एखादे देवस्थान जागृत आहे की नाही हे कसे ओळखावे? या संकल्पनेबद्दल विस्तृत माहिती समजून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 10:32 AM2022-05-18T10:32:40+5:302022-05-18T10:33:48+5:30
अमुक एका देवस्थानी गेल्यावर एखाद्याला त्या स्थानाची प्रचिती येते, तर एखाद्याला येत नाही, असे का? जाणून घ्या!
एखादे देवस्थान किंवा एखादे दैवत जागृत आहे, असे आपण म्हणतो किंवा आपल्याला अनुभूती आल्यावर इतरांना सांगतो. परंतु, जागृत दैवत ही संकल्पना गोंधळात टाकणारी आहे. कारण, मंदिरात मूर्ती स्थापन करताना प्राणप्रतिष्ठा केली जाते, म्हणजेच निर्जीव मूर्तीत दैवताला आवाहन केले जाते. त्याअर्थी दैवत हे जागृतच असते. अन्यथा ती केवळ शोभेची मूर्ती ठरेल. मात्र, मंदिराच्या गाभाऱ्यातील मूर्तीकडे आपण परमेश्वर म्हणून पाहतो, कारण ती जागृत आहे म्हणूनच!
एका देवतेची अनेक मंदिरे असतात. परंतु, आपणच त्यात गटवारी करून जागृत आणि सुप्त असा भेदभाव करून मोकळे होतो. वास्तविक सर्व देवालये ही जागृतच असतात. मात्र, तिथे जाताना आपला भाव कसा आहे, त्यानुसार आपल्याला अनुभूती येते. म्हणजेच देवाबरोबर आपण त्याक्षणी जागृत असतो आणि त्या दोन्ही जागृतावस्थेची ताकद एकत्र होऊन कार्यसिद्धी होते. यासाठी देवापेक्षा आपण जागृतावस्थेत देवाची भेट घेणे महत्त्वाचे आहे.
लोकांच्या सांगण्यानुसार अमुक एक मंदिरात, मठात जागृत देवता आहे, असे कळल्यावर लोकांची रिघच्या रिघ तिथे लागते. मात्र, सर्वांनाच अपेक्षित फलप्राप्ती होतेच असे नाही. एवढेच काय, तर अनेकदा आपल्याकडे बाहेरगावावरून पाहुणे येतात आणि आपल्या जवळच्या नामांकित देवस्थानाला भेट देऊन जातात. कालांतराने त्यांचा नवस फळतो, परंतु तिथल्याच परिसरात राहूनही असे अनुभव आपल्या वाट्याला फार कमी येतात. याचे कारण हेच, की दर्शनाला येणारी व्यक्ती आपली श्रद्धा, भक्तीभाव, सकारात्मकता एकवटून भगवंताच्या दर्शनाला येते. त्यामुळे साहजिकच इच्छाशक्तीला पुष्टी मिळते आणि कार्यात सिद्धी मिळते. मात्र, आपण त्याच परिसरात राहूनही, वारंवार दर्शन घेऊनही आपल्याला देव पावत नाही, असा आपण तगादा लावतो. याचा अर्थ, देव भेदभाव करतो, असे नाही, तर प्रबळ इच्छाशक्ती असलेल्या व्यक्तीमध्ये जागृकता आपोआप उतरते आणि त्या इच्छेला ईश्वरी पाठबळ मिळते व कार्यसिद्धी होते.
अशा अनुभवातून लोक एकमेकांना आपले अनुभव सांगतात आणि दैवतांना, देवस्थानांना जागृत आणि सुप्त असे परस्पर घोषित करून मोकळे होतात. काही समाजवंâटक स्वत:च्या स्वार्थासाठी देवस्थानांची जाहिरात करतात आणि छोट्याशा मंदिराचा कायापालट करून जागृत नावावर तिथे मोठे मंदिर बांधतात. हा भाविकांच्या भावनांशी खेळ होतो. लोकही आचार विचार न करता सगळे जातील तिथे रांगा लावून उभे राहतात.
एकाला आलेला अनुभव दुसऱ्याला येईलच असे नाही. यात दैवताचा दोष नसून, भाविकाच्या श्रद्धेनुसार त्याला चांगले वाईट अनुभव येत असतात. भगवंत केवळ एका ठिकाणी नाही, तर चराचरात सामावलेला आहे. गीतकार सुधीर मोघे वर्णन करतात,
मंदिरात अंतरात तोच नांदताहे
नाना देही नाना रुपी तुझा देव आहे
भगवंत कधीच कोणाचे वाईट करत नाही. चांगल्या माणसांवर त्याचा कधीही कोप होत नाही. तो आपल्याला नेहमी सद्बुद्धी देतो. त्याचा वापर करून आपण, योग्य-अयोग्य हा भेद निश्चितच ओळखायला हवा. एखाद्या देवस्थानाप्रमाणे आपल्या देवघरातला गणपतीदेखील जागृतच असतो. गरज असते, ती आपण आपली झोप अर्थात सुप्तअवस्था बाजूला सारण्याची. शास्त्राच्या नावावर कोणी खोटी माहिती पसरवत असेल, तर त्यांना रोखणे हे आपले कर्तव्य आहे. हेच तुकाराम महाराज देखील आपल्या पदात सांगतात,
धर्माचे पालन करणे, पाखंड खंडण,
हेचि आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम,
तीक्ष्ण उत्तरे, घेवूनि हाती बाण फिरे,
नाहि भीड भार, तुका म्हणे सांगा थोर।।