आनंद तरंग: सुख उत्पादन योजना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2020 07:04 AM2020-08-29T07:04:53+5:302020-08-29T07:05:10+5:30
जेव्हा एखादा माणूस आतून चैतन्यमय बदलाचा अनुभव घेतो तेव्हा आनंदनिर्मितीच्या त्या तत्त्वांना यशस्वी व्हायला वेळ लागत नाही.
नीता ब्रह्मकुमारी
दु:ख समाप्त होऊन ‘सुखाचे उत्पादन’ वाढवायचे असेल तर सकाळी अंथरुणातून उठण्याआधी शरीराला सैल सोडून आज दिवसभरात काय करायचे आहे, याची कामावली नजरेसमोर आणावी. प्रत्येक लहान कार्यात मला यश मिळतेय आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घेत आहे, अशी कल्पनाही आनंद देईल. प्रत्येक कार्याचे सुंदर चित्र डोळ्यासमोर आणून त्यातील आनंद अनुभवायचा ध्यास घ्यावा. कारण ज्याचे चित्र मानसपटलावर रंगवले जाते ते वास्तवात उतरते. मग ते सुखाचे असो वा दु:खाचे. जर कोणी सकाळी उठल्यावर म्हणत असेल की ‘उगवला आणखी एक कठीण दिवस’ तर त्याचा दिवस कसा जाईल? म्हणून सकाळी उठल्यापासून अनेकदा स्वत:ला काही सकारात्मक विचार द्यावे... माझी खात्री आहे की आजचा दिवस अद्भुत असेल. मी शारीरिक, मानसिक आणि भावनिकदृष्ट्या उत्तम आहे. मला जे जे मिळाले आहे त्याबद्दल मी ऋ णी आहे. जे माझ्याजवळ आहे आणि जे मला मिळणार आहे त्याबद्दल मी आभारी आहे. आज उद्भवणाऱ्या समस्यांना मी यशस्वीपणे हाताळू शकतो असा माझा विश्वास आहे. ईश्वर माझ्यासोबत आहे आणि तोच मला सगळ्यातून पार पाडत आहे. प्रत्येक चांगल्या गोष्टीबद्दल मी ईश्वराचा आभारी आहे.’
जेव्हा एखादा माणूस आतून चैतन्यमय बदलाचा अनुभव घेतो तेव्हा आनंदनिर्मितीच्या त्या तत्त्वांना यशस्वी व्हायला वेळ लागत नाही. एका कार्डवर लिहिले होते ‘सुखाचा, आनंदाचा मार्ग : - तुमचे हृदय तिरस्कारापासून आणि मन चिंतेपासून मुक्त ठेवा. साधेपणाने जगा, अपेक्षा कमी करा, इतरांचा विचार करा, तुमचे आयुष्य प्रेमाने भरून टाका, सूर्यप्रकाशाचा सडा टाका, स्वत:ला विसरा, इतरांचा विचार करा, तेच करा जे तुमच्यासाठी केले जावे असे तुम्हाला वाटते. एक आठवडाभर असे वागून पहा आणि तुम्ही आश्चर्याने थक्क व्हाल.’
सुखाचे उत्पादन करायचे असेल तर अशा सकारात्मक विचारांचे साहित्य आपल्याजवळ जमा करा.