गुरुचंद्र..! चित्ताचा ताप हरण करणारा गुरु दुर्लभ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 08:28 PM2020-08-01T20:28:47+5:302020-08-01T20:30:22+5:30

वित्ताचे हरण करणारे गुरु खूप मिळतात पण जीवन बदलवणारा, हृदय बदलवणारा, डोळ्यांत तेज व बुद्धीत खुमारी निर्माण करणारा, चित्ताचा ताप हरण करणारा गुरु दुर्लभ आहे...!

Guruchandra ..! Guru who takes away fever is rare | गुरुचंद्र..! चित्ताचा ताप हरण करणारा गुरु दुर्लभ 

गुरुचंद्र..! चित्ताचा ताप हरण करणारा गुरु दुर्लभ 

googlenewsNext

- युवा कीर्तनकार ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी (बीड, महाराष्ट्र )

भारतीय संस्कृतीने गुरुमध्ये कळसरुप अशा सद्गुरुला नेहमीच पूजिले आहे. गुरु विश्वाच्या अनंततेचे तसेच सृष्टीच्या ज्ञानाचे दर्शन करतो पण सद्गुरु जीवनाची कला शिकवून मानवाला ईश्वराभिमुख बनवतो. अध्यात्मविद्येचे दर्शन करणारा सद्गुरु आहे. जीवनाला सुंदर, निर्दोष व पवित्र बनवून, आपला हात पकडून आपल्याला प्रभुचरणाजवळ घेऊन जाणारा हा सद्गुरु आहे.

ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं ।
द्वंव्दातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् ॥
एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतं ।
भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि ॥

वासना विकारांच्या ह्या पुतळ्याला, मांस मातीच्या ह्या गोळ्याला ज्याने आकार दिला, चिरंतर सुख व शांतीचा मार्ग दाखवला, माणूस असून पशुतुल्य जीवन जगत असलेल्या मला नारायण होण्याचा पथ दाखविला त्या गुरुचे पूजन नाही करायचे तर  कोणाला भगवानतुल्य मानायचे..? ह्या अनंत ऋणांची फेड मी कशी करु.? कृतज्ञतापूर्वक त्याचे पूजन करुन, त्याने दाखविलेल्या जीवन पथावर पुढे जाऊन, त्याच्या ध्येयाला पुढे नेऊन, त्याने पेटविलेल्या ज्ञानज्योतीला सतत प्रज्वलित राखूनच ती होऊ शकेल..! अशा गुरुला काही द्यायचे नसते आणि त्याला द्याल तेवढे थोडेच असते. गुरुची विशिष्टता ही की, त्याला काहीही दिले तरी ते तो अधिक मानून घेतो.

आपले शास्त्रकार तर सांगतात की, तुझ्याजवळ दुसरे काही नसेल तर हरकत नाही. एखादे फूल घेऊन त्याच्याजवळ जा, कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून त्याच्या चरणावर ते अर्पण कर. गुरुचरणी आपण जे अर्पण करतो ते जर स्वीकारार्ह बनले तर त्यात आपलेच आत्मकल्याण सामावलेले आहे. गुरुची सेवा करणारे आपण कोण.? खरं पाहिलं तर आपल्या मृत जीवनात संजीवनी भरणारा गुरुच आपली खरी सेवा करतो.
समाजात 'गुरुचंद्र' हा क्वचित् दिसतो. तो सामान्यात सामान्य बनून राहतो. असा हा गुरु आजच्या जमान्यात मिळणे कठीण आहे परंतु अशक्य मात्र नाही. फक्त पाहण्याचे डोळे हवेत. जेथे नजर टाकू तेथे मिळेल एवढा काही तो सुलभ नाही पण तसाच कधी मिळणारच नाही एवढा तो दुर्लभही नाही. आजच्या परिस्थितीत तर -

गुरवः बहवः सन्ति शिष्यवित्तापहारका: ।
क्वचितु दृश्यते तत्र शिष्यचित्तापहारक: ॥

वित्ताचे हरण करणारे गुरु खूप मिळतात पण जीवन बदलवणारा, हृदय बदलवणारा, डोळ्यांत तेज व बुद्धीत खुमारी निर्माण करणारा, चित्ताचा ताप हरण करणारा गुरु दुर्लभ आहे. भाग्य असेल तरच असा गुरु मिळतो; अशा गुरुला ओळखणे हे अधिक कठीण आहे. जर कदाचित् त्याला ओळखणे शक्य बनले तर त्याच्या जीवनाच्या परिचयात येणे तर त्याहून अधिक दुष्कर आहे. निकट परिचयात येण्याची ही संधी प्राप्त झाली तरीही त्याला समजणे, त्याचे विचार व वर्तन  यांच्यात दिसत असलेल्या विभिन्नतेच्या पाठीमागे असलेल्या आंतरिक एकसूत्रतेला जाणणे हे फारच कमी लोकांना शक्य आहे. हे जरी शक्य बनले तरी त्याच्याबरोबरचा संबंध टिकणे हे कित्येक वेळेला विभिन्न कारणांमुळे अशक्यच बनते. संबंध कदाचित दीर्घकाळ राहील परंतु त्याच्या जीवननिष्ठेचे अनुसरण हे तर उडत्या पक्ष्याला गोळी घालून खाली पाडण्याएवढे कठीण कार्य आहे. त्याला अनुसरुन त्याच्यासारखा होऊन, तोच बनून, असे दिव्य व गौरवपूर्ण जीवन भावयुक्त नम्रतेने त्याच्या चरणावर धरणे हे हिमालयाचे चूर्ण करण्यासारखे किंवा आकाशाची घडी करण्यासारखे अशक्यवत् काम आहे..!

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

 ( लेखक हे युवा कीर्तनकार आहेत, त्यांचा भ्रमणध्वनी 87 93 03 03 03 )

Web Title: Guruchandra ..! Guru who takes away fever is rare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.