गुरुप्रतिपदा दिवसाचे महत्त्व काय? ही तिथी का साजरी करतात? पाहा, महात्म्य अन् काही मान्यता...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 12:29 IST2025-02-12T12:29:00+5:302025-02-12T12:29:34+5:30

Guru Pratipada 2025: यंदा गुरुवारी गुरुप्रतिपदा आल्याने या दिवसाचे महत्त्व वाढले असून, या दिवशी केलेले गुरुस्मरण अतिशय पुण्यदायी मानले गेले आहे. जाणून घ्या...

guru pratipada 2025 what is the importance of gurupratipada why is this day celebrated know about significance in marathi | गुरुप्रतिपदा दिवसाचे महत्त्व काय? ही तिथी का साजरी करतात? पाहा, महात्म्य अन् काही मान्यता...

गुरुप्रतिपदा दिवसाचे महत्त्व काय? ही तिथी का साजरी करतात? पाहा, महात्म्य अन् काही मान्यता...

Guru Pratipada 2025: भारतीय संस्कृती आणि परंपरा यांमध्ये अनेक गोष्टींना अनन्य साधारण महत्त्व आहे. मराठी महिन्यात येणाऱ्या तिथी, त्या तिथींवर साजरे केले जाणारे सण-उत्सव, व्रत-वैकल्ये आणि त्यांचे महात्म्य वैशिष्ट्यपूर्ण आहे. माघ महिना हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यात अनेक व्रते, सण तसेच काही तिथी विशेषत्वाने साजऱ्या केल्या जातात. त्यापैकी एक म्हणजे माघ पौर्णिमा झाल्यावर येणारी माघ वद्य प्रतिपदा. या दिवशी गुरुप्रतिपदा असते. गुरुप्रतिपदा दिवसाचे महत्त्व, मान्यता आणि ही तिथी साजरी करण्याचे कारण जाणून घेऊया...

ब्रह्मांडनायक असलेल्या दत्तगुरुंचे अनेक अवतार, अंशावतार झाले. प्रथम श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या दिव्य अवतारानंतर दत्तगुरूंचा श्रीनृसिंह सरस्वती महाराजांचा अवतार झाला. माघ कृष्ण प्रतिपदा या तिथीला अतीव प्रेमादराने "श्रीगुरुप्रतिपदा" असे संबोधले जाते. द्वितीय श्रीदत्तावतार भगवान श्री नृसिंहसरस्वती स्वामी महाराजांनी याच पावन तिथीला शैल्यगमन केले होते. श्रीगुरुप्रतिदा हा खूप वैशिष्ट्यपूर्ण उत्सव आहे. याच पुण्यपावन तिथीला अनेक उत्सव असतात. अशा सर्व सुयोगांमुळे श्रीगुरुप्रतिपदा ही फार विशेष पुण्य-तिथी असून सर्वच गुरु संप्रदायांमध्ये मोठ्या प्रमाणावर साजरी होते. गुरु प्रतिपदा या दिवशी श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराज कर्दळी वनात गुप्त झाले निजगमनास जातांना स्वतःच्या निर्गुण पादुका स्वामींनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे सेवेकरिता ठेवल्या, असे सांगितले जाते. 

श्रीनृसिंह सरस्वती महाराजांनी केली अवतार समाप्ती 

श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी श्रीक्षेत्र गाणगापूर येथे आपल्या 'निर्गुण पादुका' स्थापन करून शैल्यगमन केले होते. म्हणून हा उत्सव गाणगापूरला खूप भव्य दिव्य स्वरूपात साजरा होत असतो हा दिवस श्री क्षेत्र गाणगापूर येथे फार मोठ्या प्रमाणात साजरा होतो. भगवान श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी कृष्णातीरावरील श्रीक्षेत्र औदुंबर येथे एक चातुर्मास वास्तव्य झाल्यावर आपल्या 'विमल पादुका' स्थापन करून वाडीला गमन केले होते. ते श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे बारा वर्षे राहिले व अनेक लीला केल्या. तेथून त्यांनी अश्विन कृष्ण द्वादशी, श्रीगुरुद्वादशीच्या मुहूर्तावर आपल्या 'मनोहर पादुका' स्थापन करून गाणगापुरकडे प्रयाण केले. गाणगापूर येथे चोवीस वर्षे वास्तव्य करून आजच्या पावन तिथीला आपल्या 'निर्गुण पादुका' स्थापन करून ते लौकिक अर्थाने श्रीशैल्य मल्लिकार्जुन क्षेत्री जाऊन अदृश्य झाले. त्यांनी आपला देह ठेवलेला नाही, ते फक्त अदृश्य झालेले आहेत, हा एक दुर्मिळ योगच म्हणावा लागेल.

श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे शैल्यगमनापूर्वी भक्तांना अभयवचन

भगवान श्रीगुरु नृसिंहसरस्वती सरस्वती स्वामी महाराजांचेच साक्षात् स्वरूप असणाऱ्या या तिन्ही पादुकांना विशेष नावे आहेत. विमल पादुका व मनोहर पादुका या पाषाणाच्या असून, निर्गुण पादुका कशापासून बनलेल्या आहेत, हे कोणालाच माहीत नाही. विमल पादुका सोडता बाकी दोन्ही पादुकांच्या नावांचे संदर्भ श्रीगुरुचरित्रात पाहायला मिळतात. किंबहुना श्रीगुरुचरित्रातील उल्लेखांमुळेच त्यांची ही नावे रूढ झालेली आहेत. औदुंबर येथे भगवान श्री नृसिंहसरस्वती स्वामी महाराजांनी एक चातुर्मास आपल्या अनुष्ठानात व्यतीत केला होता. त्यांच्या त्या एकांतवासाचा संदर्भ घेऊनच औदुंबर येथील पादुकांना विमल पादुका म्हणत असावेत. पण या नावाचा उल्लेख श्रीगुरुचरित्रात नाही. विमल म्हणजे अत्यंत शुद्ध, कोणताही मल, दोष नसणाऱ्या पादुका. देव वाडी सोडून निघाल्यामुळे दु:खी झालेल्या चौसष्ट योगिनींची समजूत घालताना स्वामी महाराज म्हणतात की, जे कोणी भक्त तुम्हां योगिनींसहित आमच्या मनोहर पादुकांची मनोभावे पूजा, सेवा करतील त्यांना इच्छित गोष्ट नक्कीच मिळेल. श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी शैल्यगमनापूर्वी भक्तांना अभयवचन दिले आहे.

निर्गुण पादुकांची मनोभावे पूजा करावी

भीमा अमरजा संगमावरील कल्पवृक्षसम अश्वत्थाची पूजा करून आमच्या मठस्थानातील निर्गुण पादुकांची मनोभावे पूजा करावी, असे स्वत: श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी म्हणतात. श्रीक्षेत्र गाणगापूर येथील निर्गुण पादुका मात्र अत्यंत अद्भुत व विलक्षण आहेत. या पादुका कशापासून बनवलेल्या आहेत, हे आजवर कोणालाही कळू शकलेले नाही. श्री गुरु श्रीशैल्यास जाताना भक्तांना आश्वासन दिले की, ४ प्रसाद पुष्प येतील ती मुख्य शिष्यानी घ्यावी. यापैकी एक पुष्प श्री सायंदेवास मिळाले होते. अनेक दत्त अवतारी सत्पुरुषांना हे गुरुचरित्राच्या मूळ प्रतीवर कडगंची येथे ठेवल्याचे दर्शन झाले. आणखीन एक पुष्प नंदी नामक शिष्यास मिळालेले तेही त्यांचे वंशजांनी प्रासादिक म्हणून ठेवलेले आढळते. 

|| दत्त दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, नृसिंह सरस्वती दिगंबरा ||

|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||

 

Web Title: guru pratipada 2025 what is the importance of gurupratipada why is this day celebrated know about significance in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.