पंचांग कसे पाहावे? पंचांगातून कोणकोणती माहिती मिळते, जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2021 03:27 PM2021-06-01T15:27:52+5:302021-06-01T15:28:27+5:30
पंचांग वाचनामुळे तिथी, वार, नक्षत्र, मुहूर्त यांची दैनंदिन माहिती मिळत राहते, म्हणून ही सवय लावून घ्यावी.
घरोघरी दिनदर्शिका आल्यामुळे पूर्वीसारखे पंचांग वाचन होत नाही. तरीदेखील दिनदर्शिकेत पंचांगाइतकी सविस्तर माहिती मिळत नाही. यासाठी पंचांग वाचन करावे. परंतु अनेकांना पंचांग असूनही कसे वाचावे यासंदर्भात पुरेशी माहिती नसते. यासाठीच पुढील माहिती.
पंच +अंग (पाच अंगे) म्हणजे पंचांग. तिथी, वार, नक्षत्र, योग करणे ही पंचांगातील पाच अंगे आहेत. प्रत्येक दिवसाला सूर्योदयापासून या पाच अंगांचे अस्तित्त्व किती काळ (म्हणजे किती तास व किती मिनिटे) आहे, याची माहिती पंचांगात ३६५ दिवसांची दिलेली असते. अशा रीतीने १२ महिन्यांचे पंचांग लिहिलेले असते. प्रत्येक महिन्यात दोन पक्ष (शुद्ध आणि वद्य) असतात. पंचांगाच्या एकेक पृष्ठावर एकेका पक्षाचे (१५-१५ दिवसांचे) पंचांग छापलेले असते.
आपण पंचांग घेऊन कोणत्याही महिन्याचे पान उघडले म्हणजे त्यावर उभ्या आडव्या रेघांची कित्येक घरे (कोष्टकासारखी) पाडलेली असतात व त्या घरात अक्षरे व आकडे भरलेले असतात. एका पक्षासाठी एक पान असते. या पानांवर शीर्षभागी प्रथम शकाचे नाव, नंतर संवत्सराचे नाव, नंतर महिन्याचे व पुढे पक्षाचे नाव असते. त्याखाली क्रमाने १५ तिथींचे पंचांग असते.
(कोष्टकात पहिला आकडा तिथीचा असतो) १ म्हणजे प्रतिपदा, २ म्हणजे द्वितीया, १५ म्हणजे पौर्णिमा. वद्य पक्षात शेवटी ३० आकडा अमावस्येचा असतो. या तिथीच्या आकड्यामुळे पुढे वाराचे आद्याक्षर असते. सो-सोमवार, मं-मंगळवार इ. त्या वारांच्या अद्याक्षरापुढे तास व मिनिटे यांचे आकडे असतात. ओळीने त्यापुढे नक्षत्राचे अद्याक्षर त्यापुढील आकडे म्हणजे ते नक्षत्र त्या तिथीला किती तास व मिनिटे आहे ते दाखवतात. त्यानंतर योगाचे अद्याक्षर व आकडे, त्यापुढे करणाचे अद्याक्षर व आकडे असतात.
इंग्रजी तारखेचा जाड आकडा असतो. त्यापुढे र. उ. म्हणजे रवि उदय, र. अ म्हणजे रवि अस्त किती वाजता हे दिलेले असते. शेवटच्या रकान्यात चंद्र त्या दिवशी कोणत्या राशीत आहे, त्या राशीचे नाव लिहिलेले असते. त्यानंतर पुढचे प्रत्येक तिथीचे, दिवसाचे दिनविशेष लिहिलेले असतात. उदा. ग्रह बदलून कोणत्या राशीत गेले, त्या ग्रहाचे उदयास्त, सत्पुरुषांच्या पुण्यतिथी, सण, जयंती, घबाड, अमृतसिद्धी योग इ. माहिती दिलेली असते.
याशिवाय पंचांगात वर्षातील विवाह, उपनयन यांचे मुहूर्त, ग्रहणांची माहिती इ. दिलेले असते. बारा महिन्यांच्या पंचांगानंतर आडनावांची गोत्रे दिलेली असतात. काही पंचांगातून बारा राशीची महिनेवार, भविष्येही दिलेली असतात. यासाठीच दररोज सकाळी स्नान झाल्यावर पंचांग पाहण्याची सवय लावून घ्यावी.