Holi Rituals 2023: लक्ष्मी प्रसन्न व्हावी म्हणून सणासुदीला सवाष्ण जेवू का घालतात? वाचा धर्मशास्त्राचा विचार!
By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: March 6, 2023 11:09 AM2023-03-06T11:09:04+5:302023-03-06T11:10:20+5:30
Holi Ritulas 2023: अन्नदान हे श्रेष्ठ दान मानले जाते. एखादा जीवात्मा तृप्त झाला तर लक्ष्मी प्रसन्न व्हायला कितीसा अवधी लागणारे? पण मग सवाष्णच का? वाचा!
>> ज्योत्स्ना गाडगीळ
लक्ष्मी प्रसन्न व्हावी असे वाटत असेल तर गृहलक्ष्मी तृप्त असायला हवी, हा संसाराचा मूलमंत्र आहे. मात्र कामाच्या धबडग्यात गुंतून गेलेली 'ती' ना स्वतःकडे लक्ष देत ना कोणाचे तिच्याकडे लक्ष जात. अलीकडे आपण 'जागतिक महिला दिन' साजरा करायला लागलो, मात्र भारतीय संस्कृतीने घराघरातल्या 'ती'ची आठवण ठेवत व्रत वैकल्याच्या निमित्ताने पूर्वापार तिचा सन्मान केला आहे. कसा ते पाहू!
हॉटेलमध्ये जेवायला जाणे आताच्या काळात नाविन्यपूर्ण राहिले नाही. उठसूट जंक फूड खाणारे लोक क्वचितच घरी जेवत असतील. मात्र रोज संसार, नोकरी, मुलांच्या शाळा, अभ्यास, नवऱ्याचा डबा, घरच्यांचे जेवण, नाश्ता यात गुंतलेली गृहिणी नवऱ्याने 'बाहेर जेवायला जाऊया का?'विचारल्यावर आनंदून जाते. कारण सकाळ, दुपार, संध्याकाळ 'रांधा वाढा उष्टी काढा' करून ती दमून जाते, कंटाळून जाते. आजही ७० टक्के घरात हेच चित्र आपल्याला दिसेल. 'द ग्रेट इंडियन किचन' या मल्याळम चित्रपटातून या गोष्टीची जाणीव करून दिली आहे. त्यामुळे हॉटेलमध्ये जाऊन आयते गरमागरम जेवणे आणि त्यानंतर पसारा आवरावा न लागणे यातच तिला कोण एक आनंद असतो!
मात्र पूर्वी हॉटेलमध्ये जेवणे असभ्यपणाचे लक्षण मानले जाई. घरातले पुरुष हॉटेलात जात नसत तर स्त्रियांचे जाणे दूरच! सगळ्यांना गरमागरम जेवण वाढणारी, दुसऱ्यांच्या आवडी निवडी जपणारी ती आयते जेवण मिळण्यापासून वंचित राही. अशा अन्नपूर्णेलाही पहिल्या पंगतीचा मान मिळावा म्हणून धर्मशास्त्राने सण उत्सवाच्या निमित्ताने सवाष्ण जेवू घालण्याची प्रथा सुरु केली असावी.
सण उत्सवाच्या निमित्ताने आप्तेष्टांच्या घरी बोलावल्यावर जेवायला जायचे, पाटावर आयते बसायचे, यथेच्च जेवायचे आणि तृप्ततेची ढेकर द्यायची, हा आनंद कोणत्याही संसारी स्त्रीसाठी शब्दातीत असतो. तसेही रोज रोज आपल्याच हातचे जेवून तिला कंटाळा येतो, म्हणून या निमित्ताने झालेली चवबदल तिला रुचते! हॉटेलमध्ये एखादी पोळी, रोटी, नान एक्ट्रा घेतली तरी तिचे वरचे पैसे मोजावे लागतात, याउलट जेवायला मानाने बोलावल्यावर अगत्याने, प्रेमाने, आपुलकीने पोळीचा, भाताचा, गोडाचा आग्रह केला जातो. त्या पाहुणचाराने ती सुखावते आणि मनापासून आशीर्वाद देते. या सदिच्छा ज्याला आजच्या काळात आपण 'पॉझिटिव्ह वाइब्स'' म्हणतो, त्या संबंधित वास्तूला लाभदायी ठरतात. तृप्त झालेला आत्माच या सदिच्छा देऊ शकतो.
म्हणून आपल्या संस्कृतीत अन्नदानाला महत्त्व दिले आहे. भुकेल्या माणसाला अन्न आणि पैसे यातून काय निवडणार विचारले, तर तो अन्न निवडेल. कारण पैसे कधीही कमवता येतात, मात्र दोन वेळेची भूक शमवता येत नाही.
गृहिणीला स्वगृही जेवण मिळतेच. पण अशा पद्धतीने केलेला तिचा आदरसत्कार तिला नवीन ऊर्जा, उत्साह आणि प्रसन्नता देतो. म्हणून सण उत्सवाला तिला जेवू घालणे हे तिचे माहेरपण करण्यासारखेच असते.
धर्मशास्त्राने प्रत्येक समाज घटकाचा दूरदृष्टीने केलेला विचार पाहता आपल्या संस्कृतीबद्दल असलेला अभिमान दुणावतो. म्हणून आपणही ही उद्दात्त संस्कृती पुढच्या पिढीकडे हस्तांतरित केली पाहिजे. आणि आदर्श जीवनाचा वस्तुपाठ घालून दिला पाहिजे. तर मग यंदा होळीच्या निमित्ताने पुरणा-वरणाचा स्वयंपाक जेवायला कोणत्या सखीला आमंत्रित करताय?