मनाचे व्यवस्थापन कसे करायचे?, जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2020 07:59 AM2020-03-03T07:59:20+5:302020-03-03T08:48:00+5:30
मनाला काय पाहिजे या प्रश्नाचे उत्तर फार सोपे आहे, मनाला पाहिजे स्थिरता. प्रचंड शक्तीच्या या मनाच्या घरी दुष्काळ आहे तो फक्त या स्थैर्याचा.
मनाचे व्यवस्थापन करायचे म्हणजे मनाला आवरायचे असते, मनाला सावरायचे असते, मनाला सजवायचे असते आणि मनाला जोडायचे असते. मन मोठे विलक्षण आहे म्हटले तर मन आहे शंकर नाही तर तेच आहे भयंकर, म्हटले तर मन आहे हनुमान नाही तर तेच आहे चंचल मर्कट, मन हे देव आहे तसे ते दैत्यही आहे, मनहे परम मित्र आहे तसे ते मोठे शत्रूही आहे. मोक्षप्राप्त करून देणारे मनच व भवबंधनात जखडून टाकणारे मनच.
अति विलक्षण मन प्रत्येक मानवाच्या वाट्याला आलेले आहे. अशा जबरदस्त व बलवान मनाला आवरल्याशिवाय मानवाला तरणोपाय नाही, मन हे लहान मुलासारखे आहे. मुलाचे लाड केले तर लाडाऊन हाताबाहेर जाते, त्याला मार देत राहिलात तर ते कोडगे बनते, मुलाची उपेक्षा केली तर कुठल्या क्षणीये काय प्रसंग आपल्यावर ओढवून आणील हे सांगता येणे कठीण आहे, आपल्या मनाचे अगदी तसेच आहे. मनाला मोकळे सोडले तर ते डोक्यावर बसते, जर मनाला मारण्याचा प्रयत्न केला तर ते उरावर बसते. मनाचीउपेक्षा केली तर ते दबा धरून बसते व संधी सापडताच आपला घात करते.
अशा या मनाला आवरायचं कसं? हाच मानवाच्या पुढे भला मोठा यक्ष प्रश्न आहे. या मनाचा प्रश्न सोडविण्यासाठी निरनिराळी माणसे निरनिराळे प्रयत्न करतात,परंतु या मनाला आवरण्याचा प्रयत्न करताना हे मन अधिकच भरकटत जाते.अशा बिकट परिस्थितीत मनाला आवरण्यासाठी काय करायचे? याला उत्तर अस की मनाला जे पाहिजे ये मनाला दिले कि मन वश होते, यावर तुम्ही म्हणाल सध्या आम्ही तेच करीत आहोत,पण मन काही आवरता येत नाही उलटते जास्तच भरकटत चालले आहे. सध्या आपण काय करतो? मनाला जे पाहिजे तेच देतो.मनाला पाहिजे सिनेमा,तात्काळ मनाची मागणी मान्य. मनाला पाहिजे दारु तात्काळ गुंत्यात प्रयाण, मनाने मागण्याचा अवकाश की आपण आकाशपातळ एक करून त्याची मागणी पूर्ण करतो. Beg, buy, borrowor steal, पण मनाचे मनोरथ पूर्ण झालेच पाहिजेत अशी आपली धारणा असते.
"मनाला पाहिजे ते दिले की मनाचे समाधान होते" ही गोष्ट अगदी खरी आहे पण मुळात अडचण अशी आहे की मनाला काय पाहिजे तेच मनाला माहित नाही. लहान मुलाचं कसं असतं त्याला एक खेळणं दिलं की थोडा वेळ गप्प बसतं,नंतर ते खेळणं नको दुसरं पाहिजे, तशी या मनाची अवस्था आहे. मनाला काय पाहिजे तेच मनाला माहित नाही,त्या अभावी काही तरी मिळवीत रहावयाचे मिळाले की फेकून द्यावयाचे व परत दुसरे काही मिळवायचे ते मिळाले की तेही पुन्हां फेकून द्यावयाचे अशा चक्रात सापडून त्याची केविलवाणी अवस्था होते.
मनाला काय पाहिजे या प्रश्नाचे उत्तर फार सोपे आहे, मनाला पाहिजे स्थिरता. प्रचंड शक्तीच्या या मनाच्या घरी दुष्काळ आहे तो फक्त या स्थैर्याचा. परंतू मनाची हाव व धांव कधीच संपत नाही व त्याला पाहिजे असलेलं स्थैर्य तेही मिळत नाही.
आज मन आवरण्याचा प्रयत्नात होत असं, मोठया घड्याळ्याला असलेला लंबक ज्याप्रमाणे एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडेव परत दुसऱ्या टोकाकडून पहिल्या टोकाकडे सारखा फिरत असतो, तसा आपल्या मनाचा लंबक भूतकाळकडून भविष्यकाळकडे व परत भविष्यकाळातून भूतकाळकडे असा सारखा भ्रमण करीत असतो. वर्तमानकाळात तो क्षणभरही स्थिर राहू शकत नाही. ज्याक्षणी मनाला स्थैर्य प्राप्तहोईल त्याचक्षणी मन वर्तमान काळात स्थिर राहू शकेल.
मन वर्तमान काळात स्थिर करावयाचे कसे ते मार्गदर्शन करणारे मार्गदर्शक भेटावे लागतात. अशामार्गदर्शकालाच श्रीसद्गुरु म्हणतात. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात
'सद्गुरुवाचोनी सापडेना सोय
धरावेते पाय आधी आधी.
- प्रल्हाद वामनराव पै
आजीव विश्वस्त जीवनविद्या मिशन