Holi 2023: प्रापंचिक होळी आपण खेळतोच, अध्यात्मिक होळी कशी खेळावी तेही जाणून घेऊ!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2023 07:00 AM2023-03-07T07:00:00+5:302023-03-07T07:00:02+5:30
Holi 2023: रंगांनी केवळ शरीर नाही, तर मन रंगून जावे वाटत असेल तर मनाच्या पातळीवर होळी कशी खेळावी ते जाणून घेऊ!
आपण सगळे जण सण-उत्सवाच्या निमित्ताने क्षणिक सुख वेचत असतो. मात्र संत सज्जन कायमस्वरूपी आत्मानंदाची अनुभूती घेत असतात. त्यासाठी त्यांना कोणत्याही औचित्याची गरज लागत नाही. ते शारीरिक पातळीवर संसार करत असले तरी तरी मानसिक पातळीवर भगवंताशी एकरूप झालेले असतात. त्यामुळे ते लौकिक पातळीवर आपल्यासारखे सण उत्सव साजरा करताना दिसत असले तरी अध्यात्मिक पातळीवर त्यांच्या उत्सवाचे रूप कसे असते ते नेत्रतज्ज्ञ डॉ. प्रसाद वाळिंबे यांनी सुंदर शब्दात मांडले आहे.
कराया साजरा । होलिकेचा सण ।
मनाचे स्थान । निवडीले ।।
ऐसे ते स्थान । साधने सरावले ।
भक्तीने शिंपिले । केले सिद्ध ।।
त्या स्थानी खळगा। समर्पणाचा केला।
त्यात उभा ठेला । अहंकार एरंड ।।
रचलीया तेथे। लाकडे वासनांची ।
इंद्रीयगोवऱ्याची। रास भली ।।
गुरुकृपा तैल । रामनाम घृत ।
अर्पिले तयात । ऐसे केले ।।
रेखिली भोवती । सत्त्कर्म रांगोळी ।
भावरंगाचे मेळी । शोभिवंत ।।
वैराग्य अग्नीसी । तयाते स्थापिले ।
यज्ञरूप आले । झाली कृपा ।।
दिधली तयाते। विषय पक्वान्नाहुती ।
आणिक पुर्णाहूती । षड्रिपु श्रीफळ।।
झाले सर्व हुत । वैराग्य अग्नीत ।
जाणावया तेथ । नूरले काही ।।
वाळ्या म्हणे जनी ।
व्हावी ऐसी होळी ।।
जेणे मुक्तीची दिवाळी।
अखंडित ।।
मनोभूमीवर होळी रचण्याचे ठरवले आहे. भक्तीने ते अंगण सारवून घेतले. तिथे समर्पणाचा खळगा केला आणि त्यात अहंकाराचे एरंड टाकले. वासनेचे लाकूड सारण म्हणून घातले. इंद्रिय गोवऱ्यांची भर घातली. गुरु कृपेचे तेल, रामनामाचे तूप त्यात अर्पण केले. सत्कर्माच्या रांगोळीने ती होळी सुशोभित केली. वैराग्य अग्नीची ठिणगी पाडली त्यामुळे यज्ञरूप प्रगट झाले. विषय-इच्छांचा नैवेद्य दाखवला आणि षडरिपूची पूर्णाहुती दिली. भक्तीमार्गात अडसर आणणाऱ्या या सगळ्या गोष्टी होळीत भस्मसात झाल्याने आता अध्यात्म रंगाची रंगपंचमी रंगेल आणि तो चिरंतन आनंद दिवाळीसारखा न संपणारा असेल!