नवस करणे कितपत बरोबर आहे? याबाबतीत धर्मशास्त्र काय सांगते ते जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 02:18 PM2021-08-27T14:18:46+5:302021-08-27T14:20:11+5:30

देवाविषयी प्रेम असणारा भक्त कधीच नवस करत नाही.

How right is it to make a vow? Find out what the Scriptures say in this regard! | नवस करणे कितपत बरोबर आहे? याबाबतीत धर्मशास्त्र काय सांगते ते जाणून घ्या!

नवस करणे कितपत बरोबर आहे? याबाबतीत धर्मशास्त्र काय सांगते ते जाणून घ्या!

googlenewsNext

अलीकडच्या काळातील नवस करण्याची प्रथा इतकी घातक आणि विकृत झाली आहे, की त्यातून फक्त श्रद्धानाश हेच फळ मिळू शकेल. अशा वेळी प्रश्न उद्भवतो, की नवस करणे खरोखरच योग्य आहे का? तो फळतो का? यामागे शास्त्रविचार काय आहे, ते 'शास्त्र काय सांगते' या पुस्तकाच्या आधारे समजून घेऊ.

साधना, उपासना व धर्माचरण या दोन गोष्टी शुद्ध भक्तीने व प्रांजळ मनाने केल्यास त्याचे अलौकिक फळ मिळते. पण जेव्हा वास्तव श्रद्धेचा अभाव, धर्मशास्त्राविषयी अज्ञान व अंधपरंपरेचे भूत मानेवर असते तेव्हा त्यातून 'नवसा'सारख्या गोष्टीचा उगम होतो.
 
ज्यावेळी ईश्वराचे मानवीकरण होते तेव्हा त्याच्या नवविधा भक्तीबरोबर अन्यही मानवी विकार दृढ होतात. भक्तासाठी देव मानवाप्रमाणे रूप धारण करून त्याच्याकडून नवविधा भक्ती करून घेतो. पण मानवाला वाटते की, आता देव आनायासे मानवाप्रमाणे वागतोच आहे तेव्हा त्याला थोडेबहुत अमिष देऊन आपले काम करून घेण्यास काय हरकत आहे?

वास्तविक या विश्वात ईश्वराचे साम्राज्य आहे. जेव्हा एखाद्या उद्दिष्टाप्रती चिकाटीने झटणे, त्यासाठी अंगी सामर्थ्य प्राप्त व्हावे म्हणून व अपयश आल्यास त्याची व्यथा सौम्य व्हावी म्हणून ईश्वराची करुणा भाकणे एवढेच मानवाच्या हातात आहे. ते उद्दिष्ट सफल झालेच पाहिजे असा हट्ट मानवाला धरता येणार नाही. कारण त्यासाठी मानवाची कर्मगती कारणीभूत असते. त्यामुळे एखादे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून देवाला नवस बोलणे योग्य नाही.

 

जो त्रिभुवनाचा स्वामी आहे, त्याला मूठभर पेढे, चांदीचा किरीट इ. पदार्थांची आवश्यकता काय? पण भक्ताने प्रेमाने दिलेले शिळे फुलही तो स्वीकारतो. कारण तो प्रेममय असल्याने त्याला प्रेमाची भूक असते. 

नवस करताना बहुतेक वेळा प्रेमाचा अभाव असतो. देवाविषयी प्रेम असणारा भक्त कधीच नवस करत नाही. पण प्रीतीपोटी भक्ती करता भीतीपोटी भक्ती करणारे भक्त एखाद्या उद्दीष्टासाठी एकाच वेळी एकाच नव्हे तर दहा देवांना नवस करतात. चुकून कार्य झालेच तर ते नवस फेडले जातील असेही नाही. कारण काम झाल्यावर नवसाची आठवण राहत नाही. अर्थात आठवण राहिली काय किंवा न राहिली काय, देवाला क्षुद्र वस्तूंची काहीच जरूरी नसते. पण त्याचा भक्तिभाव वाढवण्यासाठी देव झटत असतो.

याचा अर्थ नवसशास्त्र पूर्ण खोटे किंवा निराधार आहे असेही नाही. पण नवस करताना मर्यादांची जाणीव ठेवावी लागते. नवस करताना एकाच दैवताला केला व त्या दैवताविषयी पुरेपूर भक्तिभाव मनात असला तर त्या नवसाला काही अर्थ असतो. 

जी कार्ये सहजगत्या होऊ शकतील, ज्यांच्यासाठी निसर्गाचे नियम बदलावे लागणार नाहीत अशा कार्यासाठी नवस केल्यास व तोही अगदी मनापासून केल्यास ती कामना कळत नकळत अंतर्मनात शिरते व ती वैश्विक मनात प्रविष्ट होते. 

जसे की वर्षारंभी एखाद्या विद्यार्थ्याने विशेष प्राविण्यात उत्तीर्ण होण्याचा नवस केल्यास तो नवस त्याला भरपूर अभ्यासाला प्रवृत्त करेल. मनोबल देईल, उत्साह वाढवेल. त्यामुळे नवस आपोआप पूर्ण होईल. पण उनाड मुलाच्या आईने माझा मुलगा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊ दे असा नवस केला तर खुद्द ब्रह्मदेवही काही करू शकणार नाही. 

यास्तव मानवी सामर्थ्याच्या मर्यादा, तारतम्य, सभोवतालचे वातावरण लक्षात घेऊन मन:पूर्वक भक्तीने एखादा नवस केल्यास तो सफल होऊ शकेल. 

Web Title: How right is it to make a vow? Find out what the Scriptures say in this regard!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.