईल निराकाराचे दर्शन वा भेट. पण तेव्हां जेव्हां हा आपा मैटे. मी मिटेल व या मी च्या मिटण्यातून जेव्हा हरिच आहे सर्वत्र निराकार रुपाने या भावनेने भक्ती होईल, भजन होईल, ध्यान होईल, हरिशिवाय अन्य नाही दुजे हा भाव होईल. कबीरजी म्हणतात तेव्हा परमात्मा व गुरु एकच आहेत याचे दर्शन होईल.

 -    शं.ना.बेंडे पाटील

Web Title: Guru is the divine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.