Holi 2022: यंदाच्या होळीला जुळून येतायत ३ राजयोग! अद्भूत शुभ संयोगात होलिकादहन; लाभच लाभ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 07:21 AM2022-03-15T07:21:20+5:302022-03-15T07:22:44+5:30
Holi 2022: यंदाच्या होलिकादहनाला ऐतिहासिक दुर्मिळ अद्भूत योग जुळून येत असून, त्याचा मोठा फायदा मिळू शकेल, असे सांगितले जात आहे.
मराठी वर्षातील शेवटचा सण म्हणून होळी साजरी केली जाते. देशभरात होळीचे विविध रंग पाहायला मिळतात. मथुरा, ब्रज, येथे तर अनोख्या पद्धतीने हा सण साजरा केला जातो. वाईटावर चांगल्याचा विजय म्हणूनही होळीकडे पाहिले जाते. वास्तविक पाहायला गेल्यास पौर्णिमेपासून पंचमीपर्यंत हा सण साजरा करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे. मात्र, आधुनिक काळात होलिकादहन आणि धुळवड किंवा धुलिवंदन याला अधिक महत्त्व प्राप्त झालेले दिसते. सन २०२२ मध्ये १७ मार्च रोजी होळी म्हणजेच होलिकादहन आहे. या दिवशी ३ राजयोगासह अत्यंत शुभ, अद्भूत योग जुळून येत आहेत. नेमके कोणते संयोग जुळून येत आहेत, ते जाणून घेऊया...
यंदाच्या होळीला भद्रा दोष लागत आहे. त्यामुळे होलिकादहन सांयकाळीऐवजी रात्रीच्यावेळी पूर्वाफाल्गुनी नक्षत्रात होणार आहे. होलिकादहनावेळेला अद्भूत ग्रहयोग जुळून येत आहेत. याशिवाय, गजकेसरी, वरिष्ठ आणि केदार नामक तीन राजयोगही आहेत. आतापर्यंत होळीच्या दिवशी असा महासंयोग कधीही जुळून आला नव्हता, असे सांगितले जात आहे. शुभसंयोगात होणाऱ्या होलिकादहनाचा उत्तम प्रभाव पडेल. मान-सन्मान वृद्धिंगत होतील, अनेकविध लाभांसह कौटुंबिक सुख, समृद्धी यात वाढ होईल असे म्हटले जात आहे.
होलिकादहनाला दुर्मिळ शुभसंयोग
यंदा २०२२ रोजी गुरुवारी होलिकादहन आहे. हा दिवस गुरुला समर्पित असल्याचे मानले जाते. त्यामुळे हा दिवस शुभ मानला गेला आहे. गुरु आणि चंद्राच्या युतीमुळे गजकेसरी योग जुळून येत आहे. याशिवास वरिष्ठ आणि केदार योगही जुळून येत आहेत. होलिकादहनाला तीन राजयोग जुळून येणे ही ऐतिहासिक बाब असल्याचे काही ज्योतिषांचे म्हणणे आहे. इतकेच नाही, तर सूर्याचे मित्र राशीत असणेही शुभ मानले गेले आहे. यामुळे शोक आणि रोगांचा नाश होऊन शत्रूवर विजय प्राप्त करता येऊ शकतो.
शुक्र आणि शनी एकाच राशीत विराजमान
होलिकादहनाला नक्षत्र, महिने आणि ऋतुचे स्वामी एकाच राशीत असल्याचे सांगितले जात आहे. १४ मार्च रोजी वसंत ऋतुची सुरुवात होत आहे. याचा स्वामी शुक्र असल्याचे मानले जात आहे. शुक्रचे स्वामित्व असलेल्या पूर्वाफाल्गुनी नक्षत्रात होलिकादहन होणार आहे. सदर ग्रहयोग सुख-सुविधा, समृद्धी, उत्सव, हर्ष आणि ऐश्वर्य यांचा कारक मानला गेला आहे. तर, फाल्गुन महिन्याचे स्वामित्व शनीकडे आहे. शुक्र आणि शनी दोन्ही मित्र ग्रह मानले गेले असून, होलिकादहनाला हे दोन्ही ग्रह मकर राशीत विराजमान असतील. ही स्थिती शुभबाबींमध्ये आणखी भर घालणारी आहे, असे म्हटले जात आहे.
देशासाठी शुभ संकेत
होलिकादहनादिवशी जुळून येत असलेल्या अद्भूत योग देशासाठी शुभ संकेत असल्याचे सांगितले जात आहे. यानंतर दिवाळीपर्यंत तेजीचा माहौल कायम राहील. व्यवसाय, व्यापार, उद्योग करणाऱ्यांसाठी लाभाच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतील. सरकारी कोषालाही फायदा मिळू शकेल. टॅक्स वसुली वाढू शकेल. विदेशी गुंतवणुकीतून चांगली वृद्धी, परतावा मिळू शकेल. आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेली मंदी काही प्रमाणात कमी होऊ शकेल. संसर्गजन्य रोगाचे प्रमाण बहुतांशरित्या कमी होऊ शकेल. उद्योग वाढू शकतील. महागाई नियंत्रणात आणण्यात काही प्रमाणात यश मिळू शकेल, असा अंदाज असल्याचे सांगितले जात आहे.