Guru Pradosh 2024: कर्जमुक्त आयुष्यासाठी करा गुरु प्रदोष व्रत; दाखवा दही भाताचा नैवेद्य!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 11:59 AM2024-11-27T11:59:20+5:302024-11-27T11:59:43+5:30
Guru Pradosh 2024: २८ नोव्हेंबर रोजी गुरु प्रदोष आहे, यादीवशी हे व्रत का आणि कसं करायचं आणि त्याचे लाभ कोणकोणते याबद्दल जाणून घेऊ.
दर महिन्यात दोन पक्ष येतात कृष्ण पक्ष आणि शुद्ध पक्ष. प्रत्येक पक्षातील त्रयोदशीला सूर्यास्त झाल्यानंतर रात्र होण्याच्या पूर्वीचा कालावधी म्हणजे प्रदोष काळ होय. प्रदोष काळ म्हणजेच गोधुली बेला (सूर्यास्ताच्या वेळी) या दरम्यान पूजा केल्यास प्रदोष व्रत अधिक शुभ मानले जाते. २८ नोव्हेंबर रोजी गुरु प्रदोष(Guru Pradosh 2024) आहे, यादीवशी हे व्रत कसे करायचे आणि त्याचे लाभ कोणते, याबद्दल जाणून घेऊ.
प्रदोष पूजा मुहूर्त: २८ नोव्हेंबर संध्याकाळी ६.४६ ते रात्री ९ पर्यंत
प्रदोष व्रत भोलेशंकर भगवान शिव यांना समर्पित असल्याचे मानले जाते. प्रदोष व्रत हे प्रत्येक वारानुसार वेगवेगळे फळ देणारे असते. हे व्रत केल्यामुळे भाग्य, आरोग्य, संपत्ती, आनंद, शांती, प्रेम, कर्जमुक्ती आणि बरेच शुभ परिणाम मिळतात तसेच सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. प्रदोषाच्या दिवशी भगवान शिव, देवी पार्वती, भगवान गणेश आणि कार्तिकेय यांची पूजा केली जाते.
पौराणिक कथा : असे म्हणतात, की हे व्रत सर्वप्रथम चंद्र देवाने केले होते. त्याला क्षयरोग झाला होता. भगवान शिवाला प्रसन्न करून त्याने दिसामासाने कमी होण्याबरोबर दिसामासाने वृद्धिंगत होण्याचा वर मागून घेतला.
अनेक कुटुंबात हे व्रत पिढ्यानपिढ्या केले जाते. या व्रतामुळे माणसाचे कौटुंबिक व ऐहिक जीवन सुखाचे होते. एवढेच नाही तर भक्ती व उपासनेत प्रगती होऊन पारमार्थिक आनंद मिळतो. भौम प्रदोषामुळे आर्थिक प्रश्न सुटतात. धनप्राप्ती होऊन कर्जबाजारीपणा दूर होतो. शनी प्रदोषामुळे संतान प्राप्ती होते. संतानाचे दोष दूर होतात. हे व्रत शक्यतो उत्तरायणात सुरू करतात. कारण हा काळ पारमार्थिक दृष्ट्या इष्ट काल मानला जातो. हे व्रत स्त्री-पुरुष दोघेही करू शकतात.
प्रदोषाच्या दिवशी पूर्ण दिवस उपास करून सूर्यास्ताच्या वेळी शिवपूजा करतात. भोलेनाथाला दही भाताचा नैवेद्य दाखवून तो नैवेद्य गायीला किंवा गरजू व्यक्तीला दान करतात मग घरी येऊन उपास सोडतात.