प्राणप्रतिष्ठेनंतर रामललाची मूर्ती सजीव कशी दिसू लागली? प्रेमानंद महाराजांनी उलगडले रहस्य
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 02:29 PM2024-01-30T14:29:30+5:302024-01-30T14:32:00+5:30
Ayodhya Ram Mandir News: रामललाची आधीची मूर्ती आणि प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतरचे लोभस स्वरुप याबाबत अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
Ayodhya Ram Mandir News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिरात रामललाची प्रतिष्ठापना करण्यात आली. यानंतर रामदर्शनासाठी भक्तांचा महासागर लोटला. दररोज सुमारे अडीच ते तीन लाख भाविक रामललाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येत जात आहेत. राम मंदिर परिसरात आणखी काही मंदिरे आणि अन्य सुविधा उभारण्यात येत आहेत. मात्र, प्राणप्रतिष्ठेनंतर रामललाची मूर्ती सजीव कशी दिसू लागली, असा प्रश्न अनेकांच्या उपस्थित होत आहे. हे रहस्य प्रेमानंद महाराज यांनी उलगडले.
अध्यात्मिक गुरू आणि कथाकार असलेले प्रेमानंद महाराज यांचे देशासह जगभरात लाखो भक्त आहेत. प्रेमानंद महाराज वृंदावनात राहतात. त्यांचे प्रवचन ऐकण्यासाठी लांबून लोक येतात. शास्त्रात आणि पुराणात असलेले ज्ञान महाराज सोप्या शब्दात सांगतात. महाराजांचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियावर प्रेमानंद महाराजांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एका भक्ताने महाराजांना रामलला प्राणप्रतिष्ठेबाबत प्रश्न विचारला आहे आणि महाराजांनी उत्तर दिले.
प्राणप्रतिष्ठेमध्ये स्थापित केलेली मूर्ती दिव्य आणि जिवंत झाली
व्हिडिओमध्ये एका भक्ताने विचारले की, प्राणप्रतिष्ठेमध्ये स्थापित केलेली मूर्ती दिव्य आणि जिवंत झाली, या जिवंतपणाचे कारण काय? प्रेमानंद महाराजांनी यावर काय उत्तर दिले की, जिवंतपणामागे महापुरुषांचे मंत्र आणि भक्तांच्या भावना आहेत. दोघांमध्येही खूप ताकद आहे. केवळ एक-दोन भक्तांच्याच नाही तर असंख्य भाविकांच्या भावना श्रीरामांच्या मूर्तीशी जोडल्या गेल्या आहेत. दशरथनंदन आधीच तिथे होते पण मंत्रोच्चार, अभिषेक केल्यावर रामललाच्या मूर्तीत तेज आले, यात नवल नाही.
प्राणप्रतिष्ठेच्या आधी आणि नंतरच्या दर्शनात खूप फरक
यावेळी एक उदाहरण देताना प्रेमानंद महाराज म्हणाले की, त्यांनी मंत्राचा जप केला नाही, परंतु लाखो भक्तांच्या भावनेने स्मरण केले तेव्हा नरसिंहजी स्तंभावर प्रकट झाले. मंत्रांनी चमत्कार घडले आहेत, प्राणप्रतिष्ठेच्या आधी आणि नंतरच्या दर्शनात खूप फरक आहे. देवाचा प्रत्यक्ष वास्तव्य मूर्तीत आहे आणि असे अनुभव नेहमीच येत राहतील, असेही ते म्हणाले.
दरम्यान, प्रेमानंद महाराज उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. सध्या वृंदावन येथे राहत आहेत. अगदी लहान वयातच संन्यास घेतला. महाराज अनेकांना मार्गदर्शन करतात. महाराजांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात जे लोकांच्या पसंतीस पडतात.