तुम्ही ध्यानधारणा शिकायला नुकतीच सुरुवात केली आहे? 'या' टिप्स तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2021 02:09 PM2021-06-02T14:09:01+5:302021-06-02T14:09:21+5:30

ध्यानधारणेचे मार्ग अनेक आहेत, परंतु ज्या मार्गाने तुम्हाला मन:शांती लाभते, तो तुमचा ध्यानधारणेचा योग्य मार्ग आहे, असे समजा. 

Have you just started learning meditation? These tips will definitely help you! | तुम्ही ध्यानधारणा शिकायला नुकतीच सुरुवात केली आहे? 'या' टिप्स तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील!

तुम्ही ध्यानधारणा शिकायला नुकतीच सुरुवात केली आहे? 'या' टिप्स तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील!

googlenewsNext

भावभावनांचा वाढता उद्रेक, स्वभावात होणारे चढ उतार, वाद विवाद, रागाचा अतिरेक, मानसिक अस्वस्थता, नैराश्य अशा अनेक समस्यांवर एक रामबाण उपाय सांगितला जातो, तो म्हणजे ध्यानधारणा! परंतु, ध्यान धारणा करणे ही काही सोपी गोष्ट नाही. मन शांत ठेवण्याचा जेवढा प्रयत्न करावा, तेवढे ते वेगाने सर्वत्र फिरते. अशा अशांत मनाला दोरखंड कसा घालावा? मन एकाग्र कसे करावे? ध्यानधारणेचा सराव साधारण किती दिवस केल्यानंतर ध्यानधारणा साध्य होते? यासारखे अनेक प्रश्न आपल्याला पडत राहतात. काही जण चिकाटीने ध्यानधारणा शिकतात, तर काही जण मध्यातून सराव सोडून देतात. परंतु, तुम्ही जर नुकतीच सुरुवात केली असेल, तर पुढील टिप्स तुम्हाला नक्कीच कामी येतील.

ध्यानधारणा करताना अशी जागा निवडा, जिथे कोणालाही तुमचा आणि तुम्हाला कोणाचा त्रास होणार नाही. अर्थात घरातला तुमचा आवडता कोपरा किंवा गच्चीत, बागेत, मंदिरात तुम्हाला शांतपणे बसता येईल अशी जागा निवडा. एकाच जागी बसून रोजचा सराव करण्याचा प्रयत्न करा.

ध्यानधारणा करताना डोळे बंद ठेवा. ध्यानधारणेची सुरुवात १५ ते २० मीनिटांपासून करा. किमान एवढा वेळ डोळे बंदच राहतील हा नियम कटाक्षाने पाळा. तसे केल्याने मनातले विचार थांबत नाहीत, परंतु डोळ्यांनी दिसणाऱ्याआणि मनात उतरणाऱ्या प्रतिमांची संख्या काही काळ थांबते आणि लक्ष एकाग्र होण्यास मदत होते.

ध्यानधारणेला बसताना पाठ ताठ राहिल अशाच बेताने बसा. त्याचा परिणाम थेट मनावर आणि मेंदूवर होत असतो. म्हणून पोक न काढता, हातापायाच्या हालचाली न करता, ज्या अवस्थेत तुम्ही शांत बसू शकता, त्या अवस्थेत बसा. मांडी घालून, पद्मासन घालून, पाय पसरून, ज्यात तुम्हाला शांत आणि हालचाल न करता बसता येईल अशी अवस्था निवडा. डोळे बंद करा आणि तळहात छताच्या किंवा आकाशाच्या दिशेने मोकळे ठेवा.

तुमच्या आवडीचा बीजमंत्र अर्थात एक दोन शब्दांचा मंत्र डोळे बंद करून सातत्याने सावकाशपणे म्हणत राहा. त्या मंत्रातुन ऊर्जा निर्माण होत आहे, याची अनुभुती घ्या. एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा आपल्या शरीरात नखशिखांत प्रवेश करत आहे, असे अनुभवा. 

तसे करताना मन विचलित होत राहील. विविध विषयांकडे धाव घेईल. मनाला धाव घेऊद्या. परंतु त्याला पुन्हा पूर्वपदावर आणण्याचा सराव करा. तसे केल्याने तुमची ध्यानधारणेची आणि ध्यान केंद्रित करण्याची ताकद हळू हळू वाढेल. 

ध्यानधारणा एका रात्रीत साध्य होत नाही. त्यासाठी वर्षानुवर्षांचा सराव लागतो. परंतु ध्यानधारणेच्या रोजच्या सरावाने तुमच्या स्वभावात घडणारे बदल, भावनांवर नियंत्रण, रागावर नियंत्रण तुम्ही निश्चित अनुभवू शकाल. 

ध्यानधारणेसाठी पहाटेची, सकाळची वेळ योग्य असते असे म्हणातत. ते खरे असले, तरी आपली दिनचर्या पाहता आपल्याला रोज जी वेळ नेटाने पाळता येणे शक्य आहे, तीच वेळ निवडा. ती वेळ सकाळची असेल, दुपारची असेल किंवा रात्री झोपेपूर्वीची असू शकेल. परंतु त्या वेळेत सातत्य ठेवा. वेळेत सातत्य ठेवल्याने मनाला त्या वेळेत एकाग्र होण्याची सवय लागते. मन ध्यानधारणेत मग्न होते.

ध्यानधारणेची प्राथमिक पायरी पार केल्यानंतर अध्यात्मिक पुस्तकांमधून अधिक माहिती घ्या. धार्मिक संस्था, ध्यानशिबीरे यांत सहभागी होऊण ध्यानधारणेची पुढची पायरी चढा. ध्यानधारणेचे मार्ग अनेक आहेत, परंतु ज्या मार्गाने तुम्हाला मन:शांती लाभते, तो तुमचा ध्यानधारणेचा योग्य मार्ग आहे, असे समजा. 

Web Title: Have you just started learning meditation? These tips will definitely help you!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.