करिअर, नोकरी,व्यवसायात अडचणी येत आहेत? 'हे' उपाय अवश्य करून पहा!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 12:10 PM2021-08-17T12:10:10+5:302021-08-17T12:11:28+5:30
करिअर आड येणारे अडथळे दूर करण्यासाठी वास्तू शास्त्राने दिलेले उपाय अवश्य करून पहा, तुम्हाला मदत होईल.
यश अपयश या नाण्याच्या दोन बाजू आहेत हे मान्य, पण करिअरची गाडी यशाच्या किंवा अपयशाच्या मार्गाने भरधाव निघाली असेल तर दोन्ही बाजूला धोके आहेच. ज्याप्रमाणे गाडीची गती नियंत्रित ठेवण्यासाठी महामार्गावर गतिरोधक असतात, तसे आपल्या करिअरच्या महामार्गावर यश-अपयशाचे गतिरोधक असणे गरजेचे आहे. गाडी यशाच्या मार्गाने धावत राहिली, तर अहंकाराने गाडीचे टायर निकामी होऊन कधीही अपघात होऊ शकतो आणि अपयशाच्या उतरणीला लागली, तर नैराश्याचा गंज लागूनही गाडी निकामी होऊ शकते. यासाठी संतुलित गतीने, टप्प्याटप्प्याने प्रगती झाली, तर आपले ध्येय आपल्याला निश्चित गाठता येईल. करिअर आड येणारे अडथळे दूर करण्यासाठी वास्तू शास्त्राने दिलेले उपाय अवश्य करून पहा, तुम्हाला मदत होईल.
नोकरी मिळवण्याचे उपाय : नोकरी मिळवण्यासाठी तुम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहात, पण शुल्लक कारणावरून तुमची संधी वारंवार हुकत आहे, असे जर तुम्हाला जाणवत असेल. किंवा व्यवसायात प्रगती होताना काही अडथळे येऊन कामं थांबत आहे असे वाटत असेल तर शुक्रवारी बाजरी आणि तांदूळ आणून ठेवा. शनिवारी सकाळी काम सुरू करण्यापूर्वी पक्ष्यांना बाजरी, तांदूळ घाला. तुमचे काम मार्गी लागे पर्यंत काही शनिवार सातत्याने हा उपाय करा, लाभ होईल.
पद, प्रतिष्ठा, सन्मान मिळवण्यासाठी : अनेकांना मेहनत करूनही जेवढा मान मिळायला हवा तेवढा मिळत नाही. एवढेच काय, तर त्यांच्या कामाची साधी दखलही घेतली जात नाही. अशा लोकांनी तांब्याच्या भांड्यात सोन्याची अंगठी रात्रभर टाकून दुसऱ्या दिवशी सकाळी चुळ भरण्याआधी ते पाणी प्राशन करा. असे केल्याने मनाची अस्वस्थता कमी होऊन मन शांत होते, ताणतणाव कमी होतो. मात्र हा उपाय करताना तांब्याचे भांडे स्वच्छ करून घ्यावे. त्यात जो सोन्याचा दागिना टाकणार असाल, तोही स्वच्छ केलेला असावा व हा उपाय करत असेपर्यंत तो दागिना वापरू नये. त्यामुळे त्याची स्वच्छता टिकून राहील. इच्छित कामनापूर्ण होईपर्यंत हा उपाय करत राहा, अवश्य लाभ होईल.
हितशत्रूंपासून बचावासाठी : आजच्या बनावट दुनियेत आपलं कोण आणि परकं कोण हे सांगणे अवघड आहे. लोक तोंडावर गोड बोलतात आणि पाठीत खंजीर खुपसतात. अशा मतलबी लोकांपासून बचाव करण्यासाठी आणि त्यांच्या कुरघोड्यांपासून रक्षण करण्यासाठी झोपताना डोक्याशी तांब्याचा कलश किंवा पाण्याने भरून ठेवा आणि सकाळी ते पाणी फेकून द्या. या उपायाने तुम्ही अकारण बदनामी होण्यापासून स्वतःला वाचवू शकाल.