Guru purnima 2021 : गुरु न केल्यामुळे संत नामदेवांची इतर संतमंडळींसमोर फजिती कशी झाली, त्याची गोष्ट!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 03:01 PM2021-07-22T15:01:14+5:302021-07-22T15:01:50+5:30
Guru Purnima 2021: देवाचे सान्निध्य सतत राहावे असे वाटत असेल, तर अहंकाराचे अस्तित्त्वच नको. तो अहंकार दूर करण्यासाठी गुरु पाहिजेच!
एकदा संत गोरोबा काकांकडे सगळी संतमंडळी जमली होती. ज्ञानेश्वर माऊली, सोपान, मुक्ताई, निवृत्ती, नामदेव असे सगळे एकत्र जमलेले असताना मुक्ताईने कुतुहल म्हणून गोरोबा काकांना विचारले, 'गोरोबा काका, गोरोबा काका, ते कोपऱ्यात ठेवले आहे, त्याला काय बरं म्हणतात?'
गोराबा काका म्हणाले, 'मुक्ते, त्याला थापटणे म्हणतात. त्याने कच्ची मडकी कोणती आणि पक्की कोणती हे आपटून ओळखता येते.'
मुक्ता ज्ञानोबा दादाकडे बघून हसत म्हणाली, `अय्या, कित्ती छान आहे हे. मग इथे जमलेल्या मडक्यांपैकी कोणते मडके कच्चे आणि कोणते पक्के हे ओळखता येईल का?'
हे ऐकताच नामदेवाने कान टवकारले. पण सभेतून उठून कसे जायचे, म्हणून तो निमूट बसून काय चाललंय हे पाहत होता.
गोरोबा काका मुक्तेला म्हणाले, `बघता येईल की, त्यात काय एवढं?'
असे म्हणत गोरोबा काकांनी सर्व संत मंडळींच्या डोक्यावर थापटणे मारायला सुरुवात केली. नुसत्या आवाजाने नामदेवाच्या डोक्यावर टेंगुळ येऊ लागले. तो घाबरला आणि त्याच्यावर पाळी आली तेव्हा म्हणाला, `ही कसली परीक्षा? मला नाही तपासून घ्यायचं काही. माझं मडकं पक्कच आहे. माझ्याशी खुद्द पांडुरंग खेळतो, बोलतो, माझं सगळं ऐकतो. मग मी कसा राहीन कच्चा?'
यावर गोरोबा काका मुक्तेकडे बघत म्हणाले, `मुक्ते हे आहे कच्च मडकं!'
नामदेव रागारागात पाय आपटीत तेथून बाहेर पडला. मुक्ता धावत त्याच्या मागे गेली आणि म्हणाली, `नामदेवा, असा रागावू नकोस. गोरोबा काका म्हणाले त्याचे वाईट वाटून घेऊ नकोस, उलट स्वत:मध्ये सुधारणा कर. अरे, विठोबा तुझ्याशी खेळतो, बोलतो याचा तुला अभिमान झाला आहे. परंतु तू गुरु केला असतास, तर या गोष्टीचा वृथा अभिमान कधीच गळून पडला असता. हा मी पणा दूर करण्यासाठी गुरुंना शरण जा. गुरु केल्याशिवाय कोणालाही पर्याय नाही...
सद्गुरु अनुग्रहावीण हरीला तो कठीण सर्वथा पटणे,
गोरा संत परीक्षी मस्तकी हाणून सर्व थापटणे।।
देवाचे सान्निध्य सतत राहावे असे वाटत असेल, तर अहंकाराचे अस्तित्त्वच नको. यासाठी तू विसोबा खेचर नावाचे गृहस्थ आहेत, त्यांना शरण जा, ते तुला आपला शिष्य करून घेतील आणि तुझे हे आधेअधुरे मडके पूर्ण पक्के होईल.
नामदेवाने मुक्तेचा शब्द उचलून धरला आणि विसोबा खेचर यांची भेट घेतली व त्यांचे शिष्यत्त्व स्वीकारले. गुरुंनी नामदेवाला अनुग्रह दिला त्यानंतर नामदेवांची कधीच फजिती झाली नाही. म्हणून संतांनी, देवांनी जसा गुरु केला, तसा आपणही केला पाहिजे.