Holi 2023 : होलिकादहन का, कसे, कुठे, कधी आणि केव्हा करायचे, वाचा शास्त्रोक्त माहिती!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2023 07:00 AM2023-03-04T07:00:00+5:302023-03-04T07:00:02+5:30

Holi 2023: होलिका दहन आणि पूजन कधी, कसे आणि का करावे याची संपूर्ण माहिती जाणून घ्या!

Holi 2023 : Why, how, where and when to do Holikadahan, read scientific information! | Holi 2023 : होलिकादहन का, कसे, कुठे, कधी आणि केव्हा करायचे, वाचा शास्त्रोक्त माहिती!

Holi 2023 : होलिकादहन का, कसे, कुठे, कधी आणि केव्हा करायचे, वाचा शास्त्रोक्त माहिती!

googlenewsNext

भक्त प्रल्हादाची आत्या आणि हिरण्यकशिपूची बहीण  होलिका हिला अग्नीपासून अभय होते. त्यामुळे भावाच्या सांगण्यावरून ती प्रल्हादाला जाळून ठार मारण्यासाठी स्वत:च्या मांडीवर घेऊन बसली. मग तिच्याभोवती लाकडे रचून आग लावण्यात आली. मात्र झाले उलटेच! भगवान श्रीविष्णूंच्या कृपेमुळे प्रल्हाद सुरक्षित राहिला आणि होलिका राक्षसी मात्र जळून खाक झाली. त्या प्रित्यर्थ होलिकादहन विधी करण्याची प्रथा पडली. तो दिवस होता फाल्गुन पौर्णिमेचा! म्हणून आजही फाल्गुन पौर्णिमेला होलिकादहन केले जाते. 

यंदा फाल्गुन पौर्णिमा सोमवारी ६मार्च २०२३ रोजी सायंकाळी ४. १७ मिनिटांनी सुरू होणार असून, मंगळवारी ७ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजून ९ मिनिटांनी फाल्गुल पौर्णिमा समाप्त होईल. होळीचा सणाच्या दिवशी रात्री होलिकादहन केले जात असल्यामुळे ६ मार्च रोजी रात्री हा सण साजरा केला जाईल. 

फाल्गुन पौर्णिमेला सायंकाळी होळी पेटवावी. मात्र दिवसा कधीही होळी पेटवू नये. होळी शक्यतो गावामध्ये किंवा गावाबाहेर सार्वजनिक स्वरूपात पेटवण्याची प्रथा आहे. 

ज्या ठिकाणी होळी पेटवायची असेल, ती जागा सकाळीच केर काढून पाणी शिंपडून स्वच्छ करून घ्यावी. नंतर त्या जागी झाडाच्या वाळलेल्य फांद्या, काटक्या, गोवऱ्या ह्यांची ढीग रचून ठेवावा. मध्ये एक फांदी उभी करावी. जो होळीची पूजा करून ती पेटवणार आहे, त्याने संध्याकाळी पुन्हा स्नान करून शुचिर्भूत व्हावे. होळीच्या पूजेचा मान ज्येष्ठ किंवा सन्माननीय व्यक्तीला दिला जातो. 

पूजा करणाऱ्या व्यक्तीने देश, कालाचा उच्चार करून 'ढुंढा राक्षसीकडून होणाऱ्या पीडांच्या परिहारार्थ या होलिकेचे पूजन मी करत आहे' असा जमलेल्या सर्वांच्या वतीने संकल्प करावा. नंतर होळीची षोडशोपचारे पूजा करावी. तिला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा. नंतर ती होळी पेटवावी. काही ठिकाणी होळी पेटवण्यापूर्वी पूजा करतात, तर काही ठिकाणी पेटवून झाल्यानंतर करतात. परंतु होळी प्रदिप्त करण्यापूर्वी पूजा करणे सुरक्षेच्या दृष्टीने उचित ठरते. 

होळी पेटवल्यानतर तिला सर्वांनी तीन प्रदक्षिणा घालून मुलांच्या रक्षणार्थ तिची प्रार्थना करून अर्घ्य द्यावे. पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा. श्रीफळ वहावे. 
होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवड साजरी केली जाते. हा धूलिवंदनाचा सण मुळात चार दिवस साजरा करण्याची प्रथा आहे. होळीपासून पाचव्या दिवसाला म्हणजेच फाल्गुन कृष्ण पंचमीला 'रंगपंचमी' म्हणतात. ती प्रामुख्याने मथुरा, द्वारका अशा कृष्णाच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या स्थळी शास्त्रोक्त पद्धतीने खेळली जाते.

Web Title: Holi 2023 : Why, how, where and when to do Holikadahan, read scientific information!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Holiहोळी 2022