छोटासा भूभू आणि त्याचा मित्र यांची हृदयद्रावक गोष्ट तुम्हाला मोठा धडा नक्कीच शिकवेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2021 08:00 AM2021-06-19T08:00:00+5:302021-06-19T08:00:11+5:30

पाठीवर हात ठेवून धीर देणारे कोणी असेल तर मोठ्यात मोठ्या संकटालाही परतवून लावता येते.

The heartbreaking story of little puppy and his friend will surely teach you a big lesson! | छोटासा भूभू आणि त्याचा मित्र यांची हृदयद्रावक गोष्ट तुम्हाला मोठा धडा नक्कीच शिकवेल!

छोटासा भूभू आणि त्याचा मित्र यांची हृदयद्रावक गोष्ट तुम्हाला मोठा धडा नक्कीच शिकवेल!

googlenewsNext

एक मुलगा आपल्या बाबांकडे पाळीव कुत्रा आणावा यासाठी हट्ट करतो. पण बाबा तो हट्ट झुगारून देतात. मुलगा आईला लाडीगोडी लावून पाहतो. पण प्रयत्न व्यर्थ! मुलगा स्वतःच एक कुत्रा विकत घ्यायचा असा निश्चय करतो. 

एक दिवस पिगी बँकमध्ये साठलेले पैसे मोजतो. हजार रुपये जमलेले पाहून खुश होतो. आई बाबांच्या नकळत घराजवळच असलेल्या 'डॉग शॉप' अर्थात पाळीव कुत्र्यांच्या विक्रीच्या दुकानात जातो. दुकानात लावलेली पाटी वाचतो. कुत्र्यांचे भाव दहा हजारांच्या पुढे असतात. मुलगा दुकान मालकाजवळ जातो आणि विनवणी करतो, 'काका, मला एक छोटासा भूभू विकत घ्यायचा आहे. माझ्याजवळ हजार रुपये सुद्धा आहेत. पण तुमच्याजवळ असलेले सगळे भूभू खूपच महाग आहेत. माझ्यासाठी काही पैसे कमी करा ना... आज मी भूभू खरेदी केल्याशिवाय घरी जाणार नाही, असा चंग केला आहे.'

दुकानदार त्या गोड मुलाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणतो, 'बाळा, मला एवढे पैसे कमी करता येणार नाहीत. आणखी काही दिवस तू पिगी बँक मध्ये पैसे जमा कर मग ये हं?'

तेवढ्यात दुकानात काम करणारा एक माणूस दोन चार कुत्र्यांना एका खोलीतून दुसरीकडे नेत असतो. पुढचे दोन-तीन कुत्रे वेगाने धावत जातात, शेवटचा कुत्रा मात्र लंगडत हळू हळू जात असतो. त्याला पाहून मुलगा दुकानदाराला म्हणतो, 'तो शेवटचा भूभू मला द्याल का?'
दुकानदार म्हणतो, 'तो लंगडणारा कुत्रा नेऊन तू काय करणार? तो तुझ्याशी खेळूही शकणार नाही. तरी तुला तो आवडला असेल तर फुकट घेऊन जा. मला तसाही त्याचा उपयोग नाही...'
मुलगा म्हणाला, 'काका, मला तो आवडला, पण मला फुकट नको. त्याबदल्यात हे पैसे ठेवून घ्या.' 

मुलगा त्या भूभूला घेऊन जायला निघतो. तेव्हा दुकानदार त्याला अडवून म्हणतो, 'बाबांच्या मागे लागून यापेक्षा चांगला कुत्रा तुला निवडता आला असता, पण तू याचीच निवड का केलीस?'
तेव्हा मुलाने हसून आपल्या डाव्या पॅन्टचे कापड वर करत दुकानदाराला सांगितले, 'काका, कारण मी पण त्याच्याच सारखा आहे. माझे बाबा जसे माझ्या पाठीशी आहेत, तसाच मला या भूभूला दिलासा द्यायला आवडेल, की तू एकटा नाहीस, मी तुझ्या बरोबर आहे...!'

Web Title: The heartbreaking story of little puppy and his friend will surely teach you a big lesson!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.