Guru Purnima 2023: गुरु पौर्णिमेला 'या मंत्राचा जप केला असता मिळते सुख, समृद्धी आणि मन:शांती!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2023 06:07 PM2023-07-01T18:07:17+5:302023-07-01T18:13:29+5:30
Guru Purnima 2023: गुरु पौर्णिमेला आपण आपल्या गुरुंची सदिच्छा भेट तर घेतोच, त्याबरोबरीने गुरुंचे गुरु दत्त गुरु यांची उपासना करायला विसरू नका!
यंदा ३ जुलै रोजी गुरुपौर्णिमा आहे. महाभारताचे रचेते महर्षी वेद व्यास यांची जयंती म्हणूनही हा सण साजरा केला जातो. तसेच, गुरुंप्रती ऋणनिर्देश करण्यासाठी देखील हा दिवस साजरा केला जातो. आयुष्याच्या विविध टप्प्यावर गुरु आपल्याला मार्गदर्शन करतात आणि आपल्या आयुष्याला सुयोग्य आकार देतात. मात्र तुमच्या बाबतीत गुरुप्राप्तीचा प्रवास पूर्ण झाला नसेल तर गुरु पौर्णिमेला दिलेल्या मंत्रांचा जप करा. जेणेकरून गुरुप्राप्ती होईल आणि जीवनात सुख, शांती आणि समृद्धी कायम राहील. यासाठी गुरूंचे गुरु परात्पर गुरु अर्थात दत्त गुरूंचे काही मंत्र पुढीलप्रमाणे -
गुरु पौर्णिमेचे मंत्र :
- गुरुर्ब्रह्मा, गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः
गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः
- ओम गुरुभ्यो नमः।
- ओम परमतत्वाय नारायणाय गुरुभ्यो नमः ।
- ओम वेदाहि गुरु देवाय विद्यहे परम गुरुवे धीमहि तन्नोः प्रचोदयात्।
- ओम गुं गुरुभ्यो नमः।
गुरु पौर्णिमा तिथी: यावर्षी पौर्णिमा तिथी ३ जुलै रोजी आहे. ही पौर्णिमा व्यास पौर्णिमा तसेच गुरु पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. अनेक साधक या दिवशी दत्त गुरुंची उपासना म्हणून उपासदेखील करतात.
गुरु पौर्णिमेचे महत्त्व: हिंदू धर्मात गुरूचे स्थान देवापेक्षा जास्त आहे. गुरूंच्या आशीर्वादाशिवाय देवतांचा आशीर्वादही निष्फळ होतो, असे म्हणतात. त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंची आराधना केल्याने समस्त देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात. यासाठी गुरु पौर्णिमेला आपल्या गुरूंना देणगी, मिठाई, पुष्पगुच्छ भेट द्यावा आणि त्यांना वंदन करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा.