Holi 2022: होळीच्या दिवशी भांग का प्यायली जाते?, जाणून घ्या धार्मिक महत्त्व...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 05:16 PM2022-03-14T17:16:01+5:302022-03-14T17:16:53+5:30
होळी सण देशभरात उत्साहात साजरा केला जातो. यंदा होळीचा सण १७ मार्च आणि धुलिवंदन १८ मार्च रोजी साजरा केला जाणार आहे. होळीचा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतिक मानला जातो.
होळी सण देशभरात उत्साहात साजरा केला जातो. यंदा होळीचा सण १७ मार्च आणि धुलिवंदन १८ मार्च रोजी साजरा केला जाणार आहे. होळीचा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतिक मानला जातो. दरवर्षी या दिवशी मोठ्या संख्येने लोक जमतात, रंग खेळतात, नाचतात, स्वादिष्ट पदार्थ खातात आणि एकमेकांना शुभेच्छा देतात. दुसरीकडे, होळीचा सण भांगेशिवाय अपूर्ण मानला जातो. होळी सणात भांग सुद्धा प्यायली जाते. या दिवशी लोक वेगवेगळ्या प्रकारे भांगेचं सेवन करतात. यामध्ये भांग लस्सी, भांग पकोडे, भांग थंडाई आणि भांग गुजिया यांचा समावेश असतो.
भांगेचं धार्मिक महत्व
समुद्रमंथनाच्या वेळी बाहेर पडलेलं विष भगवान शंकरानं आपल्या कंठातून खाली उतरू दिलं नाही. हे विष खूप गरम होतं. त्यामुळे शिवाला उष्ण वाटू लागलं. शिव कैलास पर्वतावर गेले. विषाची उष्णता कमी करण्यासाठी भगवान शंकरानं भांगाचं सेवन केलं. भांग हे थंडगार मानलं जातं. तेव्हापासून भगवान शिवाला भांग खूप आवडते, असं मानलं जातं. भगवान शंकराच्या पूजेदरम्यानही भांग वापरतात. भांगेशिवाय शिवाची पूजा अपूर्ण आहे, असं मानलं जातं. शिवपूजेत भांग अर्पण केल्यानं भगवान शिव प्रसन्न होतात, असं सांगितलं जातं. भांग आणि बेलाची पानेही अर्पण केली जातात.
होळीच्या दिवशी भांग का प्यायली जाते?
धार्मिक मान्यतेनुसार होळीच्या दिवशी भगवान शिव आणि विष्णू मैत्रीचे प्रतीक म्हणून भांगेचं सेवन करतात. वास्तविक असं मानलं जातं की भक्त प्रल्हादला मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या हिरण्यकशिपूला मारण्यासाठी भगवान विष्णूने नरसिंहाचे रूप घेतले होते. पण हिरण्यकशिपूचा वध केल्यावर नरसिंहाचा अवतार संतापला होता आणि त्याला शांत करण्यासाठी भगवान शिवाने शरभाचा अवतार घेतला होता. होळीच्या दिवशी भांग पिण्याचं हेही एक कारण असल्याचं मानलं जातं. त्याचा प्रसाद म्हणून सेवन केला जातो. याशिवाय इतरही अनेक कथा लोकप्रिय आहेत.
(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)