Hanuman Jayanti 2023: अयोध्येत आल्यावर श्रीरामांनी हनुमंताचे आभार का मानले आणि त्याला कोणती अनमोल भेट दिली? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2023 09:30 AM2023-04-01T09:30:00+5:302023-04-01T09:30:02+5:30

Hanuman Jayanti 2023: श्रीराम आणि हनुमंत या एकाच नाण्याच्या दोन बाजू असाव्यात एवढी दोघांमध्ये एकरूपता होती, तरीदेखील श्रीरामांना आभार मानायची वेळ का आली?

Hanuman Jayanti 2023: Why did Lord Rama thank Hanumanta on his arrival in Ayodhya and what precious gift did he give him? Read on! | Hanuman Jayanti 2023: अयोध्येत आल्यावर श्रीरामांनी हनुमंताचे आभार का मानले आणि त्याला कोणती अनमोल भेट दिली? वाचा!

Hanuman Jayanti 2023: अयोध्येत आल्यावर श्रीरामांनी हनुमंताचे आभार का मानले आणि त्याला कोणती अनमोल भेट दिली? वाचा!

googlenewsNext

प्रभू श्रीराम, सीतामाई, लक्ष्मण, हनुमंत आणि समस्त वानरसेना रावणाला पराजित करून अयोध्येत परत आली. तेव्हा, अयोध्यावासीयांनी उत्सव साजरा केला, जल्लोश केला, गुढ्या उभारल्या, रांगोळ्या काढल्या आणि आपल्या रघुरायाचे आणि सीतामाईचे मोठ्या प्रेमाने स्वागत केले. प्रेमाने भारावलेल्या सीतामाईला त्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करावी असे वाटले. तिने आपला मनोदय रामरायासमोर मांडला आणि त्यांनी होकार दिल्यावर एक भेट समारंभ आयोजित केला. समस्त वानरसेना, अयोध्यावासी या समारंभात सहभागी झाले होते. प्रत्येकाची वैयक्तिक भेट घेऊन सीतामाई आणि रामरायांनी त्यांना भेटवस्तू देऊ केली. 

या समारंभात हनुमंतदेखील उपस्थित होते. मात्र, त्यांचे समारंभात अजिबात लक्ष नव्हते. ते एका झाडावर फळ खात बसले होते. अचानक सीतामाईच्या लक्षात आले, जवळपास सर्वांना भेटवस्तू देऊन झाल्या, मात्र या कार्यात ज्याचा सिंहाचा वाटा होता, त्या हनुमंताला आपण काहीच भेट दिली नाही. सीतामाईने रामरायाला ही बाब सांगितली व हनुमंताला काय भेट द्यावी अशी विचारणा केली. त्यावर रामराय निरुत्तर झाले. ते म्हणाले, `हनुमंताचे आपल्यावर एवढे उपकार आहेत, की आपल्या प्राणांची कुडी जरी दिली, तरी त्याचे उपकार फिटणार नाहीत. सीतामाईलाही ती बाब पटली. तरीदेखील, सीतामाईला भेटवस्तू देण्याचा मोह आवरला नाही. तिने हनुमंताला बोलावून घेतले. 

आज्ञा मिळताच, पुढच्याच क्षणी हनुमंत समोर हजर. त्यांनी सीतामाई आणि रामरायाला वंदन केले आणि 'काय आज्ञा' अशी विचारणा केली. सीतामाईने थेट मुद्द्याचे बोलून आपल्या गळ्यातला, माहेरहून मिळालेला, अतिशय मौलिक असा नवरत्नांचा हार हनुमंताला भेट म्हणून दिला. `या हाराचे मी काय करणार?' असा विचार येत हनुमंताने रामरायाकडे पाहिले. सीतेचा आग्रह मोडू नकोस, या भेटीचा स्वीकार कर, असे रामरायाने नजरेतूनच सांगितले. हनुमंताने तसे केलेही. 

भेटवस्तू स्वीकारून हनुमंत पुन्हा झाडावर जाऊन बसले. त्यांनी पुनश्च हाराकडे निरखून पाहिले. हारातली रत्ने चमचमत होती. आकर्षक दिसत होती. परंतु, त्या रत्नांमध्ये मारुतीरायाला आपलीच प्रतिमा दिसत होती. कदाचित रत्नाच्या आतमध्ये रामराय असतील, अशा विचाराने हनुमंताने एक एक रत्न दाताने फोडून बघायला सुरुवात केली. सीतामाईने कुतुहलाने कटाक्ष टाकला. तिला वाटले होते, हनुमंत आपण दिलेल्या भेटवस्तूचा स्वीकार करून, सर्वत्र मिरवेल. मात्र, चित्र काही भलतेच होते. 

केवळ नवरत्न फोडल्याचे दु:ख नव्हते. तो हार माहेरून मिळालेला असल्याने, स्वाभाविकच हाराची किंमत चौपट होती. त्याची अशी विल्हेवाट लागत असताना पाहून सीतामाईने थोडं रागात आणि थोडं नाराजीत हनुमंताला प्रश्न विचारला, `हनुमंता भेटवस्तू आवडली नव्हती, तर तसे सांगायचे ना. दुसरे काहीतरी दिले असते. पण तू, हे असे वागलेले मला अजिबात आवडले नाही. 

मातेची क्षमा मागून हनुमंत म्हणाले, `रावणाविरुद्ध लढणे, त्याचा पराभव करणे आणि आपल्या स्वामींच्या कार्याला हातभार लावणे, ही सेवक म्हणून माझी जबाबदारीच होती. ते काही उपकार नव्हेत. म्हणून मी समारंभात असूनही अलिप्त बसून होतो. आपण मला भेटवस्तू देऊ केली. ती खरोखरीच अपूर्व होती. परंतु, ती नीट निरखून पाहिल्यावर लक्षात आले, की त्यात माझे रामराय नाहीत. त्यांच्या शोधार्थ मी प्रत्येक रत्न फोडून माझे नररत्न आढळते का, याचा शोध घेत होतो. 

हनुमंताच्या स्पष्टीकरणावर प्रतिप्रश्न करत मातेने विचारले, 'तुला त्या हारात रामराय दिसले नाहीत, म्हणून ती तोडून टाकलीस. मात्र, तू  एवढा रामनाम घेत असतोस, मग तुझ्या हृदयात तरी राम आहे का?'

त्याक्षणी हनुमंताने उठून मातेला वंदन केले, रघुरायाचे स्मरण केले आणि आपली छाती फाडून हृदयस्थ परमेश्वर असलेले रामपंचायतनाचे दर्शन घडवले. ते पाहून सीतामाईला आश्चर्य वाटले आणि कुतुहलही. हनुमंताच्या रामभक्तीची तिला जाणीव झाली. सीतामाई आणि रामरायाने हनुमंताला `चिरंजीवी भव' असा आशीर्वाद दिला. तेव्हापासून आजतागायत चिरंजीवी हनुमंतांच्या रामभक्तीचे दाखले दिले जातात. त्यांच्या रामभक्तीचा अंश आपल्यातही उतरावा, अशी प्रार्थना करूया आणि म्हणूया,

सीयावर रामचंद्र की जय।
पवनसुत हनुमान की जय।
बोलो रे भाई, सब संतन की जय।

Web Title: Hanuman Jayanti 2023: Why did Lord Rama thank Hanumanta on his arrival in Ayodhya and what precious gift did he give him? Read on!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.