Gurupushyamrut Yoga 2022: उद्या गुरु पुष्यामृत योग, वाचा मुहूर्त, लाभ आणि पूजाविधी यांची सविस्तर माहिती!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 07:00 AM2022-08-24T07:00:00+5:302022-08-24T07:00:01+5:30

Gurupushyamrut Yoga 2022: गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर लक्ष्मी मातेबरोबरच गणपती बाप्पा, देवी शारदा तसेच भगवान कुबेर यांची पूजा करणे अधिक लाभदायक ठरते!

Gurupushyamrut Yoga 2022: Tomorrow Guru Pushyamrut Yoga, Read Details of Muhurat, Benefits and Rituals! | Gurupushyamrut Yoga 2022: उद्या गुरु पुष्यामृत योग, वाचा मुहूर्त, लाभ आणि पूजाविधी यांची सविस्तर माहिती!

Gurupushyamrut Yoga 2022: उद्या गुरु पुष्यामृत योग, वाचा मुहूर्त, लाभ आणि पूजाविधी यांची सविस्तर माहिती!

googlenewsNext

गुरु पुष्यामृत योग हा अतिशय शुभ मानला जातो. या मुहूर्तावर शुभ कार्य केली जात नाहीत परंतु शुभ गोष्टींचा शुभारंभ निश्चितच केला जातो. या मुहूर्तावर सोने खरेदी केली असता धनसंपत्तीत वाढ होते. या दृष्टीने हा सुवर्ण योग महत्त्वाचा आहेच, शिवाय या निमित्ताने आणखी काय केले जाते तेही जाणून घेऊ!

गुरु पुष्यामृत मुहूर्त:   

२५ ऑगस्ट रोजी सकाळी ६.२४ मिनिटांनी हा योग सुरू होणार असून सायंकाळी ४. १५ मिनिटांपर्यंत हा योग असेल. या मुहूर्ताच्या वेळेस लक्ष्मी मातेची पूजा करून श्रीसूक्त म्हणावे आणि दत्त गुरूंचा जप करत दत्त कृपेस पात्र व्हावे!

गुरु पुष्यामृत योगावर काय करतात?

गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर सोने चांदी खरेदी करतात. याशिवाय गृहप्रवेश, मालमत्ता आणि इतर गुंतवणूक, खरेदी, नवीन व्यवसायाची सुरूवात, विद्यारंभ म्हणजेच शिक्षणाची सुरुवात केली जाते. पितृपंधरवडा सुरू असल्याने अनेक जण या काळात नवीन खरेदी, नवीन कामाची सुरुवात टाळतात. परंतु हा काळ केवळ शुभ कार्यासाठी निषिद्ध मानला गेला आहे. मात्र या दिवशी गुरु मंत्र व देवाचे नामस्मरण, तसेच इतर सर्व धार्मिक /अध्यात्मिक कार्य केल्यास सेवेकऱ्यांना अत्यंत लाभ होतो. या मुहूर्तावर दानधर्म करून अधिक पुण्य पदरात पाडून घेता येईल. तसे केल्याने पितरांचा आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद लाभून घरात भरभराट होईल. 

पुष्यामृत (Guru Pushyamrut 2022) गुरुवारी येणे हा योग दुर्मिळ आहे. म्हणूनच आपण याला अमृत योग असे संबोधितो. या शुभ मुहूर्ताचा अधिक लाभ व्हावा म्हणून देवी लक्ष्मी, श्रीविष्णू आणि गणपती, शंकराची पूजा करावी. लक्ष्मी आणि लक्ष्मीपती धनप्राप्ती चा आशीर्वाद देणारे आहेत, पण मग शंकर आणि गणपती यांची पूजा आज का, असा प्रश्न आपल्याला पडेल. तर शंकर हे संकटमोचक तर गणपती बुद्धिदाता मानला जातो. लक्ष्मी प्राप्ती झाल्यावर तिचा योग्य तऱ्हेने विनियोग आणि संरक्षण करणेही तितकेच म्हत्ववाचे आहे. म्हणून या निमित्ताने त्या दोहोंचीही पूजा योजली असावी. घरातील ईशान्य कोपऱ्यात म्हणजेच देव्हाऱ्यात उजव्या कोपऱ्याला श्रीसुक्त , पुरुषसुक्त वाचून व पंचोपचार पूजा करून कलश स्थापना केल्यास घरात धन-धान्य वृद्धी व लक्ष्मीप्राप्ती होते. 

गुरुपुष्यामृत (Guru Pushyamrut 2022) हा मुहूर्त शुभ असला, तरी विवाह किंवा मंगल कार्यासाठी तो निषिद्ध मानला जातो. कारण, गुरुपुष्यामृत या मुहूर्तावर खुद्द दत्त गुरूंची कृपादृष्टी असते. दत्तगुरु वैराग्याचे प्रतीक मानले जातात. संसारात किंवा मंगल कार्यात वैराग्य येऊन कसे चालेल? म्हणून या मुहूर्तावर खरेदी विक्री करावी पण मंगलकार्य टाळावे. मात्र इतर अनेक गोष्टींचा शुभारंभ या मुहूर्तावर करायला काहीच हरकत नाही!

Web Title: Gurupushyamrut Yoga 2022: Tomorrow Guru Pushyamrut Yoga, Read Details of Muhurat, Benefits and Rituals!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.