पायवाटेवरून किती दिवस चालाल? स्वत:चा मार्ग स्वत: शोधायला शिका; वाचा ही गोष्ट!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2021 08:00 AM2021-12-28T08:00:00+5:302021-12-28T08:00:07+5:30
लोक अनुसरत असलेली पायवाट नेहमीच योग्य असते असे नाही. म्हणून आपण आपली वाट चोखंदळपणे निवडणे हे सर्वाथाने इष्ट!
काहीतरी अचाट करून दाखवण्याची क्षमता असणारे लोक दुसऱ्यांच्या विचारावर विचार करतात, पण शेवटी स्वत:चे मार्ग स्वत: धुंडाळतात. याउलट, बाकीचे लोक सरधोपट मार्गावरून प्रवास करतात आणि चालत राहतात. हा प्रवास अधिकाधिक रोमहर्षक करायचा असेल, तर तुम्हीदेखील स्वत:चा मार्ग तयार करा. काय सांगावे, हीच उद्या इतरांसाठी पायवाट होऊ शकेल...
एकदा एका गावात एका शेतकऱ्याकडे अनेक गुरे ढोरे होती. त्यात एक गाढवही होते. इतर प्राण्यांच्या तुलनेत गाढवाला सर्वात जास्त काम करावे लागे. गाढव खूप वैतागले होते. त्याला तिथून पळ काढायचा होता. परंतु, गावाबाहेर कधी न गेल्यामुळे त्याचा धीर होईना. ही अवस्था गाढवांचीच नाही, तर गावकऱ्यांचीही होती. गावाच्या बाहेर घनगर्द झाडी असल्यामुळे गावाबाहेर पडण्याची वाट कोणालाही माहित नव्हती.
एक दिवस गाढवाने धीटाई करून गावाबाहेर पळ काढला आणि तो यशस्वी झाला. गाढव पळून गेले म्हणून शेतकऱ्याने खूप शोधाशोध केली. गाढवाने गावाबाहेर पडण्याचा रस्ता शोधून काढला म्हणून त्याची खूप चर्चा झाली. गाढवाचा मागोवा घेत गावातली कुत्री गावाबाहेर पडली. त्यामागे आणखीही प्राणी गावाबाहेर गेले. प्राण्यांमुळे गावाबाहेर पडण्याची पायवाट तयार झाली. गावकऱ्यांना आनंद झाला. त्यांनी त्या मार्गाने एक रस्ता बनवून घ्यायचा ठरवला.
गावातल्या कुशल कारागीराला ते काम सोपवले. त्याने रस्त्याची पाहणी केली तेव्हा त्याला आढळले, की या रस्त्यापेक्षा आणखी एक रस्ता कमी वेळात गावाबाहेर पडण्याचा मार्ग दर्शवतो आहे. तो रस्ता गावकऱ्यांच्या नजरेस आणून दिल्यावर गावकऱ्यांना आनंद झाला आणि त्या नव्या वाटेने गावाची वाहतूक सुरू झाली आणि दळणवळणाची वाट मोकळी झाली.
गोष्टीचे तात्पर्य हेच, की गाढवाने त्याच्या बुद्धीने शोधलेला मार्ग चांगला होताच. पण त्याही पेक्षा चांगला मार्ग न शोधता त्याच्या मार्गावर चालणारे गाढव की रस्ता शोधणारा गाढव हे आपण विचारात घ्यायला हवे. म्हणून लोक अनुसरत असलेली पायवाट नेहमीच योग्य असते असे नाही. म्हणून आपण आपली वाट चोखंदळपणे निवडणे हे सर्वाथाने इष्ट!