वेद पुराणातील अध्यात्माबरोबर रोजच्या जगण्यातले अध्यात्म कसे समजून घ्यायचे? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2023 02:49 PM2023-05-01T14:49:37+5:302023-05-01T14:57:43+5:30

अध्यात्म हा शब्द केवळ धार्मिक विधींपुरता मर्यादित नाही तर त्यामागे असलेल्या व्यापक तरी साधा सरळ दृष्टिकोन जाणून घ्या!

How to understand spirituality in daily life with spirituality in Veda Purana? Find out! | वेद पुराणातील अध्यात्माबरोबर रोजच्या जगण्यातले अध्यात्म कसे समजून घ्यायचे? जाणून घ्या!

वेद पुराणातील अध्यात्माबरोबर रोजच्या जगण्यातले अध्यात्म कसे समजून घ्यायचे? जाणून घ्या!

googlenewsNext

>> शंतनू ठाकरे 

अध्यात्म ही कोणतीही धार्मिक गोष्ट नाही. ध्यात्म म्हणजे, वरिष्ठांच्या प्रती आदरभाव असणे. अध्यात्म म्हणजे, कनिष्ठांच्या प्रती करुणाभाव बाळगणे. अध्यात्म म्हणजे, आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये, असं वागणं.
      
अध्यात्म म्हणजे, वेद वाचण्याबरोबर वेदना वाचता येणे. अध्यात्म म्हणजे, आपलं काम प्रामाणिकपणे करणं. अध्यात्म म्हणजे, आपलं कौटुंबीक आणि सामाजिक कर्तव्य पार पाडणं. अध्यात्म म्हणजे, मुक्या प्राण्यांवर, पशु-पक्ष्यांवर प्रेम करणे. अध्यात्म म्हणजे, निरपेक्ष सत्कर्म करत रहाणे. अध्यात्म म्हणजे, नि:स्वार्थी सेवाभाव जोपासणे. अध्यात्म म्हणजे, सदैव कृतार्थ भाव अंगी बाळगणे. अध्यात्म म्हणजे, विना अपेक्षा कौतुक करणे. अध्यात्म म्हणजे, आपण प्रत्येकाशी सद्भाव आणि सद्भावाने रहाणे. अध्यात्म म्हणजे, ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीत सदैव असणे. अध्यात्म म्हणजे, आपण या समाजाचं काही देणं लागतो, आणि ते आपण दिलेच पाहिजे, अशी मानसिकता मनाशी सतत बाळगणे. अध्यात्म म्हणजे, गरजुवंतांना यथा शक्ती, आर्थिक किंवा शाब्दिक मदत करणे. अध्यात्म म्हणजे, आपल्याबरोबर इतरांची देखील प्रगती होवो, हा भाव अंगी असणे.  
    
अध्यात्म म्हणजे,
साधं .........
सोपं .........
सरळ ........
आणि
निर्मळ .......
असणं - दिसणं आणि वागणं.     

अध्यात्म म्हणजे, फक्त पूजा - पाठ, प्रार्थना आणि भक्ती नव्हे तर.. अध्यात्म म्हणजे, केलेली पूजा - पाठ, प्रार्थना आणि भक्ती, या प्रमाणेच आपली प्रत्येक कृती असणे. अध्यात्म म्हणजे, राष्ट्रपुरुष आणि  राष्ट्रीय संताचं सदैव स्मरण असणे. अध्यात्म म्हणजे सकाळ पासून रात्री झोपे पर्यंत नित्य कर्म, कर्तव्य पारदर्शक पद्धतीने पार पाडणे. 

थोडक्यात, सकारात्मक जगायला शिकवते ते अध्यात्म. अध्यात्म या शब्दाची फोड "अधि" म्हणजे शरीर व त्यात वास असणाऱ्याचे "अयन करणे" म्हणजे शिकणे, ते अध्यात्म. मनासारखे कोणालाच जगता येत नसते. परिस्थितीनुसार जगायला शिकवणारे शास्त्र, म्हणजे अध्यात्म. 

"अगदी थोडक्यात सांगावयाचे म्हणजे, हे अध्यात्म म्हणजे, जीवन जगण्याची कला... आत्म उन्नती करणारी, व्यक्तिमत्व विकास करणारी आणि भगवत चिंतन करणारी, याहीपेक्षा सर्व भगवंताला अर्पण कसं करावं, हे सहजतेने शिकवणारी कला !" 

॥ श्रीसद्गुरुचरणार्पणमस्तु ॥

Web Title: How to understand spirituality in daily life with spirituality in Veda Purana? Find out!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.