Guru pradosh 2024: आज गुरु प्रदोष; राशीनुसार सांगितलेल्या वस्तू महादेवाला अर्पण करा आणि लाभ मिळवा!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2024 01:01 PM2024-08-01T13:01:18+5:302024-08-01T13:01:44+5:30
Guru Pradosh 2024: आज गुरु प्रदोष, उद्या मासिक शिवरात्री आणि येत्या सोमवारपासून श्रावणाची सुरुवात; त्यानिमित्ताने विशेष शिव उपासना!
सर्व दोषातून मुक्त करणारे व्रत म्हणजे प्रदोष व्रत आणि भगवान महादेवाची प्रिय तिथी म्हणजे शिवरात्री. तसेच महादेवाच्या उपासनेचा संपूर्ण महिना म्हणजे श्रावण मास, हे तिन्ही योग एकापाठोपाठ एक आल्यामुळे शिव उपासनेची संधी दवडू नका.
प्रदोष व्रत हे ज्योतिष शास्त्रात अत्यंत महत्त्वाचे व्रत मानले जाते. प्रदोष व्रत भोलेशंकर भगवान शिव यांना समर्पित असल्याचे मानले जाते. प्रदोष व्रत हे प्रत्येक वारानुसार वेगवेगळे फळ देणारे असते. हे व्रत केल्यामुळे भाग्य, आरोग्य, संपत्ती, आनंद, शांती, प्रेम, कर्जमुक्ती आणि बरेच शुभ परिणाम मिळतात तसेच सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. प्रदोषाच्या दिवशी भगवान शिव, देवी पार्वती, भगवान गणेश आणि कार्तिकेय यांची पूजा केली जाते.
गुरु प्रदोष निमित्ताने आपण शिव उपासने बरोबरच गुरु उपासना देखील केली पाहिजे आणि पुढे दिलेल्या गोष्टी राशीनुसार भोलेनाथाला अर्पण केल्या पाहिजेत.
मेष: मेष राशीच्या लोकांनी भगवान शंकराला चंदनाचे गंध लावावे आणि 'ओम नमः शिवाय' मंत्रजप १०८ वेळा करावा.
वृषभ : वृषभ राशीच्या लोकांनी भगवान शंकराला दूध आणि पवित्र धागा अर्पण करावा. महादेवाचा श्लोक म्हणून तो धागा उजव्या मनगटाला बांधावा.
मिथुन: मिथुन राशीच्या लोकांनी प्रदोष व्रताच्या दिवशी भोलेनाथांना बेलपत्र अर्पण करावे.
कर्क : कर्क राशीच्या लोकांनी प्रदोष व्रताला भगवान शंकराला बेल आणि पांढरी फुलं अर्पण करून शिवजप करावा.
सिंह : सिंह राशीच्या लोकांनी या तिथीला महादेवाला गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा.
कन्या : कन्या राशीच्या लोकांनी भगवान शंकराला दूध पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक घालावा.
तूळ : तूळ राशीच्या लोकांनी प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शंकराला मध, पांढरे चंदन आणि बेलाचे पान अर्पण करावे.
वृश्चिक: वृश्चिक राशीच्या लोकांनी या शुभ मुहूर्तावर भोलेनाथांना लाल धागा अर्पण करावा आणि प्रसाद रुपी आपल्या उजव्या मनगटावर बांधून घ्यावा.
धनु: धनु राशीच्या लोकांनी या शुभ दिवशी भगवान शंकराला केशर मिश्रित जल अर्पण करावे.
मकर : मकर राशीच्या लोकांनी प्रदोष व्रताच्या दिवशी शिवाला निळी फुले आणि शमीची पाने अर्पण करावीत.
कुंभ : कुंभ राशीच्या लोकांनी या तिथीला भगवान शंकराला काळे तीळ अर्पण करावेत.
मीन: मीन राशीच्या लोकांनी प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान भोलेनाथांना नागकेसरचे फूल अर्पण करावे, ते मिळत नसल्यास कोणतेही पांढरे फुल अर्पण करावे.