राम मंदिरातील पुजाऱ्यांची कमाई किती? आधी १०० रुपये होती मिळकत; आताचे आकडे वाचून व्हाल अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 16:49 IST2025-01-11T16:45:48+5:302025-01-11T16:49:23+5:30
Ram Mandir Ayodhya Dham: राम मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांना आजीवन वेतन देणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राम मंदिरातील पुजाऱ्यांची कमाई किती? आधी १०० रुपये होती मिळकत; आताचे आकडे वाचून व्हाल अवाक्
Ram Mandir Ayodhya Dham: २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत भव्य राम मंदिर सर्वांसाठी खुले झाले आणि केवळ देशात नाही, तर जगात जल्लौष झाला. राजस, सुकुमार अशा रामललाचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविकांनी एकच गर्दी केली. राम मंदिरात रामललाचे दर्शन घेण्यासाठी उसळलेल्या जनसागराला एक वर्ष झाले तरी ओहोटी लागलेली नाही. अगदी पहिल्या दिवसांपासून सुमारे सरासरी एक लाख भाविक रामाचे दर्शन घेत असल्याचे सांगितले जात आहे. सन २०२५ मध्ये शनिवार, ११ जानेवारी रोजी तिथीनुसार राम मंदिरात रामललाची प्रतिष्ठापना झाल्या गोष्टीला एक वर्ष पूर्ण होत आहे. यानिमित्ताने अनेक धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जात आहे. राम मंदिराचे संपूर्ण काम अद्याप झालेले नाही. या वर्षांत राम मंदिर आणि परिसरातील संपूर्ण काम पूर्ण होऊ शकेल, असा दावा श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या वतीने करण्यात आला आहे.
राम नामाचा महिमा अगाध आहे. राम दर्शनाची ओढ भाविकांना लागलेली आहे. केवळ भारत नाही, तर जगभरातून भाविक रामाच्या दर्शनासाठी अयोध्येत येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या ८ महिन्यात तब्बल अडीच कोटी भाविकांनी रामललाचे दर्शन घेतले. तर २०२५च्या पहिल्या दिवशी अयोध्येत सुमारे १० लाख भाविक दाखल झाले होते. पैकी सव्वा दोन लाख भाविकांनी रामाचे दर्शन घेतले, अशी माहिती दिली जात आहे. यातच राम मंदिरातील पुजारी यांना वेतन दिले जाते. या वेतनाचे आकडे अवाक् करणारे आहेत, असे सांगितले जात आहे.
राम मंदिरातील पुजाऱ्यांची कमाई किती? आधी १०० रुपये होती मिळकत
सन १९९२ मध्ये वादग्रस्त ढाचा पडल्यानंतर तत्कालीन रिसीव्हरने मुख्य पुजाऱ्याचा पगार दरमहा १०० रुपये निश्चित केला होता. त्यावेळी रामलला एका ताडपत्रीने झाकलेल्या अगदी छोट्या स्थानी विराजमान करण्यात आले होते, असे सांगितले जाते. जेव्हा ही व्यवस्था ट्रस्टच्या हाती आली, तेव्हा २०२० मध्ये सर्वांत मोठी वाढ झाली. मुख्य पुजाऱ्याचा पगार प्रथम १५ हजार रुपये आणि नंतर २५ हजार रुपये करण्यात आला. तसेच सहाय्यक पुजारी आणि सेवकांचे पगार वाढवण्यात आले. वेतनवाढीच्या याच क्रमाने, मुख्य पुजाऱ्याचा पगार ३५ हजार रुपये आणि सहाय्यक पुजाऱ्यांचा पगार ३३ हजार रुपये होता. यामध्ये गेल्या वर्षी १० टक्क्यांची वाढ करण्यात आली. आता मुख्य पुजाऱ्यांना ३८,५०० रुपये वेतन मिळत आहे. तर सहाय्यक पुजाऱ्यांना ३६,३०० रुपये वेतन मिळ आहे. त्याच क्रमाने, रामललाचे कोठारी, भांडारी आणि कर्मचाऱ्यांचे पगारही वाढवण्यात आले.
मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांना आजीवन मिळणार पगार
राम मंदिर अयोध्या येथील मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास हे सुमारे ३४ वर्षांपासून रामलल्लाची सेवा करत आहेत. ८० वर्षांहून अधिक वयाचे आचार्य सत्येंद्र दास १ मार्च १९९२ पासून राम मंदिराचे मुख्य पुजारी म्हणून काम करत आहेत. तेव्हा त्यांना देण्यात येणारे वेतन अत्यल्प होते. ३४ वर्षांनंतर त्यांचे वेतन हजारो रुपये झाले आहे. राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांचे वेतन सुरुवातीला फक्त १०० रुपये प्रति महिना होते. पण आता त्यांचा पगार दरमहा ३८,५०० रुपये झाला आहे. एवढेच नाही तर, राम मंदिर ट्रस्टने त्यांना आजीवन पगार देण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, राम मंदिरात पुरोहित नेमण्याची प्रक्रिया अतिशय कठोर आणि शिस्तबद्ध पद्धतीने राबवण्यात आली. राम मंदिरात पुजारी किंवा पुरोहित म्हणून सेवा रुजू करायची असेल, तर त्यासाठी हजारो मुलाखती घेण्यात आल्या. शास्त्र, धर्माबाबत अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. अतिशय कठीण अशा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांना काही महिने योग्य प्रशिक्षण देण्यात आले आणि त्यानंतरच त्यांची नियुक्ती करण्यात आली.