Guru Pushyamrut Yoga 2023: गुरुपुष्यामृत योगावर 'अशी' करा पूजा, होईल लक्ष्मी मातेची भरभरून कृपा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2023 05:03 PM2023-04-26T17:03:17+5:302023-04-26T17:04:01+5:30

Guru Pushyamrut Yoga 2023: गुरुपुष्यामृत योग हा अतिशय शुभ मानला जातो, या मुहूर्ताचा सदुपयोग लक्ष्मी मातेची कृपा कशी प्राप्त करायची ते जाणून घ्या!

Guru Pushyamrut Yoga 2023: Worship Guru Pushyamrut Yoga like this, Goddess Lakshmi will be blessed! | Guru Pushyamrut Yoga 2023: गुरुपुष्यामृत योगावर 'अशी' करा पूजा, होईल लक्ष्मी मातेची भरभरून कृपा!

Guru Pushyamrut Yoga 2023: गुरुपुष्यामृत योगावर 'अशी' करा पूजा, होईल लक्ष्मी मातेची भरभरून कृपा!

googlenewsNext

२७ एप्रिल रोजी गुरुपुष्यामृत योग आहे. हिंदू धर्मात या मुहूर्ताला अतिशय महत्त्व आहे. त्यादिवशी शुभ मुहूर्तावर केलेल्या पूजेमुळे लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि तिची कृपादृष्टी आपल्याला प्राप्त होते. 

गुरुपुष्यामृत योग मुहूर्त : २७ एप्रिल रोजी सकाळी ७ पासून २८ एप्रिल रोजी पहाटे ५. ६ मिनिटांपर्यंत 

गुरुपुष्यामृत योग म्हणजेच गुरु पुष्यनक्षत्र योग. आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे हा योग सर्वात शुभ योग म्हणून ओळखला जातो. गुरुपुष्यामृत हा योग पुष्य नक्षत्रासाहित गुरुवारी येतो. हा योग खूप महत्वाचा मानला जातो. या मुहूर्तावर अनेक प्रकारच्या शुभ कार्याचा शुभारंभ केला जातो. 

पुष्यामृत गुरुवारी येणे हा योग दुर्मिळ आहे. म्हणूनच आपण याला अमृत योग असे संबोधितो.  घरातील ईशान्य कोपऱ्यात म्हणजेच देव्हाऱ्यात उजव्या कोपऱ्याला श्रीसुक्त , पुरुषसुक्त वाचून व पंचोपचार पूजा करून कलश स्थापना केल्यास घरात धन-धान्य वृद्धी व लक्ष्मीप्राप्ती होते. त्यासाठी पुढीलप्रमाणे कलश स्थापना करावी :-

एक चौरंग, एक पाट, चौरांगाभोवती आंब्याच्या चार डगळे लावावेत. चौरंगावर शुभ्र पांढरे वस्त्र टाकावे. त्यावर मध्यभागी थोडे तांदूळ टाकावे. त्यावर एक कलश, त्यात पाणी, नाणे व सुपारी टाकून ठेवावा. त्यात पाच विड्याची पाने ठेवावीत. त्यावर श्रीफळ ठेवावे.

आपण पूजेकरिता भरून घेतलेल्या कलशात गंध, अक्षता व फुले टाकावीत व खालील मंत्र म्हणावा -
कलश देवताभ्यो नम: || 
सकलपूजार्थे गंधाक्षता पुष्पाणि समर्पयामि ||
प्रार्थनापूर्वक नमस्काराणि समर्पयामि ||

कलशाला गंध लावताना : -
श्री कलश देवताभ्यो नम: | विलेपनार्थ चंदनम् समर्पयामि ||
 
२) कलशाला अक्षता व हळद-कुंकू वाहताना : -
श्री कलश देवताभ्यो नम: | अलंकारार्थे अक्षताम् समर्पयामि || 
हरिद्रा कुंकुम सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि ||

३) कलशाला फूल वाहताना : -
श्री कलश देवताभ्यो नम: | ऋतुकालोद्धव पुष्पम समर्पयामि ||

४) कलशाला आगरबत्ती ओवाळताना : 
श्री कलश देवताभ्यो नम: | धूपम् आघ्रपयामि ||

५) कलशाला दीप ओवाळताना : -
श्री कलश देवताभ्यो नम: | दीपं दर्शयामि ||

६)कलशासमोर पाण्याने भरीव चौकोन काढून त्यावर खडीसाखरेची वाटी ठेऊन गायत्री मंत्र म्हणून त्या वाटीत तुळशीची पान ठेवावे. नंतर दुसरे तुळशीचे पान घेऊन तीनवेळा वाटी भोवती फिरवावे व फिरवताना खालील मंत्र म्हणावा : - 

सत्यंत वर्तेन परिसिंचयामी ओम तत्सवितूरवरेण्यं | 
भर्गो देवस्य धिमही धियो यो न: प्रचोदयात |

७) नंतर तुळशीचे पान कलशासमोर ठेवतांना खालील मंत्र म्हणावा:
ओम प्राणाय स्वाहा | ओम अपानाय स्वाहा | 
ओम व्यानाय स्वाहा | ओम उदानाय स्वाहा | 
ओम सामान्य स्वाहा | ओम ब्राम्हणे अमृतत्वाय स्वाहा ||

पुन्हा एकदा दुसरे तुळशीचे पान घेऊन वरीलप्रमाणे तीनवेळा फिरवून मंत्र म्हणून कलशासमोर ठेवावे. अशाप्रकारे गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर पूजा विधी पार पाडला जातो. 

अशाप्रकारे केलेल्या पूजेने लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि आपल्यावर कृपेचा वर्षाव करते. 

Web Title: Guru Pushyamrut Yoga 2023: Worship Guru Pushyamrut Yoga like this, Goddess Lakshmi will be blessed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.