टेबल-खुर्चीवर बसून केलेले भोजन अशास्त्रीय कसे ठरते व त्यामुळे कोणते उदरविकार जडतात?वाचा!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 12:35 PM2021-10-25T12:35:13+5:302021-10-25T12:36:31+5:30
अन्नाला आपण पूर्णब्रह्म मानतो, त्यामुळेया अन्न वाढलेले ताट आपल्या पायाच्या पातळीशी न ठेवता चौरंगावर ठेवणे उचित ठरते.
आपल्या जुन्या संस्कृतीप्रमाणे भोजन करताना दोन प्रकारचे पाट वापरत असत. एक पाट बसण्यासाठी व दुसरा पाट ताट ठेवण्यासाठी. त्यातही ताट ठेवण्याचा पाट अधिक लांब रुंद व दोन बोटे उंच असे. त्यामागील शास्त्रीय भूमिका म्हणजे 'अन्न हे पूर्ण ब्रह्म' मानण्यात आले आहे. भोजन हे वास्तविक जेवण नसून यज्ञकर्म आहे. असे समजून अन्नग्रहण केल्यास त्या अन्नाविषयीचा व भोजन प्रक्रियेविषयीचा आदर वाढून त्यामागे एक आध्यात्मिक बैठक येते.
अन्नाला आपण पूर्णब्रह्म मानतो, त्यामुळेया अन्न वाढलेले ताट आपल्या पायाच्या पातळीशी न ठेवता चौरंगावर ठेवणे उचित ठरते. लिंगायत समाजात आजही अन्नाचे ताट तिपाईवर ठेवून जेवण करतात असे दिसून येते. म्हणून आपल्या बैठकीपेक्षा थोड्या उंच बैठकीवर अन्नाचे ताट ठेवून भक्षण करणे हे यज्ञकर्म होईल.
अन्नभक्षण करताना पाय पसरून, पालथी मांडी घालून वा पाय उंच करून बसण्यास निषेध सांगितला आहे. कारण पाय पसरून ताणला गेल्यास पोटातील आतडीही ताणली जातात, जठरावर ताण पडतो. पोटातील पचनक्रियेचे अवयव ताणलेल्या स्थितीत असताना अन्नग्रहण केल्यास अग्निमांद्य, अपचन, वायुप्रकोप (गॅसेस) असे उदरविकार निर्माण होतात.
हल्ली टेबल खूर्ची घेऊन जेवायची पद्धत आहे. त्यामुळेही उदरविकारांचे प्रमाण वाढले आहे. टेबलावर अन्न ठेवून खुर्चीवर बसल्यामुळे पाय खाली सोडणे भाग पडते. त्यामुळे आपोआपच पचनेंद्रियावर ताण येतो. यासाठी टेबलावर भोजन टाळावे. व अत्यावश्यक असलयास निदान खुर्चीवर का होईना पण व्यवस्थित मांडी घालून मगच भोजन करावे. घराबाहेर तसे करणे शक्य नाही, पण निदान घरी जेवताना भारतीय बैठकीनुसार जमिनीवर बसून जेवण्याची सवय ठेवावी. कारण तिच उत्तम आरोग्याची किल्ली आहे.