आपल्यावर गुरुकृपा आहे किंवा होणार आहे हे कसे ओळखायचे? जाणून घ्या पूर्वसंकेत!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 01:39 PM2024-11-25T13:39:42+5:302024-11-25T13:40:57+5:30
गुरुकृपा पाठीशी असेल तर असाध्य गोष्टीही सहज साध्य करता येतात, पण ती ओळखायची कशी ते जाणून घेऊया.
>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक
काल माझ्या एका विद्यार्थिनीने मला प्रश्न विचारला “ गुरुकृपा होण्यासाठी काय करावे ? “ अनेक जण गुरुकृपा कधी होणार किंवा गुरुकृपा झाली आहे हे कसे ओळखायचे ? असेही प्रश्न विचारतात . माझ्या बौद्धिक कुवतीनुसार ह्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा लहानसा प्रयत्न.
आपली आई आणि घरातील इतर मोठी मंडळी लहानपणा पासून आपल्यावर संस्कार करत असतात आणि उत्तम माणूस म्हणून आपल्याला घडवण्याचा प्रयत्न करतात. बाहेरून आले की हातपाय धुतल्याशिवाय घरात वावरायचे नाही. सकाळ संध्याकाळ देवाची प्रार्थना , परवचा म्हणणे , घरातील मंडळीना उलट उत्तर न देणे , बाहेरून आल्यावर चपला नीट ठेवणे अशा अनेक गोष्टी आपण शिकत असतो आणि त्यातून घडत असतो. हे संस्कार होत जातात आणि पुढेही ते कायम स्वरुपीच राहतात . अगदी त्याचप्रमाणे आपली रोजची नित्यकर्मे करत असताना आपण जी काही देवाची पूजा अर्चना करतो, भक्ती करतो, श्रद्धेने देवासमोर नतमस्तक होतो ह्या सगळ्याचा परिणाम आपल्या देहबोलीवर, वाचेवर आणि एकंदरीत आयुष्यावर, विचारांवर होत जातो आणि त्यातून आपण व्यक्ती म्हणून घडतो.
आपण केलेली उपासना आपल्याला चांगल्या वाईटाची परीक्षा करायला शिकवते. काय घ्यायचे काय सोडायचे त्याचे ज्ञान येते. ह्या सर्व उपासनेतून मग उत्तम नीटनेटका संसार करणे, मुलांचे उत्तम शिक्षण, ज्या ज्या वेळी ज्या गोष्टी हव्यात त्या साध्य होणे जसे धन संपत्ती , योग्य वेळेत विवाह , मनासारखी नोकरी ह्या गोष्टींची, चांगल्या लोकांची संगत मिळणे , योग्य संधी मिळून त्याचे चीज करता येणे म्हणजेच आयुष्य मार्गस्थ असणे. माझ्या मते हीच गुरुकृपा आहे. गुरुकृपा ही एखादी वस्तू नाही की ती मिळाली. आपल्या सोबत आपले गुरु निरंतर असल्याची ती एक जाणीव आहे .
आपल्या मनात सद्गुरूंची पूजा , नामस्मरण करावे हा विचार येणे, दुसऱ्यांना मदत करायची बुद्धी होणे , आपल्या कुटुंबाप्रती आपली असलेली कर्तव्ये पार पाडणे आणि त्याची जाणीव सतत मनात असणे , पैशाचा योग्य विनियोग करणे ही गुरुकृपा नाही तर अजून काय आहे. गुरुकृपा हा अनुभव आहे , ती एक सरल भावना आहे जी आपल्या मनावर सतत फुंकर घालणारी आहे , कुणीतरी आपल्या सतत सोबत आहे, आपली काळजी घेत आहे आणि त्यामुळे मला कधीही एकटेपणाची भावना निर्माण होत नाही हि भावना म्हणजेच गुरुकृपा आहे.
सगळ्या गोष्टी व्यवस्थित होते आहेत ना , संकटे समस्या आल्या तरी त्यातून मार्ग मिळत आहे , अडचणी दूर होत आहे हि गुरुकृपाच आहे. आपली रोजची नित्यकर्मे करत असताना आपली साधना , उपासना , मानसपूजा सर्व काही सातत्याने चालू ठेवावे. आपण त्यांना क्षणभर सुद्धा विसरत नाही तसे तेही आपल्या भक्तांना विसरत नाहीत . ते आहेत आणि ते आहेतच ह्या भावनेवर शंका कुशंका कधीच घेवू नये . परमेश्वर माणसातच आहे त्यामुळे दोन तास देवदेव करायचे आणि लोकांना त्रास द्यायचा वाईट वागायचे अश्या लोकांचे आयुष्य बघा कारण त्यांचे कुणीच नसते न माणसे ना देव .
उपासनेत प्रचंड ताकद आहे , अशक्यही शक्य करण्याची ताकद ज्यांच्यात आहे त्यांचे नाव सतत मुखात असणार्यांना कसलीच भीती नाही , उलट दिवसेंदिवस आपली भक्ती श्रद्धा त्यांनी दिलेल्या प्रचीतीमुळे बळकट होते आहे. आपल्या सद्गुरूंच्या नावाचा आणि त्यांच्या कार्याचा प्रसार करणे आणि त्यातून भक्त निर्माण करणे हे एक उत्तम भक्ताचे काम आहे नव्हे ती त्याची जबाबदारी आहे. मी कधीही शेगाव हून प्रसाद आणला नाही मी नेहमी ५ ग्रंथ आणते आणि ते ५ जणांना देते जेणेकरून ते त्याचे वाचन करतील , त्यांना अध्यात्माची गोडी लागेल आणि आपल्या भक्तांच्या कळपात सामील होतील.
गुरुकृपा हा सुखद अनुभव आहे , जेव्हा आपल्याला समाधानाची शांत झोप लागते जेव्हा आपल्याला एकटेपणा वाटत नाही , भीती वाटत नाही तेव्हा समजावे आपल्यावर त्यांची कृपा झाली आहे आणि एकदा का त्यांचा वरदहस्त लाभला कि मग आपण आपले राहातच नाही . त्यांचे बोट धरले आहे मग आता ते नेतील तिथे आणि करतील ते ह्या विश्वासाने पुढील आयुष्यात मार्गक्रमण होते . गुरुकृपा म्हणजे थेट भेट ह्या मनाची त्या मनाशी , ह्या हृदयाची त्या हृदयाला ....
गुरुकृपा ही आंतरिक समाधानाची पोच पावती आहे असे म्हंटले तर वावगे ठरू नये.
संपर्क : 8104639230