देहभान नसणारे भालचंद्र महाराज लोकांसाठी योगीपुरुष कसे झाले; थोडक्यात जाणून घेऊ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 11:16 IST2025-01-20T11:15:53+5:302025-01-20T11:16:11+5:30

आज भालचंद्र महाराज यांची जयंती; लोकांनी ज्यांची चेष्टा केली, तेच त्यांच्यासाठी आदरणीय कसे झाले, ते पाहू!

How did Bhalchandra Maharaj, who was not conscious of his body, become a Yogi for the people; Let's find out in brief! | देहभान नसणारे भालचंद्र महाराज लोकांसाठी योगीपुरुष कसे झाले; थोडक्यात जाणून घेऊ!

देहभान नसणारे भालचंद्र महाराज लोकांसाठी योगीपुरुष कसे झाले; थोडक्यात जाणून घेऊ!

परमहंस भालचंद्र महाराज ही एक देवत्व प्राप्त केलेली महान शक्ती आहे. आयुष्यभर तपसाधनेत मग्न असणारे आणि भक्तांची दुःखे निवारण करणारे भालचंद्र बाबा अखंड मौनधारी व दिगंबर अवस्थेत होते. बाबांच्या अखंड भक्तीने आणि समाधीस्थानाच्या दर्शनाने असंख्य भक्तांना बाबांच्या कृपेची प्रचिती येत आहे. बाबांच्या भक्तांमध्ये सर्व जाती, धर्म व पंथाचे भक्त आहेत. त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून बाबांचे भक्त आपणास कृपाछत्र लाभावे याकरिता परमहंस भालचंद्र बाबांच्या तपश्चर्यास्थान व समधीस्थानाच्या दर्शनाकरिता आश्रमात नेहमीच येत असतात, अशी माहिती भालचंद्र महाराज संस्थानच्या संकेतस्थळावर मिळते. 

वेंगुर्ले तालुक्यातील म्हापण या गावी श्री. परशुराम ठाकूर आणि सौ. आनंदीबाई या मात्यापित्यांच्या पोटी ८ जानेवारी १९०४ या वर्षी प.पू. भालचंद्र महाराजांचा जन्म झाला. बाबांचे काही जीवन मुंबईत गेले. लहानपणीच मातापित्यांचे देहावसान, मॅट्रीकच्या परिक्षेत आलेले अपयश, यामुळे निराशा आलेल्या बाबांच्या जीवनात अचानक वैराग्य प्राप्त झाले. त्या स्थितीत भालचंद्रबाबा एक दिवस गारगोटी, कोल्हापूर येथे गेले. तेथे गारगोटीचे एक साक्षात्कारी योगीपुरुष मुळे महाराजांच्या सान्निध्यात आले. मुळे महाराजांनी बाबांना सावंतवाडी तालुक्यातील दाणोली येथे जाऊन तेथील संत प.पू. साटम महाराज यांची सेवा करण्यास सांगितले. त्यानुसार बाबा दाणोलीत आले. तेथे प.पू. साटम महाराजांची सेवा केली. काही कालावधीनंतर बाबा १९२६ या वर्षी कणकवलीत आले.

प्रारंभी जुन्या मोटारस्टँडवर किंवा श्री काशीविश्‍वेश्‍वर मंदिरापाशी ते एकटेच बसलेले दिसत. कधी एखाद्या झाडाच्या बेचक्यात ते बसलेले असत. कोणाशी बोलत नसत, हसत बसत, काही दिले, तर घेत नसत. त्यांना काही खायला दिले तर दोन दोन दिवस, तसेच पडून रहात असे.

पुढे ते सहसा श्री काशीविश्‍वेश्‍वर मंदिरानजिकच्या प.पू. कामत महाराजांच्या समाधीच्या घुमटीत बसत असत. देहभान नसल्याने मलमूत्रविसर्जनही तेथेच करत असत. हाकलले तरी जात नसत. अखेर त्यांना समाधीमंदिराशेजारी एक घुमटी तयार करून त्यात बसवले. तेथेही तोच प्रकार चालू झाला. जाणारे, येणारे देवदर्शनास आलेले त्यांची घृणा करत; पण महाराजांनी हे निमूटपणे सहन केले. महाराजांचा कशालाच विरोध नसे, असे विलक्षण वैराग्य. ते सत्पुरुष आहेत याची जरासुद्धा कल्पना त्याकाळी लोकांना नव्हती. महाराजांच्या या अवस्थेमध्ये कोणा एका खोडसाळ माणसाने त्यांना उचलून शेणाच्या गायरीत टाकले. तेथेही ते दोन दिवस तसेच होते. बाबांची कोणी चेष्टामस्करी करत, कोणी उपहास करत; परंतु बाबांना त्याचे काहीही नसे. कोण विड्या, तर कोण सिगारेट देत असत. बाबा ते फुंकून टाकीत. त्यांचा धूर गिळत नसत, तर धुराचे लोटच्या लोट हवेत पसरवीत असत.

बाबांच्या देहाचे अशा प्रकारचे हाल दाणोली येथील प.पू. साटम महाराजांच्या कानी पडले. तेव्हा ते स्वत: दोन वेळा कणकवली येथे आले आणि प.पू. भालचंद्र महाराजांना भेटले. प.पू. साटम महाराजांनी प.पू. भालचंद्र महाराजांची महती, आध्यात्मिक सामर्थ्य याची प्रचीती समाजास दाखवून दिली. दोन महान योग्यांची भेट झाली आणि लोक भानावर आले. हळूहळू प.पू. भालचंद्र महाराजांना लोक नमस्कार करू लागले; पण खरी जनजागृती केली ती गारगोटी येथील श्री मुळे महाराजांनी. ते चहाचे व्यापारी होते. त्यामुळे सर्वत्र त्यांचे फिरणे असायचे. कणकवली येथे आल्यावर प.पू. भालचंद्र महाराजांना त्यानी ओळखले. त्यांनी महाराजांची महती सर्वांना सांगितली. त्यानंतर लोकांनी बाबांची पूजा करण्यास प्रारंभ केला.

प.पू. भालचंद्र महाराजांचे मूळ गाव कुडाळ तालुक्यातील म्हापण हे होय. तेथे ते शाळेत गेल्याचीही नोंद आहे. धर्मराज महाराज, फलाहारी महाराज, प.पू. राज अहमद हुसेनशहा पटेलबाबा हे प.पू. भालचंद्र महाराजांचे शिष्य होते. बाबांच्या आठवणींचा हा जीवनपट भावपूर्णरित्या न्याहाळत असतांना जाणवते की, कणकवलीमध्ये या सत्पुरूषाचे आगमन झाले आणि त्या दिवसापासून कणकवली गावचे सर्व रूपच पालटले.

बाबांना काहीजण वेडे समजत होते. एखादा ज्ञानी माणूस बाबांना ओळखून त्यांची पूजा करायचा. कोणी नमस्कार केला, तर त्याला चमत्कार बाबांनी दाखवला. अशा प्रकारे बाबांची किर्ती सर्वदूर पसरू लागली. जो जे मागेल ते बाबा त्यांना देत गेले. आज भक्तांना विचारले, तर विशेषत: कणकवलीवासियांना विचारले, तर ते सांगतील, आमच्या समस्या, दु:ख, त्रास आम्ही बाबांजवळ मांडले आणि आम्ही चिंतेतून मुक्त झालो. त्यांच्या केवळ दर्शनानेच अनेकांना सुखशांती लाभल्याची उदाहरणे आहेत.

मुंबई-लालबाग येथे श्री हनुमान मंदिरात १६ डिसेंबर १९७७ या दिवशी अखंड हरिनामचा जयघोष चालू होता. रात्री १०.२५ वाजता भक्तांना दर्शन देत असतांनाच ते अनंतात विलीन झाले. बाबांचे पार्थिव कणकवली येथे आणले गेले. मार्गशीर्ष शुद्ध सप्तमीला (१८ डिसेंबर १९७७) सध्याच्या आश्रमातील मध्य गाभार्‍यात वेदमंत्रघोषात समाधी देण्यात आली.

कणकवली येथील आश्रमात प.पू. भालचंद्र महाराज संस्थान समिती कार्यरत असून ती नोंदणीकृत आहे. या संस्थान समितीने जोडोनिया धन, उत्तम व्यवहारे । या उक्तीप्रमाणे बाबांच्या भाविक भक्तांनी दिलेल्या देणग्यांचा योग्य विनियोग करून धार्मिक, शैक्षणिक आणि सामाजिक कार्य हाती घेतले आहे.

 

Web Title: How did Bhalchandra Maharaj, who was not conscious of his body, become a Yogi for the people; Let's find out in brief!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.