Guru Purnima 2023: कडक शिस्तीचे शिक्षक शनी देव यांची कृपा प्राप्त करण्यासाठी गुरुपौर्णिमेला करा 'हे' खास उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2023 12:57 PM2023-07-03T12:57:18+5:302023-07-03T12:58:05+5:30

Guru Purnima 2023: शनी देवांचे पाठबळ मिळाले तर आयुष्याला योग्य वळण लागणारच, त्यासाठी जाणून घ्या हे उपाय. 

Guru Purnima 2023: Do 'These' Special Remedies on Guru Purnima to Receive the Grace of Shani Dev, the Teacher of Strict Discipline! | Guru Purnima 2023: कडक शिस्तीचे शिक्षक शनी देव यांची कृपा प्राप्त करण्यासाठी गुरुपौर्णिमेला करा 'हे' खास उपाय!

Guru Purnima 2023: कडक शिस्तीचे शिक्षक शनी देव यांची कृपा प्राप्त करण्यासाठी गुरुपौर्णिमेला करा 'हे' खास उपाय!

googlenewsNext

गुरुपौर्णिमेनिमीत्त आपण आपल्या आयुष्यातील समस्त गुरूंना अभिवादन करणार आहोतच, त्याबरोबरीने आपल्या आयुष्याला शिस्त लावणारे आणखी एक गुरु म्हणजे शनी देव यांना विसरू नका. जन्माला आल्यापासून आपल्या वृद्धापकाळापर्यंत तीन टप्प्यात साडेसातीला सामोरे जावे लागते आणि तेव्हा आपल्याला आठवण होते ती शनी देवांची! त्यापेक्षा कायमस्वरूपी त्यांची आठवण ठेवून त्यांच्या शिस्तीनुसार राहिले तर त्यांचा त्रास कधीच उद्भवणार नाही, त्यासाठी ज्योतिष विशारद चेतन साळकर यांच्याकडून जाणून घेऊया उपाय. 

ब्रम्हांडात इतके करोडोंच्या संख्येत ग्रह तारे , कैक आकाशगंगा , लाखो सूर्य , नक्षत्रे विखुरलेली आहेत की त्याची गणना करणे अत्यंत कठीण, नव्हे नव्हे ते मानवाच्या बुध्दीला अशक्यच!! त्यात हे शनी महाराज म्हणजे एक असा विषय जो केवळ ग्रह आणि भौगोलिक दृष्टिकोनाच्या पलीकडे जाऊन मनुष्य जातीचा हित पाहणे हा आहे. उरलेले ११ ग्रह कोणत्या ना कोणत्या आसक्ती खाली आहेत. अगदी गुरु म्हटले तरी मान-सन्मान , ज्ञान याची आसक्ती आहेच. शनी मात्र एकमेव असा ग्रह ज्यांना कसलीच आसक्ती नाही. 

||जीवासवे जन्मे मृत्यू || जोडजन्म ज्यात ||
|| दिसे भासते ते सारे || विश्व नाशवंत ||
|| काय शोक करिसी वेड्या || स्वप्नीच्या फळांचा ||
|| पराधीन आहे जगती || पुत्र मानवाचा ||

शनी महाराज हे असे धडे देत असतात. असे शनी महाराज आपले गुरु आहेत. कडक , शिस्तप्रिय , करड्या आवाजात सूनावणारे आणि मार्गावर आणणारे हे गुरु आहेत. साहजिकच आहे आपल्याला शाळेत ओरडणारे आणि धपाटे मारणारे शिक्षक आवडत नसतातच, परंतु मोठे झालो की कळते ते धपाटे किती महत्त्वाचे होते आपल्याला शिस्त आणि मार्गावर आणण्यासाठी. ही आमची शनी माऊली सुध्दा कशी बरोबर आपल्याला मार्गावर आणते. आता त्यासाठी काही फटके द्यावे लागणारच. ते आपण समजून घ्यायला हवे ना.

शनीची गुरुदक्षिणा : आपापल्या सर्व गुरूंचे स्मरण करून त्यांना योग्य तो मोबदला देण्याचा गुरुपौर्णिमेच्या शुभ दिवस. शनी माऊलीला सुध्दा आपण दक्षिण द्यायला हवीच ना!!

• आपल्यात असलेला अहं ताबडतोब काढून टाकणे
• आसक्तीविरहित जगणे
• समाधानी राहणे
• सत्य आणि प्रामाणिक राहून कर्तव्य करणे
• अधर्माची साथ न देणे
• मोक्षाकडे वाटचाल करणे
• अध्यात्म करणे

कुठल्याही वस्तू स्वरूपात दक्षिणा देण्यापेक्षा वरील गोष्टी आपण केल्या तर ही दक्षिणा शनी महाराजांसाठी खरीखुरी ठरेल. 

गुरु महाराज आणि शनी महाराज दोन्ही ही आपल्या मार्गाने आपल्याला मार्गावर आणण्याचा यत्न करीत असतात. काय गंमत आहे बघा , कुंडलीत गुरु बळ नसेल तरीही आणि शनी महाराज शुभ नसतील तरीही व्यक्ती भरकटलेली , दुःखी आणि असमाधानी असते. गुरु महाराजांविषयी तर सर्वच बोलतात पण शनी महाराज सुध्दा तेच करू करतात. फरक एवढाच आहे की , गुरु महाराज गोडीगुलाबीने करतात शनी महाराज कठोरपणे!

फलीते व उपाय : 

शनी महाराज वक्री होऊन मकरेत आल्यावर ते धनिष्ठाच्या दुसऱ्या चरणात असणार आहेत. त्यांचा प्रवास पूर्ण धनिष्ठा च्या पहिल्या चरणापर्यंत होणार आहे. दुसऱ्या चरणात शनी महाराज त्यातल्या त्यात चांगल्या अवस्थेत आहेत परंतु पहिल्या चरणात ते थोडे कडक होतील. त्याप्रमाणे फळे पाहुयात : 

• हस्त - चित्रा - शततारका - पू. भाद्रपदा - स्वाती हे जन्म नक्षत्र असणाऱ्या व्यक्तींसाठी शनी चे धनिष्ठा मधील भ्रमण शास्त्रकारांनी अशुभ मानले आहे.

• वरील जन्म नक्षत्र असणाऱ्या व्यक्तींचे लग्न जर कर्क - कुंभ - सिंह - तुळ - मकर असेल तर त्यांनी काळजी घ्यावी. बावरून जाऊ नका. तुमची दशा - अंतर्दशा असेल तर हे अनुभव येतील.

• मीन - कर्क - तुळ राशींवर शनी ची वक्री दृष्टी असणार आहे. त्यांनी वर्तन / आचरण / भूमिका / जगताना दहा वेळा विचार करून करा.

• धनु - कुंभ - मकर या राशींना हा सुंदर योग येतो आहे. शनी महाराजांची उत्तम सेवा करण्याचा हा योग. आचरण , भक्तिभाव शनी महाराजांना आवडेल असा ठेवा. साडेसातीत तुम्हाला याचा आल्हादायक अनुभव फळांच्या रूपाने मिळेल.

• शनी महात्म्य नियमित अथवा दर शनिवारी संध्याकाळी पठण करावे.

चातुर्मास : 

चातुर्मासातील अध्यात्माचे फळं पुण्यसंचय वाढवणारे असते. या चातुर्मासात जितके जास्त अध्यात्म आणि सन्मार्ग तुम्ही चालाल तेवढे पुण्य जास्त पदरात पडेल. "जो कोणी भक्त चातुर्मासात अध्यात्म करेल , सात्विक प्रवृत्तीचे आचरण ठेवेल , विष्णू भक्तिमध्ये स्वतःला झोकून देईल त्या भक्ताला वैकुंठ पाप्त होईल" असे प्रत्यक्ष नारायणाचे वचन आहे.

• या चातुर्मासात अधिकाधिक अध्यात्माला जोर द्या.
• प्रपंच करता करता अध्यात्माला ही वेळ द्या. 
• विष्णुपुराण पठण करावे.
• विष्णूसहस्त्रनामावली पठण करावी.
• गुरुचरित्रपारायण केले तरी उत्तम.
• जपजाप्य / नामस्मरण / मानसपूजा हे जे काही कराल त्याचा साठा तुमच्याच पदरात पडणार आहे , हे कायम लक्षात ठेवा.

अशा रीतीने शनी देवांची कडक शिक्षक म्हणून भीती न बाळगता त्यांना अपेक्षित असलेली शिस्त अंगीकारावी. ज्यामुळे शनी देवांची कृपादृष्टी राहीलच आणि आयुष्याला सकारात्मक वळणही मिळेल!

Web Title: Guru Purnima 2023: Do 'These' Special Remedies on Guru Purnima to Receive the Grace of Shani Dev, the Teacher of Strict Discipline!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.