गुरुपुष्यामृत योग: तुमची साडेसाती सुरु आहे? ‘हे’ उपाय आवर्जून करा; गुरु-शनी शुभ करतील!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 12:01 PM2024-10-23T12:01:28+5:302024-10-23T12:01:36+5:30
Gurupushyamrut Yoga October 2024: या गुरुपुष्यामृत योगाचे फार महत्त्व आहे. ज्या राशींची साडेसाती सुरू आहे, त्यांनी अवश्य हे उपाय करून पाहावेत, असे सांगितले जात आहे.
Gurupushyamrut Yoga October 2024: २४ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ०६ वाजून ३८ मिनिटांपासून गुरुपुष्यामृत योग सुरू होत असून, दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवार सकाळी ०६ वाजून ३७ मिनिटांपर्यंत गुरुपुष्यामृतयोग असणार आहे. संपूर्ण दिवस हा योग असणे विशेष मानले जात आहे. गुरुपुष्यामृत योग वारंवार येत नाही. गुरुवारी पुष्य नक्षत्र आले, तर त्या दिवशी 'गुरुपुष्यामृत' योग होतो. हा योग सर्व कार्यासाठी शुभ समजला जातो. या योगावर सोने खरेदी केले असता त्याची वृद्धी होते, अशी मान्यता आहे.
पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा देखील म्हटले जाते. या दिवशी देवाची पूजा-अर्चा केल्याने व्यक्तीला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळते, अशी मान्यता आहे. पुष्यचा अर्थ आहे पोषण करणारा, शक्ती देणारा, ऊर्जा देणारा. पुष्याचे आधीचे नाव तिष्य असे. त्याचा अर्थ आहे शुभ, सुंदर, सुख संपदा देणारा. जाणकारांच्या मते, पुष्य नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे. ऋग्वेदात पुष्याला तिष्य म्हणजे मंगलदायी किंवा मांगलिक तारा, असेही म्हणतात. या गुरुपुष्यामृत योगाचे फार महत्त्व आहे.
शनी ही न्यायाची देवता मानली गेली आहे. आताच्या घडीला शनी आपले स्वामीत्व असलेल्या कुंभ राशीत विराजमान आहे. त्यामुळे मकर, कुंभ आणि मीन या राशींची साडेसाती सुरू आहे. पुष्य नक्षत्राचा स्वामी ग्रह शनी असून, देवता गुरु ग्रह आहे. शनीची कृपादृष्टी मिळवण्याची ही उत्तम संधी असल्याचे सांगितले जात आहे. या दिवशी शनी ग्रह आणि गुरु ग्रहाच्या मंत्रांचे जप, उपासना तसेच या दोन्ही ग्रहांशी संबंधित उपाय करावेत. असे केल्याने शनी आणि गुरु ग्रहाचा कृपालाभ होऊ शकतो. तसेच या ग्रहांचे प्रतिकूल प्रभाव कमी होऊ शकतो, असे म्हटले जाते.
साडेसाती सुरू आहे? कोणते उपाय करावेत?
- यथाशक्ती अन्नदान, शनीशी निगडीत वस्तुंचे दान करावे. साडेसाती सुरू असताना इष्टदेवतेचा जप करणे लाभप्रद ठरते.
- समर्थ रामदासकृत मारुतीस्तोत्र म्हणावे. शनी हा कर्मप्रधान ग्रह मानला गेला असल्यामुळे या कालावधीत आपले कर्म चांगले ठेवण्याचा सल्ला दिला जातो.
- सकाळी तसेच प्रदोष काळी, तिन्ही सांजेला दिवे लागणीला शनी देवाचे स्मरण, पूजन, उपासना आणि काही उपाय करावेत, असे सांगितले जाते.
- साडेसाती सुरू असताना प्रतिकूल प्रभाव कमी करण्याची मारुती, विष्णू, महादेव या देवांची उपासना, नामस्मरण उपयुक्त ठरते, असे सांगितले जाते.
- शनी बीज मंत्राचा जप करावा. शनीची उपासना, शनी स्तोत्राचे २१ वेळा पठण, शनी चालीसा पठण करावे, असे उपाय सांगितले जातात.
- पिंपळाच्या झाडाशी दूध आणि पाणी मिसळून नियमितपणे अर्पण करावे.
- यासह गुरु ग्रहाशी संबंधित मंत्र, बीज मंत्र, श्लोक, स्तोत्रे, उपासना करावी. गुरु ग्रहाशी संबंधित यथाशक्ती उपाय करावेत, असे सांगितले जाते.
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.