Hanuman Jayanti 2023: शुभ योगात हनुमान जयंती: ‘असे’ करा हनुमंतांचे पूजन; पाहा, पूजाविधी, मुहूर्त अन् महत्त्व
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2023 11:41 AM2023-04-05T11:41:51+5:302023-04-05T11:42:47+5:30
Hanuman Jayanti 2023: हनुमान जयंतीला मारुतीरायाच्या पूजाविधीचा शुभ मुहूर्त, सोप्या पद्धतीने करावयाचा पूजाविधी आणि महत्त्व जाणून घ्या...
Hanuman Jayanti 2023: चैत्र महिन्यात गुढी पाडवा, श्रीराम जयंतीनंतर अवघ्या देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा सण म्हणजे हनुमान जयंती. हनुमंत, मारूती, बजरंगबली, रामभक्त, आंजनेय, महावीर, पवनपुत्र, पवनसुत, केसरीनंदन अशा अनेक नावाने मारुतीरायाला संबोधले जाते. चैत्र शुद्ध पौर्णिमेला अंजनी मातेच्या पोटी हनुमानाचा जन्म झाला. त्यामुळे चैत्र शुद्ध पौर्णिमा हनुमान जयंती म्हणून ओळखली जाते. मात्र, हनुमानाच्या जन्मस्थळाविषयी नेमकी स्पष्टता नाही. संपूर्ण भारतात हनुमानाच्या जन्मतिथीबद्दल अनेक मतमतांतरे आहेत. काही ठिकाणी हनुमान जयंती कार्तिक महिन्यात साजरी केली जाते. यंदाच्या हनुमान जयंतीला सर्वार्थ सिद्धि योगासह अनेक शुभ योग जुळून येत आहेत. जाणून घेऊया, शुभ मुहूर्त, पूजा करण्याची सोपी पद्धत आणि महत्त्व.
हनुमान जयंती चैत्र पौर्णिमेला साजरी केली जाते. यंदाच्या वर्षी चैत्र पौर्णिमेचा प्रारंभ ०५ एप्रिल रोजी सकाळी ०९ वाजून १९ मिनिटांनी होत आहे. तर पौर्णिमेची सांगता ०६ एप्रिल रोजी सकाळी १० वाजून ०४ मिनिटांनी होत आहे. मात्र, पौराणिक मान्यतांनुसार सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे हनुमानाचे पूजन ०६ एप्रिल रोजी करावे, असे सांगितले जात आहे.
हनुमान जयंतीचे शुभ मुहूर्त
हनुमान जयंतीला ६ एप्रिल रोजी सकाळी ०६ वाजून ०६ मिनिटे ते ०७ वाजून ४० मिनिटांपर्यंत हनुमान जयंतीच्या पूजेचा शुभ मुहूर्त आहे. त्यानंतर दुपारी १२ वाजून २४ मिनिटे ते ०१ वाजून ५८ मिनिटांपर्यंत पूजा करू शकता. याशिवाय सायंकाळी ०५ वाजून ३० मिनिटे ते ८ वाजून ३० मिनिटांपर्यंत हा पूजेचा शुभ मुहूर्त असल्याचे सांगितले जात आहे.
हनुमान जयंती पूजनविधी
सकाळी नेहमीप्रमाणे नित्यकर्म उरकून घ्यावीत. हनुमानाची मूर्ती किंवा प्रतिमेचे पूजन करावयाची जागा स्वच्छ करून घ्यावी. हनुमानाची मूर्ती वा प्रतिमा स्थापन करावी. हनुमान पूजनाचा संकल्प करावा. हनुमानाचे आवाहन करावे. आवाहन करताना हनुमान, श्रीराम आणि सीता मातेचे स्मरण करावे. पूजाविधी करताना ब्रह्मचर्य नियमांचे पालन करावे. सुरुवातीला गणपती पूजन करावे. यानंतर हनुमानाला पंचामृत स्नान घालून अभिषेक करावा. यानंतर हनुमान स्तोत्र, हनुमान चालिसा, बजरंग बाण, रामस्तुती यांचे यथाशक्ती पठण करावे. चंदन, अक्षता, फुले, धूप, दीप, नैवेद्य अर्पण करावे. पूजाविधी करताना हनुमानाला तेल, शेंदुर, रूईची फुले, पाने अर्पण अवश्य अर्पण करावीत. यानंतर हनुमानाची आरती करावी. हनुमानाचे नामस्मरण करून पूजेची सांगता करावी. दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा करून संकल्प पूर्ण करावा.
जाणून घ्या महत्त्व
हनुमान जयंतीच्या पूजेचे विशेष महत्त्व मानले जाते. असे मानले जाते की, या दिवशी मारुतीराय पूजन करणार्या व्यक्तीला सर्व रोग आणि दोषांपासून दूर ठेवतात. सर्व प्रकारच्या संकटांपासून रक्षण करतात. जीवनातील दु:ख दूर होऊन सुख-शांतात प्राप्त होते. यासोबतच शनीदेवाची प्रतिकूल स्थिती असलेल्या लोकांनी हनुमान जयंतीचे व्रत केल्यास शनीदोष दूर होऊन त्रासांपासून मुक्तता मिळू शकते, असे सांगितले जाते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"