Holi 2021: मथुरेत आजच्या दिवशी खेळतात, फुलांची होळी; काय आहे त्यामागे पौराणिक कथा, जाणून घ्या.
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 12:12 PM2021-03-15T12:12:41+5:302021-03-15T12:13:08+5:30
Holi 2021: आजच्या काळाशी या सणाचा संबंध जोडायचा ठरवला, तर रंगपंचमीच्या दिवशी केमिकल रंगांनी होळी न खेळता, नैसर्गिक रंगांनी होळी खेळावी, हा संदेश या सणातून घेता येऊ शकतो.
मार्च महिना लागला, की आपले लक्ष दिनदर्शिकेकडे जाते आणि आपल्यातलाही गब्बर उत्सुकतेने पाहतो, 'कब है होली?' यंदा २८ मार्च रोजी होळी आहे. परंतु देशभरात होळी साजरी करण्याची पद्धत वेगवेगळी असल्यामुळे होळीचे वेध फार आधीपासून लागतात. उत्तर भारतात तर होळीला अतिशय महत्त्व आहे. होळी, धुळवड, रंगपंचमी याबरोबर 'फुलेरा दुज' नावाने आजच्या दिवशी होळी खेळली जाते. यामागे एक कथा आहे.
राधा आणि कृष्ण यांच्या प्रेमाचे दाखले आजही दिले जातात. कृष्णाचा विवाह रुख्मिणी, सत्यभामाशी होऊनसुद्धा कृष्णाचा आठव करताना राधाकृष्ण हेच नाव आपल्या ओठी येते. एवढे त्यांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होते. त्यांच्या प्रेमात शारीरिक नाही आंतरिक ओढ होती. याच ओढीमुळे एकदा राधा कृष्णावर रागावली. कारण अनेक दिवसात त्यांची परस्परांशी भेट झाली नव्हती. राधेने अनेकदा कृष्णाला साद घातली, परंतु मथुरेच्या व्यापात अडकलेल्या कृष्णाला येणे जमत नव्हते.
राधा हिरमुसली. कृष्णाच्या विरहाने व्याकुळ झाली. तिची अवस्था पाहून गोप गोपिकासुद्धा श्रीकृष्णावर रागावलया. एवढेच काय, तर वृन्दावनातल्या लता,
वेलीसुद्धा कोमेजून गेल्या. ही वार्ता मथुरेत कृष्णाला कळली. कृष्णाला राहवेना. त्याने येतो, असा निरोप धाडला. कृष्ण येणार हे कळताच वृंदावनातले वातावरण आनंदून गेले.
कृष्ण वृंदावनी आला. त्याने राधेची भेट घेतली आणि तिला नुकतेच उमललेले एक सुंदर फुल भेट म्हणून दिले. राधेनेही कृष्णाला छानसे फुल भेट म्हणून दिले. त्या दोघांचा परस्परांना पाहून झालेला आनंद पाहता साऱ्या सृष्टीने दोघांवर पुष्प वृष्टी केली. त्या भेटीनंतर कृष्ण होळी, रंगपंचमी झाल्यावर मथुरेत परतला. तेव्हापासून फाल्गुन द्वितीयेच्या दिवशी फुलेरा दुज हा उत्सव मथुरा आणि वृंदावनात साजरा केला जातो.
हा सण वसंत ऋतूशी जोडलेला आहे. वसंतात उमलणाऱ्या विविध फुलांशी आपला परिचय व्हावा, निसर्गाशी जवळीक साधता यावी आणि दाम्पत्यांमध्ये प्रेम संबंध अधिक घट्ट व्हावेत, हा या सणामागील मुख्य उद्देश आहे.
आजच्या काळाशी या सणाचा संबंध जोडायचा ठरवला, तर रंगपंचमीच्या दिवशी केमिकल रंगांनी होळी न खेळता, नैसर्गिक रंगांनी होळी खेळावी, हा संदेश या सणातून घेता येऊ शकतो.