हातोड्याचे आघात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 04:39 AM2020-08-21T04:39:31+5:302020-08-21T04:39:46+5:30

चार प्रेरणादायी शब्द कानावर पडले की दु:खाचा भार हलका होऊन मन, बुद्धी ताजी होत जाते.

Hammer blow | हातोड्याचे आघात

हातोड्याचे आघात

googlenewsNext

-विजयराज बोधनकर
‘कोण दिवस येई कसा कोण जाणतो?’, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं हे भजन खूप काही शिकवून जातं. सुखाच्या दिवसात माणूस बेधुंद नशेत जगतो; पण जेव्हा दु:ख दाराशी येतं, तेव्हा तेच दु:ख सुंदर कल्पनेतली बाधा बनतं. दु:ख माणसाला प्यादा बनवतं. भीतीपोटी क्षुल्लक माणसांना शरण जायला भाग पाडतं. बऱ्याचदा दु:ख हे मानवनिर्मित असतं. दु:खाला फक्त सुदृढ विचारांचे औषधच विरघळू शकतं. दु:ख केवळ एक भ्रम आहे. दु:खाने अनेक संसार उद्ध्वस्त केलेत. सकाळ झाली की निसर्ग मानवाचं स्वागत करीत असतो; पण अनेक मनं सकाळच्या वेळी प्रश्नांची माळ जपत बसलेली असतात. अशा दु:खाच्या प्रवासात हे दु:खच मनाला आत्महत्याही करायला भाग पाडतं, म्हणून तर असे दु:खी मन कशात तरी रमावं म्हणून देवळात कीर्तनाला, भजनाला जाऊन बसतं. चार प्रेरणादायी शब्द कानावर पडले की दु:खाचा भार हलका होऊन मन, बुद्धी ताजी होत जाते. दु:खाला झटकून जी माणसे चिवटपणे कामाला लागतात, दु:ख त्यांच्यापासून घाबरून पळून जातं. क्षुल्लक कारणावरून दु:खी बनण्याची सवय मनाला लागलेली असते; परंतु ज्यांना जगाकडे सकारात्मक वृत्तीने बघण्याची सवय लागलेली असते, अशा माणसांकडे दु:ख चुकूनही फिरकत नसतं; कारण त्यांची विचारधारा इतकी शक्तिशाली असते की, ते कुठल्याही परिस्थितीत संकटाचा सामना करण्याची तयारी ठेवत असतात. फक्त धर्माचा अभ्यास करण्यापेक्षा उत्तम जगण्याचा धर्म म्हणजे काय असू शकतो, याचा सततचा ध्यास मनाला जास्त क्रियाशील बनवू शकतो. काळाच्या हातोड्याचे आघात सहन करण्याची क्षमता मनात येते. चालता चालता मातीत रुतून बसलेले मानवी वृत्तीचे काटे टोचतात; पण त्या वेदना क्षुल्लक समजून जो पुढे चालत राहतो, अशीच जगण्यावर खरे प्रेम करणारी माणसं असतात. येणाºया भयंकर संकटातून सुटका करून घेण्याचे मार्ग शोधत असतात; म्हणून सुखात उतू नये आणि दु:खात रडू नये.

Web Title: Hammer blow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.