Guru Purnima 2024: गजानन महाराजांनी जसे माझे आयुष्य अंतर्बाह्य बदलून टाकले, तसे तुमचेही बदलेल; पण... 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2024 12:21 PM2024-07-20T12:21:30+5:302024-07-20T12:22:05+5:30

Guru Purnima 2024: गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्हीदेखील तुमचे गुरुकृपेचे अनुभव लोकमत भक्तीवर पाठवू शकता; जसा की हा अनुभव!

Guru Purnima 2024: As Gajanan Maharaj changed my life inside out, so will yours; But...  | Guru Purnima 2024: गजानन महाराजांनी जसे माझे आयुष्य अंतर्बाह्य बदलून टाकले, तसे तुमचेही बदलेल; पण... 

Guru Purnima 2024: गजानन महाराजांनी जसे माझे आयुष्य अंतर्बाह्य बदलून टाकले, तसे तुमचेही बदलेल; पण... 

>> सौ. अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक 

गुरुपौर्णिमा माझा अत्यंत आवडता दिवस कारण माझा जन्म तिथीने ह्याच दिवशी झाला. गुरूंचे आयुष्यातील पदार्पण किती सुखावह असते, आधार देणारे असते ते मी गेले कित्येक वर्ष अनुभवतेय. आयुष्य आता 'गुरुमय' झाल्याचा आनंद आहे. काहीच मागायचे नाही . भरभरून देत आहेत आणि मी हा आनंद वाटत, लुटत आहे. खरच आहे. अध्यात्मिक आनंदाची  बरोबरी कुठल्याच गोष्टीसोबत करता येत नाही. हा आनंद ज्याचा त्यानेच अनुभवायचा असतो. 

गुरु पौर्णिमा असो अथवा अन्य कुठलाही दिवस. महाराजांसाठी काय करू आणि काय नको असे सर्व भक्तांना वाटत असते. आपले महाराज अत्यंत दयाळू आणि क्षमाशील आहेत . परमार्थाची गोडी चाखायला मिळणे ह्यासारखे दुसरे भाग्य ते काय ? ओंजळ कधीच रिती राहून देत नाहीत आणि काही मागायला उरत सुद्धा  नाही . आज बाहेर पावसाच्या मृगधारा आहेत आणि डोळ्यात महाराजांच्या आठवणीने आलेल्या आनंदमयी अश्रुधारा आहेत.
 
मला गुरुनी आजवर काय दिले ? काय शिकवले ? आपण कितीसे ओळखतो त्यांना ? त्यांचे आपल्या आयुष्यात येण्याचे प्रयोजन काय असावे ? ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे ज्याची त्यांनी खरतर शोधली पाहिजेत . आपण महाराजांना कितीसे ओळखतो हा यक्षप्रश्न आहे पण ते आपल्याला चांगलेच ओळखून आहेत मंडळी. नित्याचा प्रपंच हीच खरी साधना आणि गुरुपौर्णिमा सुद्धा आहे. मोठेमोठे हार तुरे , सगळी आरास हे आपण केलेलं कौतुक आहे आणि ते सर्व डोळे भरून महाराज बघत आहेत पण ह्या सर्वाच्याही पलीकडे असणारा निष्काम भाव त्यांना हवा आहे. निस्वार्थी सेवा अभिप्रेत आहे. पारायण , प्रदक्षिणा , नामस्मरण ही सर्व त्यांच्या पर्यंत आपला भाव पोहोचवायची माध्यमे आहेत. सोळा आणे खरा  भक्त तयार होणे हे निष्काम सेवेचेच फल आहे. 

मला ह्या अध्यात्माने,  गुरूंच्या सेवेने महाराजांनी माझ्या “ अंतरंगात “ डोकवायला शिकवले. माझ्यातील स्वभावाचे अनेकविध पेहलू त्यांनीच मला उलगडून दाखवले. जे आपल्याला दिसत नाही त्याही पलीकडे असणारे जे दाखवतात ते आपले गुरु असतात आणि त्यांचे बोट धरले तर कशाचीही उणीव भासत नाही हे मी अनेक वर्ष अनुभवते आहे. काहीही समस्या आली कि गुरुवारी त्यांच्यासमोर प्रश्न लिहून  ठेवते आणि चिठ्ठ्या करते . कारण माझ्या बाल बुद्धीला न झेपणारे प्रसंग सुद्धा जीवनात येत राहतात अश्यावेळी महाराजांचा निर्णय शेवटचा असतो . मनात कुठलाही कल्प विकल्प न धरता  जे चिठ्ठीत आले आहे ते करायचे . महाराज त्रिकालज्ञानी आहेत आणि म्हणूनच त्यांचे मार्गदर्शन अनमोल आहे. 

श्री गजानन विजय हा अमृततुल्य ग्रंथ . महाराजांच्या असंख्य लीलांचे रसभरीत वर्णन श्री दासगणू महाराजांनी त्यात केलेले आहे. ग्रंथ वाचताना सगळे प्रसंग डोळ्यासमोर उभे राहतात इतकी प्रचंड ताकद त्यात आहे . ती नुसती पोथी नाही तर जीवन कसे जगावे ह्याचे सार महाराजांनी भक्तांना त्यातून शिकवले आहे. गोविंदबुवा टाकळीकर ह्यांचा घोडा नुसत्या महाराजांच्या सहवासाने शांत झाला , आणि आपण ? नामस्मरण , नेवैद्य , शेगाव च्या वाऱ्या, प्रसाद , प्रदक्षिणा , पारायणे करूनही आपण आहोत तिथेच आहोत . विचार करा नक्की पटेल . नुसते करायचे म्हणून करायचे इतकेच ह्या सगळ्यात जीव कोण ओतणार . स्वतःला प्रश्न विचारा १९ व्या अध्यायात महाराजांनी समाधी घेतली तेव्हा कितीजणांच्या डोळ्यातून अश्रू आले?  महाराज आता नाहीत ही कल्पना सुद्धा सहन होणार नाही इतका भाव ती पोथी वाचताना असायला हवा तरच आपली जीवनरूपी नौका पल्याड लागेल. नुसते म्हणायचे आम्ही हे करतो आणि ते करतो पण प्रश्न काही सुटत नाहीत ह्याचे उत्तर हेच आहे. 

चुकीच्या गोष्टी करताना कोणी बघत नाही असे समजू नका. शेवटच्या क्षणी हिशोब करणारा शनिदेव लक्षात ठेवा .महाराजांना जीवन समर्पित केले तर मागायला काहीच उरणार नाही इतके समाधान त्यांच्या चरणाशी आपण अनुभवू शकतो . आज सगळे विकत घेता येते आणि आहेही आपल्याकडे . प्रत्येक खोलीत AC , अनगिनत सुखाची साधने , उठसुठ परदेश वार्या पण समाधान आहे का ? ते कुठेतरी लोप पावले आहे. सतत संघर्ष , स्पर्धा आणि काहीतरी मिळवण्याची हाव ह्यांनी जीवन व्यापून गेले आहे. मी ह्या अभिनेत्रीसारखी दिसले पाहिजे ? कश्याला ? तू तुझ्यासारखी दिस की , जशी आहेस तशीच महाराजांना प्रिय आहेस . 

माझे चार खोल्यांचे घर आहे आता मला अजून एक घर हवे , मग बंगला हवा सारखे कश्याच्यातरी पाठी पळत राहतोय आपण , का कश्यासाठी ? कुणाला दाखवायचे आहे हे सर्व ? कधी सुटणार आपला लोभ , मोह . किती जमवायची हि माया . सगळे इथेच ठेवून जायचे आहे . पण नाही सगळे जमवत राहायचे आणि ते मिळवण्यासाठीच साधना करत रहायची . आज अंतरंगात डोकावून बघितले तर समजेल आपले अस्तित्वच हरवून बसलोय आपण , नुसते मशीन झालेय आपले घड्याळावर फिरणारे  आयुष्य झालेय . शांतपणे सुखाचे चार क्षण पण नाहीत आज आपल्याकडे . कुठे चाललय हे सर्व आणि शेवट काय होणार ह्याचा ? श्री दासगणू महाराजांनी आपल्याला श्री गजानन विजय ग्रंथ हा अनमोल ठेवा दिला आहे. नित्य वाचन आयुष्य नक्कीच बदलून टाकेल . माझे बदलले आहे तुमचेही बदलेल . आज भौतिक सुखाची रेलचेल असूनही झोपेच्या गोळ्या लागतात काय म्हणायचे ह्याला ? 

साधकाने साधना करत राहावी , कधी काय द्यायचे कि कधीच नाही द्यायचे ? कि मागितले आहे त्याहीपेक्षा भरभरून द्यायचे हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे. मोक्षाची पायरी शेवटची आहे आपले पत्रिकेतील १२ वे स्थान म्हणजेच व्यय भाव . तिथे सगळे सोडून जायला लागते तरच त्यांच्या चरणावर नतमस्तक होता येते . महाराजांच्या प्रती खरा भाव काय चीज आहे ह्याचे एक उदा देवू इच्छिते . हि ठाण्याची मठातील प्रत्यक्ष घडलेली घटना आहे एक वयोवृद्ध गृहस्त शेगाव ला निघाले. प्रवास बसमधला , थोड्या थोड्या वेळाने त्यांना बाथरूम ला होत असे . त्यांनी महाराजांना हात जोडले आणि आपला सगळा भार त्यांच्यावर सोपवला. बस मध्ये जेव्हा थांबेल तेव्हाच ते बाथरूम ला जावून येत अन्यथा त्यांना कधीही जावे लागले नाही . कुणालाही त्यांचा त्रास झाला नाही . महाराज आपल्या खर्या भक्तांच्या मागे खंबीर उभे असतात . महाराजांच्या एका कृपा कटाक्षासाठी आपला उभा जन्म जातो . म्हणूनच म्हंटले आहे “ अमृततुल्य तुझी दृष्टी त्याची करावी आम्हावर वृष्टी नको करूस आम्हा कष्टी , महापुरुष गजानना “ .

हम गया नाही जिंदा है ... हे अभिवचन असेच नाही दिले महाराजांनी .  ते आहेत आणि ते आहेतच . पण स्वामिनी काय सांगितले आहे “ शेत पिकवून खा ..म्हणजेच कष्ट कर. नुसती आयदी बसलेली माणसे त्यांना जराही आवडत नाहीत . 

आज समर्पण केले पाहिजे . आपला प्रपंच त्यांच्या चरणी वाहून आजन्म सेवेचे व्रत घेतले पाहिजे तरच हा जन्म सार्थकी लागेल. आपल्या मनातील भावनांचे पुष्प त्यांच्या चरणी अर्पण केले पाहिजे , खरे वागले पाहिजे , खरे बोलले पाहिजे आणि खरेपणाचे व्रत घेतले पाहिजे. शास्त्र सांगते आपल्याजवळ जे असेल त्यातील थोडे इतरांना द्यावे.  अध्यात्माचा वारसा सुद्धा आपल्या पुढच्या पिढीकडे सुपूर्द केला पाहिजे . मी शेगाव ला गेले कि ५ पोथ्या न चुकता आणते आणि ज्यांना हव्या असतील त्यांना हाच प्रसाद म्हणून देते . हि गोष्ट मला गोगटे काकांनी सांगितली होती . आपल्याला भक्त तयार करायचे आहेत . वर्षाला ५ तयार केले तरी महाराजांना आवडतील. आज जीवन कठीण होत चालले आहे म्हणूनच शहाण्या माणसाने जितके लवकर होईल तितके अध्यात्माच्या मार्गावरून चालण्यास आरंभ करावा.
 
ऊन पाऊस काहीही असो वारकर्यांना दिसतो तो फक्त त्यांचा “ पांडुरंग “ . हाच भाव मनी ठेवून आजन्म त्यांच्या सेवेत राहिले तर “ आपले जीवन गुरुमय होईल आणि “ जीवनातील रोजचा दिवस गुरु पौर्णिमे सारखाच भासत राहील “  ह्यात शंका नाही. आज आपल्यापैकी प्रत्येकाने क्षणभर आपल्या “ अंतरंगात “ डोकवून बघूया आणि आपलीच आपल्याला किती नव्याने ओळख होते त्याचा अनुभव घेवूया . माझे हे गुरु आणि माझे ते गुरु . मी चाफ्याच्या फुलांचा हार व्हायला आणि मी हा नेवैद्य दाखवला ह्यापलीकडे जाताच नाही आपण . एखाद्या जिवलग मैत्रिणीने छान साडी नेसली भरभरून कौतुक करतो आपण ? नाही करत . अहो नाकावर राग आहे आपल्या आणि तो पारायणांच्या अभिषेकने सुद्धा कमी होत नाही. अचानक दुसर्याशी बोलायचे बंद करतो आपण आणि समोरच्या व्यक्तीला सांगत सुद्धा नाही त्याची चूक . करतो कि नाही आपण असे ?  कुणालाही चांगले म्हणणे जमतंय आपल्याला ? नाही . सतत दुसर्याचा द्वेष आणि अपमान करत जीवन पुढे जाते आहे आपले. लालसा , अहंकाराने व्यापलेले आपले जीवन मोहाने लडबडलेले आहे. महाराज ह्या शब्दाचा अर्थ म्हणजे दुसर्याला देत राहणे आहे. मी इतका जप केला ह्यात सुद्धा आपली स्पर्धा . सतत मनात शंका , तिरस्कार काय मिळणार हे सर्व करून ??? कधीतरी मोकळा श्वास घ्या आणि कुणालातरी चांगले म्हणा कारण तेच महाराजांना आवडणार आहे. म्हणूनच ते सांगत आहेत अंतरंगात डोकावून बघा . तिथे दिसेल इतरांच्या बद्दल असलेला द्वेष तिरस्कार . जोवर तो मनातून जात नाही तोवर महाराजांचे पदार्पण आपल्या हृदयात होणे केवळ अशक्य आहे .नुसते शेगाव आणि अक्कलकोट च्या वाऱ्या करून काय होणार अहो ते इथेही आहेत कि चराचरात आहे. घेण्यापेक्षा देण्यातील आनंद ह्या गुरु पौर्णिमेला लुटुया .

एखाद्या गरजू व्यक्तीला चपला , छत्री दान करा , अन्नदान करा , एखाद्या मुलाच्या शाळेची फी भरण्यास मदत करा , एखादा ड्रेस साडी कमी आणली म्हणून काही बिघडत नाही. पण आपण जे दान करत आहोत त्याची वाच्यता कुठेच नको नाही तर त्याचे फळ शून्य . मुळात फळाच्या अपेक्षेने काहीच करू नये . मिळायचे ते मिळणार नक्की मिळणार पण शंका घेवून सेवा नको . 

जीवघेण्या स्पर्धेचा भाग झालो आहोत आपण आणि जीवनातील लहान सहान आनंदाला मुकलो आहोत .गुरुपौर्णिमेचे मर्म जाणून घेवूया .  एखाद्याला आशीर्वाद देणे , मदत करणे , आपल्या पत्नीचा आदर करणे , आईवडिलांची काळजी घेणे म्हणजे गुरुपौर्णिमा , आपले जीवन समाधानाने जगणे , प्रपंचासाठी सन्मार्गाने पैसा जोडणे म्हणजे गुरुपौर्णिमा , आपल्या गुरूंच्या प्रचाराची धुरा वाहणे , त्यांच्या नामाचा प्रसार करत त्यांचे जीवनातील महत्व इतरांना सांगून त्यांना आपल्या कळपात आणणे भक्तीचा प्रसार करणे , एखाद्याला दुक्खात न ढकलता त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवणे . एखादा व्यसनी आहे त्याला त्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्नशील राहणे , कुणाला मुल होत नाही , विवाह ठरत नाही म्हणून त्यांना त्रास होयील मन दुखावेल असे प्रश्न मुद्दामून विचारणारे महाभाग सुद्धा आहेत त्यांना आवर्जून सांगावेसे वाटते कि गुरुपौर्णिमा म्हणजे काय? त्याचा अर्थच नाही समजला ह्यांना असे खेदाने म्हणावे लागेल. मुळात सतत दुसर्याशी स्पर्धा करत रहायची . कश्यासाठी ? मी किती मोठा भक्त हेही मिरवायचे .अरेरे ...

गुरुपौर्णिमेला महाराजांना अभिप्रेत आहे ते “ अंतरंगात डोकावून पहा “ स्वतःच्या आणि इतरांच्याही . ज्याला गुरु खर्या अर्थाने समजले आहेत त्यांना दुसर्याचे मन समजणे कठीण होणार नाही . कुठलाही माणूस वाईट नाही आणि चांगला सुद्धा नाही . तो परिस्थितीचा शिकार असतो आणि त्याप्रमाणे तो वागत सुद्धा असतो . पण अध्यात्माची कास धरली तर राग लोभ दुक्ख माया मोह ह्यापासून हळूहळू बाहेर यायला निश्चित मदत होते ह्यावर माझा विश्वास आहे. करून बघा आणि अनुभव घ्या पण आपण करतच नाही.

ज्योतिष शास्त्र शिकले हि सुद्धा गुरुकृपाच आहे . लेख लिहायला त्यांची कृपा लागते , लेख चोरल्यामुळे अवकृपा होते  , ते करून आपण आपली कर्म वाढवून घेतो हे नक्की . गुरु म्हणजे फक्त अध्यात्म नाही तर संतती , विद्या , शिक्षण , ज्ञान , आयुष्यातील आर्थिक उन्नती ह्या सर्वाचाच कारक गुरु आहे.  गुरूंची सेवा किती महत्वाची आहे ते समजेल . गुरु विशाल अंतकरण बहाल करेल , मोठ्या मानाने समोरच्याला माफ करायला शिकवेल . जो द्यायला शिकला त्याच्यावर गुरुकृपा झाली असे समजायला हरकत नाही . म्हणूनच गुरूंचे आपल्या अंतरंगातील  “ अस्तित्व  “ महत्वाचे आहे. 

गजानना गजानना सांभाळ आपल्या भक्तजना |
गजानना गजानना शेगावीच्या गजानना ||

समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज कि जय | श्री साईनाथ महाराज कि जय | श्री स्वामी समर्थ ||
लिहून घेणारे तुम्हीच , वाचणारेही तुम्हीच , आमरण वारी घडो सदैव तुमचे चिंतन राहो ||
महाराज आपल्या सोबत आहेत हि “ अनुभूती “ सर्वप्रथम आपल्याच “ अंतरंगात “ मिळते. हा एक आनंद सोहळा आहे  त्याची गोडी कधीही न संपणारी आहे, अनुभव घेवून बघा.

ता. क: तुम्हालाही तुमचे गुरु कृपेचे अनुभव पाठवायचे असतील तर आम्हाला पाठवा, त्याला प्रसिद्धी देण्याची जबाबदारी आमची!

संपर्क : lokmatbhakti822@gmail.com

Web Title: Guru Purnima 2024: As Gajanan Maharaj changed my life inside out, so will yours; But... 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.