Hanuman Jayanti 2021 : समर्थ रामदास रचित म्हणायला अवघड परंतु आशयघन अशी हनुमंताची आरती आणि भावार्थ!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 08:00 AM2021-04-26T08:00:00+5:302021-04-26T08:00:06+5:30
Hanuman Jayanti 2021 : अफाट शक्ती असूनही त्या शक्तीचा गैरवापर हनुमंतांनी कधी वाईट कार्यासाठी केला नाही तर केवळ रामकार्यासाठी केला.
हनुमंताचे कार्य जेवढे अफाट तेवढेच त्याचे कार्य शब्दबद्ध करणारे समर्थ रामदास स्वामी यांचे शब्दही अफाट. म्हणूनच हनुमंताची आरती म्हणताना अनेकदा बोबडी वळते आणि नुसते जयदेव जयदेव म्हणत आरती पूर्ण केली जाते. परंतु, या आरतीतील अवघ्या दोन कडव्यांचा भावार्थ नीट समजून घेतला, तर ती पाठ होणे अवघड नाही.
सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी,
करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनी,
कडाडिले ब्रह्मांड धाके त्रिभूवनी,
सुरवर नर, निशाचर, त्या झाल्या पळणी।।१।।
जयदेव जयदेव जय श्रीहनुमंता,
तुमचेनि प्रसादे न भिये कृतांता।। धृ।।
दुमदुमली पाताळे उठला प्रतिशब्द,
थरथरला धरणीधर मानिला खेद,
कडाडिले पर्वत उडुगण उच्छेद,
रामी रामदासा शक्तीचा शोध ।।२।।
समर्थ रामदास वर्णन करतात-
मारुती स्वत:च्या सामर्थ्यानिशी लोकांचे रक्षण करण्यासाठी झेप घेत असताना त्याच्या तोंडातून हुंकार बाहेर पडला. त्यामुळे संपूर्ण पृथ्वी दोलायमान झाली. सागराच्या पाण्यावर उत्तुंग लाटा उसळल्या आणि त्या आकाशापर्यंत पोचून तिथेही खळबळ माजली. संपूर्ण ब्रह्मांड थरथरू लागले आणि तीनही लोकांमध्ये भीती उत्पन्न झाली. पंचमहाभूतांमध्ये खळबळ उडाली. देव, मानव, राक्षस या सर्वांना पळता भुई थोडी झाली. ।।१।।
अशा भीमकाय हनुमंता तुझा जयजयकार असो. तुझी कृपा असली, की कोणीही यमाला सुद्धा घाबरणार नाही. ।।धृ।।
सप्त पाताळांमध्ये प्रचंड आवाज झाला. त्याचा प्रतिध्वनी इथे भूमीवर पोहोचला. त्याचा त्रास होऊन पर्वताचासुद्धा थरकाप झाला. पर्वत कोलमडू लागले आणि सर्व प्राणीमात्रांवर मोठी आपत्ती आली. पक्ष्यांचा विनाशकाळ आला की काय अशी स्थिती उत्पन्न झाली. तुझ्याठायी असलेल्या अफाट शक्तीचे सर्व चराचराला आकलन झाले. परंतु, या शक्तीचा तू गैरवापर केला नाहीस हे महत्त्वाचे! ती सर्व शक्ती रामचरणी अर्पण केलीस आणि रामकार्यार्थ वापरली, यातच तुझ्या भक्ती आणि शक्तीचा गौरव आहे.