यशस्वी आयुष्यासाठी 'कायझेन' हे जपानी तंत्र वापरून पाहिले आहे का? नसेल तर वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2021 03:07 PM2021-04-02T15:07:56+5:302021-04-02T15:11:45+5:30

जपानी लोकांचा एक नियम आहे - रोज एक मिनिट स्वतःच्या प्रगतीसाठी! कायझेन तंत्र देखील याच नियमावर आधारित आहे.

Have you tried the Japanese technique of 'Kaizen' for a successful life? If not, read on! | यशस्वी आयुष्यासाठी 'कायझेन' हे जपानी तंत्र वापरून पाहिले आहे का? नसेल तर वाचा!

यशस्वी आयुष्यासाठी 'कायझेन' हे जपानी तंत्र वापरून पाहिले आहे का? नसेल तर वाचा!

googlenewsNext

'आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू असतो!' हे वाक्य आपण बालपणापासून ऐकत, शिकत आणि अनुभवत आलो आहोत. तरीदेखील अजूनही आपल्यात सुधारणा झालेली नाही, असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकीचे आहात. कारण, तुम्ही आळशी असता, तर उत्सुकतेने लिंक उघडून बघण्याचे कष्ट देखील तुम्ही घेतले नसते. त्यामुळे आपण आळशी नाही, याबद्दल सर्वप्रथम स्वतःचे अभिनंदन करा. आता जाणून घेऊ 'कायझेन' या जपानी तंत्राबद्दल!

अस्मानी सुलतानी संकटातून वारंवार सावरूनदेखील जपान या देशाने व्यवसायात किंवा सर्वच क्षेत्रांत बाजी मारली आहे. याचे कारण, तेथील कार्यकुशल आणि कार्यमग्न जनता. तिथेही लोकसंख्या खूप आहे, परंतु सहसा कोणी रिकामे दिसत नाही. रिकामे बसून राहणे त्यांना अपमानास्पद वाटते. या विचारांमुळे जपान आघाडीवर असलेले राष्ट्र आहे. त्यांच्या यशामागे गुपित काय आहे, हे जाणून घेतले असता माहिती मिळाली, ती म्हणजे कायझेन या जपानी तंत्रप्रणालीबद्दल!

कायझेन - काय म्हणजे बदल आणि झेन म्हणजे शहाणपण! याचाच अर्थ, आयुष्यात हळू हळू बदल करणे शहाणपणाचे ठरते. मसाकी इमाई  नामक व्यक्तीने हे तंत्र तयार केले आहे. तुम्हाला वाटेल, यात नवीन काय? हे तर आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. परंतु काही गोष्टी नुसत्या माहीत असून उपयोगाच्या नसतात, तर त्या अंमलात देखील आणाव्या लागतात. त्या कशा आणायच्या याबद्दल प्रयोगातून सिद्ध झालेले हे तंत्र आहे. तिथल्या मोठमोठ्या कंपन्यांमध्येदेखील हे तंत्र  वापरले जाते. 

जपानी लोकांचा एक नियम आहे - रोज एक मिनिट स्वतःच्या प्रगतीसाठी! कायझेन तंत्र देखील याच नियमावर आधारित आहे. स्वतःच्या प्रगतीला एक मिनिट पुरेसा आहे का, ही शंका मनात येणे स्वाभाविक आहे. परंतु यात एक मिनिटाइतके महत्त्व आहे 'रोज' या शब्दाला! ज्या क्षेत्रात तुम्हाला प्रगती करायची आहे ते काम रोज एक मिनिट करणे. एवढा वेळ तर आपण देऊच शकतो ना?

हे तंत्र नक्की काम कसे करते?

या तंत्रानुसार दिवसभरातुन किमान १ मिनिट का होईना आपल्या धयेसाठी आवश्यक असलेली कृती आपल्याला करायला लावते. एखादी गोष्ट जेव्हा आपण सातत्याने करतो, तेव्हा आपल्याला सवय लागते आणि आपण त्या कामात रस घेऊ लागतो. हळू हळू वेळ वाढवतो. कामात रस घेतो आणि पाहता पाहता आपल्या ध्येयाच्या दिशेने पाऊल टाकतो. 

ध्येयपूर्ती न झाल्याचे दुःख वाईट असते. म्हणून दरवर्षी आपण नवनवीन संकल्प करत असतो. पण संकल्प पूर्ण होत नाहीत म्हणून संकल्प करून देणे सोडायचे नाही. इंग्रजी नवे वर्ष गेले म्हणून काय झाले, हिंदू नवे वर्ष येऊ घातले आहे. मनात काही संकल्पाची आखणी केलेली असेल, तर रोज एक मिनिट सरावाने कायझेन तंत्र वापरायला सुरुवात करा. बदल नक्की घडेल. अनेक शुभेच्छा!

Web Title: Have you tried the Japanese technique of 'Kaizen' for a successful life? If not, read on!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.