त्याचा कोव्हीड रिपोर्ट 'निगेटिव्ह' आला, पण माणूस 'पॉझिटिव्ह' झाला!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2021 12:46 PM2021-07-05T12:46:53+5:302021-07-05T12:47:08+5:30

या जगात आपल्यावर निस्वार्थ प्रेम कोण करत असेल तर ते म्हणजे आपले जन्मदाते माता पिता. त्यांना दुखावण्याची चूक करू नका.

His Covid report came out 'negative', but the man turned out to be 'positive'! | त्याचा कोव्हीड रिपोर्ट 'निगेटिव्ह' आला, पण माणूस 'पॉझिटिव्ह' झाला!

त्याचा कोव्हीड रिपोर्ट 'निगेटिव्ह' आला, पण माणूस 'पॉझिटिव्ह' झाला!

Next

गेल्या दीड वर्षात कोव्हीड काळाने आयुष्याकडे बघण्याचा, नातेसंबंधांना पारखण्याचा, जीवनाकडे सकारात्मकतेने पाहण्याचा आणि कठीण प्रसंगाला धीराने तोंड देण्याचा पाठ शिकवला. पण याही पलीकडे अनेकांच्या आयुष्यात विविध प्रकारे परिवर्तन घडले. जसे की या माणसाच्या बाबतीत घडले... 

आज सकाळीच ऐकलेली ही गोष्ट. कोरोनाच्या पहिल्या लाटेतली अर्थात गेल्या वर्षाच्या सुरुवातीच्या काळातली. तेव्हा सर्वत्र परिस्थिती अतिशय गंभीर होती. एक माणूस दोनदा कोव्हीड चाचणी करून तिसऱ्यांदा चाचणी करून घेण्यासाठी दवाखान्यात दाखल झाला. आधीच्या दोन चाचण्या पॉझिटिव्ह आल्याने त्याला कोव्हीड विभागात ठेवले होते. वीस दिवस तिथे राहिल्यानंतर त्याला कधी एकदा घरी जातो असे झाले होते. अपेक्षेप्रमाणे त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आणि त्याला घरी जाण्याची मुभा मिळाली. 

त्याला खूप आनंद झाला. एक रुग्ण बरा होऊन घरी जात असल्याने दवाखान्यातून डॉक्टर आणि परिचारिकांनी त्याला आनंदाने निरोप दिला. तो घरी येतोय ही वार्ता कळताच त्याच्या सोसायटीत उत्सवाचे वातावरण तयार झाले. सुरक्षित अंतर राखून सर्वानी त्याचे स्वागत केले. पुष्पगुच्छ दिला. नाचत गात स्वागत झाले. त्याने आपले घर गाठले. बायकोने ओवाळून स्वागत केले. मुलांनी आनंद साजरा केला. परंतु त्या सर्वांशी काही न बोलता तो माणूस थेट आतल्या खोलीत गेला. खोलीचे दार उघडले आणि आईला घट्ट मिठी मारली. 

आईने त्याला मायेने जवळ घेतले आणि म्हणाली, 'सुखरूप घरी आलास, आता कुठे माझा जीव भांड्यात पडला. एकट्याला काही त्रास नाही ना झाला?'
आईचे हे शब्द ऐकून त्याच्या डोळ्यात पाणी तराळले. तो आईचे पाय धरून माफी मागू लागला. तो कसली माफी मागतोय हे आईला कळेना. तिने त्याला सावरत उभे केले. तो मात्र आईचे हात धरून म्हणाला, 'आई, गेले वीस दिवस मला एकाकी बंदिस्त केलेले असताना त्या एकांताने जीव नकोसा झाला होता. पण त्याक्षणी जाणीव झाली, की बाबा गेल्यानंतर गेली पाच वर्ष मी तुला आयसोलेट वॉर्ड मध्ये ठेवल्यासारखी एकाकी ठेवली आहे. मला खूप पश्चात्ताप झाला. यापुढे तुला एकटीला ठेवणार नाही. तुला या खोलीत न ठेवता आमच्या बरोबर घरातल्यांमध्ये ठेवीन. आई मी चुकलो, मला फार कर. माझा रिपोर्ट निगेटिव्ह आला, पण माझ्या चुकांची जाणीव होऊन माझा दृष्टिकोन पॉझिटिव्ह झाला!'

या जगात आपल्यावर निस्वार्थ प्रेम कोण करत असेल तर ते म्हणजे आपले जन्मदाते माता पिता. त्यांना दुखावण्याची चूक करू नका. या व्यक्तीला स्वानुभवातून जसा सकारात्मक दृष्टिकोन मिळाला, ही कथा वाचून आपणही आपला दृष्टिकोन बदलूया आणि माता पित्याची सेवा, कुटुंबावर प्रेम, आप्त स्वकियांशी स्नेह आणि सर्वांशी सहानुभूतीने वागण्याचा सदैव प्रयत्न करूया. 
 

Web Title: His Covid report came out 'negative', but the man turned out to be 'positive'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.