Guru purnima 2021 : ईश्वरी शक्तीची प्रचिती देणारा गाणगापुरातील मंदिराचा 'हा' प्रसंग!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 08:00 AM2021-07-23T08:00:00+5:302021-07-23T08:00:12+5:30
Guru Purnima 2021: आज गुरु पौर्णिमा, त्यानिमित्त गुरु चरणांची ही मानस पूजा!
श्रीगुरु नृसिंहसरस्वती महाराष्ट्रातील नृसिंहवाडीला १२ वर्षे राहून व कार्य करून नंतर येथे पुढील कार्यासाठी आले. फार काळ येथे कार्य करीत राहिल्याने या भूमीला त्यांची कर्मभूमी म्हणतात. कार्य जाल्यावर ते श्रीशैल्यपर्वतावर निघून गेले. ते श्रीशैल्यपर्वतावर जाताना त्यांच्या भक्तांना खूप दु:खं झाले. तेव्हा भक्तांना पूजा करण्यासाठी त्यांनी निर्गुण-निर्लेप अशा जिवंत पादुका त्यांच्या मठात ठेवल्या व त्यांची सेवा केल्यास तुम्हाला जीवनात आनंद मिळेल व तुमचा उद्धारही होईल असे सांगितले.
येथे ज्या पादुका आहेत ते भगवंताचे चिन्हच आहे. येतील निर्गुण पादुकांच्या दर्शनाने भक्ताला विनम्र भाव व नम्रता येते. त्याला दर्शन व आशीर्वाद एकाच वेळी प्राप्त होतात. विनम्र भावाच्या ओलाव्याशिवाय त्याला आशीर्वाद मिळत नाहीत. या पादुकांना पाण्याचा अभिषेक चालत नाही. अत्तर, केशराचा लेप पादुकांना लावला जातो. त्या पादुका जिवंत असल्यानेच त्या केशरातील ओलसरपणा पादुकांद्वारे शोषला जातो. तसेच पादुका `निर्लेप' असल्याने पादुकांवरील लेप निघून येतो. संपूर्ण भारतात अशा प्रकारच्या भगवंताच्या जिवंत पादुका इतर कुठेही नाहीत.
आपण गाणगापूरला जे मंदिर पाहतो ते इस्लाम राजवटीत बांधलेले आहे. या मंदिराला पूर्वी मठ असे म्हटले जायचे. श्रीगुरुंची तिथे वास्तव्य होते. त्या काळात स्वामी असताना त्यामानाने मठ लहान होता. आज जेथे पादुका ठेवलेल्या आहेत तेथेच पूर्वी श्रीस्वामी बसत असत. इस्लाम राजवटीत हे मंदिर बांधल्यामुळे मंदिराला झरोका ठेवला आहे. झरोका ठेवण्यामागे गाभाNयात पावित्र्य राहावे अशी भावना आहे. गाभाऱ्यात फक्त तीन माणसे बसू शकतात अथवा ६ माणसे उभी राहू शकतात.
हे संन्यासी रूप भगवंताचेच आहे. या रूपाची सेवा केल्यास त्याची प्रचिती लवकर येते पूर्वीच्या काळी रझाकार हा मठ पाडण्यासाठी आले होते. त्या काळी मठाचे समोर एक मशीद होती. रात्रीची वेळ त्यांनी निवडली. परंतु जेव्हा ते मठ पाडायला आले तेव्हा त्यांना मठाच्या जागी मशीद दिसली व मशिदीच्या जागी मठ दिसला. त्यामुळे त्यांनी त्या रात्रीच्या काळोखात मठ समजून त्यांचीच मशीद पाडली. सकाळ झाल्यावर त्यांना हा प्रकार समजला. ईश्वरी शक्ती जागृत असल्याचा हा एक पुरावा सांगितला जातो. तेव्हापासून मुसलमान समाजही श्रीगुरुंच्या सेवेसाठी तिथे दर्शनाला येतो.
गाणगापूरचे वैशिष्ट्य असे, की तिथे तुम्ही जी सेवा कराल त्याच्या शतपटीने तुम्हाला फळ मिळते. हे ठीकाण संन्याशाचे असल्याने येथे दर्शनाला आलेले भक्त दुपारचे भोजन गावात पाच घरात माधुकरी मागूनच करतात. आता तशी तिथे प्रथाच पडली आहे. दर्शनाला आलेले भक्तही तिथे भिक्षा घालून अन्नदानाचे पुण्य मिळवतात. गाणगापूरात दत्तभक्तांना दत्तमहात्म्याची प्रचिती येते असा आजवरचा अनुभव आहे. त्याकरिता गुरुभक्ती आणि गुरुनिष्ठा दृढ हवी!