Guru Purnima 2022: गुरुपौर्णिमा विशेष: सद्गुरुशी नेहमी एकनिष्ठ असावे; स्वामी समर्थ महाराजांचा गुरुपदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 12:04 PM2022-07-13T12:04:25+5:302022-07-13T12:04:53+5:30

Guru Purnima 2022: गुरुशी कायम एकनिष्ठ असावे. गुरुकृपेमुळे संकटाला सामोरे जाण्याची शक्ती शिष्याला मिळते. जाणून घ्या...

guru purnima 2022 swami samarth maharaj teaches us preaching that always be loyal to sadhguru | Guru Purnima 2022: गुरुपौर्णिमा विशेष: सद्गुरुशी नेहमी एकनिष्ठ असावे; स्वामी समर्थ महाराजांचा गुरुपदेश

Guru Purnima 2022: गुरुपौर्णिमा विशेष: सद्गुरुशी नेहमी एकनिष्ठ असावे; स्वामी समर्थ महाराजांचा गुरुपदेश

googlenewsNext

आषाढी एकादशीपासून सुरू झालेल्या चातुर्मासातील पहिला महत्त्वाचा सण म्हणजे गुरुपौर्णिमा. हिंदू धर्मात गुरुपौर्णिमेच्या सणाला विशेष महत्त्व आहे. आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा हा सण साजरा केला जातो. भारतीय संस्कृतीत गुरूला देवाप्रमाणे मानले जाते. गुरूपौर्णिमेला गुरूपूजनही केले जाते. भारतात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि श्रद्धापूर्वक साजरी केली जाते. १३ जुलै रोजी गुरुपौर्णिमा आहे. या दिवशी गुरुपूजनाचा विशेष सोहळा पार पडतो. गुरुजनांचे शुभाशिर्वाद शिष्यांना प्रेरणा, स्फुर्ती, बळ देतात. (guru purnima 2022)

अशक्यही शक्य करतील स्वामी, अशी कोट्यवधी स्वामी भक्तांची श्रद्धा आहे. कितीही प्रतिकूल परिस्थिती असली, तरी स्वामी नामाने चिंता मिटतात, असे अनेक अनुभवही स्वामी भक्तांना आले आहेत. स्वामी समर्थ महाराजांचे उपदेश आणि शिकवण कालातीत असून, ती समजाला नेहमीच बोधप्रद ठरत असते. या उपदेश किंवा शिवकण यांतून माणसाला काही ना काही गवसते. असेच एक दिवस स्वामींनी सद्गुरुशी एकनिष्ठ राहण्याचा बोध दिला. नेमके काय घडले? जाणून घेऊया...

माणसाने एकाच देवाची निस्सीम भक्ती करावी

एके दिवशी स्वामी भक्तांना एक गोष्ट सांगत असतात. एक माणूस होता, तो वाराप्रमाणे देवाची भक्ती करायचा. सोमवारी शिवाची, गुरुवारी दत्ताची, शुक्रवारी देवीची. एक दिवस तो पाण्यात पडला. एका देवाला बोलावले, तो येईपर्यंत दुसऱ्याचा धावा केला, दुसऱ्या देवाचा धावा ऐकून पहिला परतला, दुसरा येतो तोपर्यंत तिसऱ्याचा धावा केला. या प्रकाराने एकही देव मदतीला आला नाही आणी त्या माणसाला जलसमाधी मिळाली. या गोष्टीचे तात्पर्य असे की, माणसाने एकाच देवाची निस्सीम भक्ती करावी, असे स्वामी म्हणतात.

श्रीपादचे मन अत्यंत विचलित होते

स्वामींचा शिष्य श्रीपाद प्रपंचातील अडचणींनी, समस्यांनी, त्रासांनी गांजलेला असतो. स्वामी भक्ती करूनही काही त्रास संपत नाही म्हणून शेवटी तो ज्योतिषाकडे जातो. ज्योतिषी ग्रहांचा त्रास असल्याचे सांगतो आणि यावर उपाय म्हणून ग्राम देवतेच्या पालखीचे दर्शन घेण्याचा सल्ला देतो. स्वामी नेमकी त्याच दिवसाची कार्य जबाबदारी श्रीपादवर सोपवतात. श्रीपाद स्वामींकडे पालखी दर्शनसाठी जाण्याची परवानगी मागतो. परंतु, स्वामी चक्क नकार देतात. श्रीपादचे मन अत्यंत विचलित होते. पालखीच्या दिवशी स्वामी ध्यान अवस्थेत आहेत, असे समजून श्रीपाद आणि भुजंग पालखी दर्शनासाठी गुपचूप पळ काढतात.

मौल्यवान स्वर्णमुद्रिका भुजंगकडे

पालखी दर्शनासाठी जाताना श्रीपाद रस्त्यात आपली मौल्यवान स्वर्णमुद्रिका भुजंगकडे सांभाळायला देतो. भुजंग ती हातात ठेवतो. पालखीवर फुलांचा वर्षाव करताना मुद्रिकाही भिरकावली जाते. ही बाब भुजंगच्या लक्षात येत नाही. पालखी गेल्यावर मुद्रिका हातात नसल्याचे त्याच्या लक्षात येते. खूप शोध घेऊनही मुद्रिका मिळत नाही. स्वामी आज्ञेचे उल्लंघन झाले म्हणून हा प्रकरण घडला, असे मानून ते स्वामींना शरण जातात. सर्वप्रथम स्वामी त्या दोघांची चांगली हजेरी घेतात. शेवटी स्वामींना दोघांची दया येते आणि मुद्रिका मिळेल विश्वास ठेवा असे स्वामी सांगतात. ती मुद्रिका रस्त्यावर पडलेली एका व्यक्तीला सापडते. तो ती उचलणार इतक्यात दुसरा उचलतो. यावरून दोघांचे भांडण जुंपते. तेवढ्यात एक शिपाई येऊन त्यांना दम देतो आणि खरा प्रकार काय आहे, ते जाणून घेण्यासाठी स्वामींकडे न्यायनिवाड्यासाठी येतो. श्रीपादला त्याची मुद्रिका मिळते आणि भुजंग चिंतामुक्त होतो.

शिष्याने गुरुशी कायम एकनिष्ठ असावे

स्वामी म्हणतात की, अरे गुरु असताना तू त्याच्यावर विश्वास ठेवला नाहीस. गेला तर गेला गुरु आज्ञेचे उल्लंघन केलेत. अरे! गुरुचे ऐकत नाही आणि संकट आल्यावर गुरुकडे धावत येतात. शिष्याने गुरुशी कायम एकनिष्ठ असावे. गुरुवर नेहमी विश्वास ठेवावा. कितीही संकट आली तरी गुरुची साथ सोडू नये. संकटे ही पूर्व कर्मामुळे येतात आणि त्यावेळेला जर गुरुची साथ सोडली तर व्यक्तीच्या समस्येत आणखीनच भर पडते. गुरुकृपेमुळे संकटाला सामोरे जायची शक्ती मिळते. तसेच संकटातून लवकर सुटका होण्याचे मार्ग अधिक लवकर प्रशस्त होतात.
 

Web Title: guru purnima 2022 swami samarth maharaj teaches us preaching that always be loyal to sadhguru

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.