देवपूजा करायची कशी? आपली आजी करायची तशी!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2021 10:52 AM2021-07-06T10:52:07+5:302021-07-06T10:52:27+5:30
देवाला उपचार म्हणून केलेली पूजा नको आणि तासन तास केलेली पूजाही नको, देवाला भक्ताच्या मनातील सच्चा भाव अभिप्रेत आहे आणि तो भाव जागृत व्हावा, यासाठी दैनंदिन पूजेचा उपचार आपल्या पूर्वजांनी सांगितला आहे.
घरच्या बागेतून आणलेली परडीभर फुले, धूप-दीप-उदबत्तीचा सुवास, सहाणेवर उगाळले जाणारे खोड, त्यातून ताटलीवर अलगद येणारे चंदन, हळद, कुंकू, अक्षता, सुंदर-सुबक रांगोळी, गूळ खोबरे किंवा खडीसाखरेचा नैवेद्य, मंजूळ घंटानाद, गंधलेपन होऊन देव्हाऱ्यात विराजमान झालेले देव आणि भक्तीपूर्ण स्वरात आरती म्हणणारी आजी किंवा आजोबा. हे चित्र कधी ना कधी आपण सर्वांनी नक्कीच अनुभवले असेल. देवपूजेचा असा विधी पार पडला, की घरात बराच काळ सकारात्मक लहरींचा वास असे. याला म्हणतात `देवपूजा!'
हा पूजाविधी कशासाठी आणि कोणासाठी? तर आजच्या धकाधकीच्या जीवनात देवासमोर `देवाचिये द्वारी उभा क्षणभरी' यासाठी! रोज सकाळी आपण पूजा उरकतो आणि नाश्ता करतो. परंतु आपली संस्कृती सांगते, पूजा करा आणि नाश्ता उरका. पूजा ही काही उरकण्याची बाब नाही. नानविध विषयांनी ग्रासलेले आपले मन काही क्षण का होईना प्रभूचरणी शांत व्हावे, त्यासाठी हा विधी आहे. पूजा ही देवासाठी नसून आपल्यासाठी असते. म्हणून पूजा करण्याचा योग्य विधी कोणता, ते जाणून घेऊया.
प्रार्थना, ध्यान-साधना, भजन-कीर्तन, यज्ञ आणि आरती असे दैनंदिन पूजेचे मूळ रूप आहे. यज्ञ वगळता अन्य गोष्टींसाठी मोजून दहा मिनीटेही पुरेशी आहेत. अशा पूजेचे पाच प्रकार आहेत. ते पुढीलप्रमाणे-
अभिगमन : देव्हारा स्वच्छ करणे. देवांना स्नान घालणे. निर्माल्य काढून ताजी फुले वाहणे.
उपादान : गंध, अक्षता, फुले , तुळशी, दूर्वा, वस्त्र-आभूषण इ. पूजा सामग्री देवाला अर्पण करण़े
योग : इष्ट देवाचे स्मरण करून, एक जप माळ ओढणे. देवाचे स्मरण करणे.
स्वाध्याय : स्तोत्र, हरीपाठ, आरती अशी शब्दसुमने वाहून काया, वाचा, मनाने ईश्वराला समर्पित होणे.
इज्या : वरील उपचार करून देवपूजा पूर्ण करणे.
पूजेचे उपचार अनेक आहेत. त्याला आपण अनुक्रमे पंचोपचार,दशोपचार आणि षोडशोपचार पूजा असे म्हणतो. त्यात कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो, ते पाहू.
पंचोपचार : गंध, पुष्प, धूप, दीप आणि नैवेद्य
दशोपचार : पाद्य, अर्घ्य , आचमन, स्नान, वस्त्र, निवेदन, गंध, पुष्प, धूप, दीप आणि नैवेद्य
षोडशोपचार : पाद्य, अर्घ्य , आचमन, स्नान, वस्त्र, निवेदन, गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, आभूषण, तांबूल, स्तवपाठ, तर्पण आणि नमस्कार.
त्याचप्रमाणे पूजा झाल्यावर आरती केली जाते, तिचेही सात प्रकार आहेत.
काकड आरती
पूजा आरती
धूप आरती
भोग आरती
श्रुंगार आरती
संध्या आरती
शेजारती
मथुरा, वृंदावनातील कृष्ण मंदिरांमध्ये अष्टप्रहर आरती केली जाते. आरती म्हणताना पंचदीपाने ओवाळून पंचारती केली जाते. शंख, घंटा, नगारे यांचा नाद केला जातो. आपल्याकडेही पहाटे काकडआरती, पूजा आरती आणि शेजारती करण्याची प्रथा आहे.
आरती कशासाठी? तर पूजेच्या उपचारात अनावधानाने काही चूक घडली असल्यास आरतीतून देवाला आर्त साद घातली जाते व यथाशक्ती, यथामती केलेली पूजा स्वीकारून घे, अशी विनंती केली जाते.
देवाला उपचार म्हणून केलेली पूजा नको आणि तासन तास केलेली पूजाही नको, देवाला भक्ताच्या मनातील सच्चा भाव अभिप्रेत आहे आणि तो भाव जागृत व्हावा, यासाठी दैनंदिन पूजेचा उपचार आपल्या पूर्वजांनी सांगितला आहे.